You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान-भारत संघर्षाचा मोदी फायदा घेत असल्याचा राज ठाकरेंचा आरोप
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा "फायदा घेणं हे उमद्या राजकारण्याचं लक्षण नाही," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका निवेदनातून केली आहे.
26 फेब्रुवारीला वायुदलाने हल्ला करण्याआधीच राज ठाकरे यांनी राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.
"पुलवामामध्ये मृत्युमुखी पडलेलेले CRPF जवान हे राजकीय बळी आहेत. अजित डोवाल यांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल," असं विधान राज यांनी केलं होते. 14 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्याची बातमी कळल्यनंतरही मोदी हे उत्तराखंडच्या कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात शूटिंग करण्यात व्यग्र होते, असंही ते म्हणाले होते.
भारतीय जनता पार्टीनेही राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. "राज ठाकरेंनी आजवर फक्त नकलाच केल्या आहेत. आता असे आरोप करून ते राहुल गांधींची नक्कल करत आहेत," अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली होती.
राज ठाकरे यांनी काढलेल्या पत्रावर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी "राष्ट्रीय राजकारणात मनसे अदखलपात्र आहे. हिसेंचं राजकारण करत भाषिक वादातून पक्ष मोठा करणारे तसेच ज्यांचा लोकसभेत एकही खासदार नाही, अशांच्या सल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना गरज नाही," अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
येडियुरप्पांच्या वक्तव्यावर पाकिस्तानची टीका
दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते B. S. येडियुरप्पा यांच्या एका वक्तव्यावरूनही वाद झाला होता.
"पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या हल्ल्यामुळे मोदींच्या बाजूने लाट तयार झाली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागांपैकी 22 जागांवर भाजपा विजयी होईल," असं ते म्हणाले होते.
त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. यानंतर 'आपल्या विधानाचा विपर्यास केला,' अशी सारवासारव येडियुरप्पा यांनी केली आहे.
पण येडीयुरप्पा यांचं हे वक्तव्य सीमेपलीकडे पाकिस्तानमध्येही पोहोचलं.
पंतप्रधान इम्रान खान यांनीही पुलवामा हल्ल्यानंतर दिलेल्या पहिल्या संदेशात असं म्हणाले होतं की "या हल्ल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध द्वेष पसरवून तुम्ही निवडणुका जिंकू पाहत आहात,"
त्यांच्या पाकिस्तान 'तेहरीक-ए-इन्साफ' पक्षानेही नंतर येडीयुरप्पा यांच्या विधानाचा आधार घेत "भारतातले राजकीय पक्ष अंतर्गत राजकारणामुळे युद्धाचा पर्याय स्वीकारत आहेत," अशी टीका केली आहे.
लाभ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न- काँग्रेस
राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर मत व्यक्त करताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात, "पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं सरळ दिसत आहे. वैमानिकांचे जीव धोक्यात घालून पाकला कोणता धडा मिळाला? मसूद अझरचं काय झालं? यांची उत्तरं कोण देणार?"
सचिन सावंत यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही टीका केली.
अमित शाह यांनी पुलवामा हल्ल्यानंतर सभा सुरूच ठेवल्या. त्याचप्रमाणे येडीयुरप्पा यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.
"भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचारसभा, तातडीनं होर्डिंग्ज लागणं, हे भाजपचं राजकीय स्टेटमेंट आहे. खरंतर अशावेळी देशहितासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे."
भाजपानं फेटाळले मनसेचे आरोप
राज ठाकरे यांच्या प्रसिद्धीपत्रकावर भाजपानं टीका केली आहे. भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुळात प्राण गमावलेल्या 44 जवानांच्या कुटुंबीयांच्या भावना, 130 कोटी लोकांच्या भावना काय आहेत याचा विचार मनसेच्या नेत्यांनी करायला हवा होता. भारत सरकारने जे केलं ते 130 कोटी लोकांना आवडलं असताना त्यावर राजकारण कोण करणार असेल तर ते त्यांनाच लखलाभ होवो. ज्या राजकीय पक्षांची दुकानं बंद झाली ते अशी टीका करत आहेत."
या परिस्थितीचा भाजपा कोणताही फायदा घेत नसल्याचं सांगत राम कदम म्हणाले, "प्रथम राष्ट्र आणि नंतर संघटन अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्राचा विषय आला की आम्ही पक्षहित विसरून राष्ट्राचा विचार करतो."
'मुंबईभर पोस्टर्स काय सांगतात?'
भारतीय जनता पार्टी या परिस्थितीचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न घेत आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
ते म्हणाले, "पुलवामा हल्ल्यापासून पंतप्रधान आणि भाजपाचे नेत्यांचं वागणं, बोलणं, बॅनरबाजी यातून ते दिसून येतं. मुंबईभर 'जो मोदीके साथ वो देशके साथ' अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. म्हणजे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत."
'फायदा घेण्याचा प्रयत्न सरकार करेल पण पुरावेही द्यावे लागतील'
या सर्व स्थितीबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी बीबीसीला सांगितलं, "पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या हवाई हल्ल्याबाबत विरोधी पक्षांनी तसंच काही माध्यमांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यातील प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील.
तिन्ही संरक्षणदलांच्या प्रमुखांनी याचे पुरावे सरकारकडे दिले आहेत. सरकार ते योग्यवेळी प्रसिद्ध करेल असं त्यांनी सांगितलं आहे. ही योग्य वेळ निवडणुकी आधी की नंतर हे सरकारला सांगावं लागेल. तसंच आपले सर्व दावे सरकारला सबळ सिद्ध करावे लागतील."
या परिस्थितीमुळे देशाला स्थिर सरकारची आणि कणखर नेतृत्त्वाची गरज आहे हे भाजपा अधिक जोरदारपणे प्रचारात मांडेल, असं देशपांडे म्हणतात.
भारताने हवाई हल्ल्यावर शंका उपस्थित होत असल्या तरी त्याला दुसरी बाजू असण्याचीही शक्यता अभय देशपांडे यांनी वर्तवली.
युद्धजन्य स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सरकार चालवणारे घेऊ शकतात तसे त्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकही करू शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
"काहीच नुकसान झालं नाही असं पाकिस्तान सांगत असला तरी तीसुद्धा दिशाभूल असू शकते. पाहाणी करायला जाणाऱ्या पत्रकारांना पाकिस्तानतर्फे दुसऱ्याच वेगळ्या ठिकाणी नेलं जात असावं, असं मी नुकतंच एके ठिकाणी वाचलं. त्यामुळे पाकिस्तानातील माहितीच्या आधारे हवाई दलाच्या कारवाईवर शंका घेताना त्याला दुसरी बाजूही असेल", असं देशपांडे म्हणाले.
'हवाई हल्ल्याचे पुरावे द्या'
भारतीय वायूदलाने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली नाही तसंच या मोहिमेची माहिती दिली नाही, अशी टीका करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हवाई हल्ल्याबाबत शंका व्यक्त केली आहे.
"विरोधी पक्ष या नात्याने आम्हाला ऑपरेशन आणि एअरस्ट्राइकची पूर्ण माहिती हवी आहे. किती बॉम्ब टाकले, त्यात किती लोक मारले गेले?" असं ममता बॅनर्जी यांनी विचारलं आहे.
सरकारला प्रश्न विचारताना ममता बॅनर्जी यांनी आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सचाही आधार घेतला. त्या म्हणाल्या, "मी न्यूयॉर्क टाइम्स वाचत होते. या ऑपरेशनमध्ये कुणीच मारलं गेलं नाही, असं त्यात लिहिलं होतं. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये एक व्यक्ती मारली गेल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे याची आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)