You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान नाही तर चीन आहे भारताचा खरा शत्रू : माजी वायुदल प्रमुख अनिल टिपणीस
भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी वायुसेनाप्रमुख अनिल टिपणीस यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी केलेली चर्चा:
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर जर युद्ध झालं तर भारताचे स्क्वॉड्रन कमी पडतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आधीचं सरकार वायुदलातील स्क्वॉड्रन सशक्त करायला कमी पडलंय का?
अर्थातच. आपलं लक्ष कायमचं पश्चिमेकडे म्हणजेच पाकिस्तानकडे होतं. आपल्याला खरा धोका चीनपासून आहे. भारताने चीनशी एकच युद्ध केलंय आणि त्यात आपण पूर्णतः यशस्वी झालो नाही.
त्यानंतर गेली अनेक वर्ष चीन आपल्या कुरापाती काढत आहे. चीन कुरापती काढेल, पण आपल्यावर कधी हल्ला करणार नाही. कारण त्यांना माहितेय की माझ्या हातात एक कठपुतळी आहे जी मी म्हणेल तेव्हा भारतावर हल्ला करेल, त्यांना त्रास देईल. मग या कठपुतळीलाच भारताला त्रास देऊ द्या.
पण यावेळेस मात्र चीनच्या भूमिकेत बदल झालेला दिसतो. या हल्ल्यानंतर 'दोन्ही देशांनी संयम बाळगवा' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आता राहिला प्रश्न वायुदलाच्या ताकदीचा. मला वाटतं की दोन्ही सीमांवर वायुदलाचं प्रचंड महत्त्व आहे. आपली क्षमता सध्या फक्त बचावात्मक स्वरूपाची आहे. जर युद्ध झालंच तर दोन्ही आघाड्यांवर आपल्याला फटका बसू शकतो.
कारगिल युद्धानंतर आम्ही आपल्या दोन्ही आघाड्यांवरून 2025 पर्यंत उद्भवू शकणाऱ्या धोक्याचं पुर्नअवलोकन केलं. एअर चीफ मार्शल म्हणून सरकारला माझं सांगणं होतं की तुम्ही ज्या 42 स्क्वॉड्रनविषयी बोलता आहात ते पुरेसे नाहीत. कमीत कमी 50 तरी हवेत.
आणि या 50 मध्ये तीन प्रकारची विमान असतील, एक म्हणजे अत्याधुनिक विमानं, दुसरं म्हणजे अद्यावत केलेली जुनी विमान, आणि तिसरं म्हणजे अशी विमान जी काढून टाकायला हवीत, पण तरी आम्ही वापरू.
पण तसं झालं नाही. तुम्ही मिग विमानांच्या गप्पा मारता, 23 वर्षांचा तरूण वैमानिक असताना मी मिग विमान उडवलं आहे आणि आज मी 78 वर्षांचा आहे. आणि आपण अजूनही तीच विमानं वापरतो आहोत.
सरकारने या गोष्टीची दखल घ्यायला हवी. आपल्याकडे अद्यावयत विमानांची कमतरता आहे, ती भरून काढायला हवी.
मागच्या सरकारांनी याविषयी काहीच केलं नाही. प्रत्येक सरकार दुसऱ्या पक्षांच्या सरकारांवर भ्रष्टाचारांचे आरोप लावत आहे. हो, भ्रष्टाचार झाला यात काहीच शंका नाही.
सरकारला हे कळत नाही का की तुम्ही देशाचं नुकसान करत आहात.
पाकिस्तानच्या हवाई सज्जतेबद्दल तुम्ही काय सांगाल? ते कितपत सज्ज आहे? भारतही किती सज्ज आहे?
काही दशकांपूर्वीची गोष्ट केली तर पाकिस्तान आपल्या बराच पुढे होता. साहाजिक आहे, त्यांना अमेरिकची मदत होती. त्यामुळे त्यांच्या दळणवळणाच्या, संदेशवहनाच्या, रडार यंत्रणा आपल्यापेक्षा बऱ्याच आधुनिक होत्या.
पण गेल्या काही वर्षांत चित्र बदललं आहे. आपण त्यांना सुरक्षासज्जतेच्या बाबतीत मागे टाकलं आहे. आपली जमिनीवरची सुरक्षा यंत्रणा, रडार यंत्रणा चांगल्या आहेत.
पण पाकिस्तानला जमिनीवरच्या युद्धसज्जतेच्या बाबतीत कमी लेखून चालणार नाही. तिथला बराचसा भाग पर्वतीय आहे जिथं रडार व्यवस्थितपणे काम करू शकत नाही.
बालाकोटही असाच भाग होता जिथं रडारला काम करण्यात अचडणी येतात. पण असा भाग आपल्याकडेही आहे आणि जर पर्वतीय भागात दोन्ही देशांच्या रडारांच्या क्षमतेची तुलना केली तर ती जवळपास सारखीच आहे.
त्यांच्या आणि आपल्या क्षेपणास्त्रांची क्षमताही सारखी आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाकिस्तानचा असा दावा आहे की त्यांनी आपलं मिग-21 विमान पाडलं. ही विमानं दोन पिढ्यांइतकी जुनी आहेत. त्याच्यात तांत्रिक सुधारणा केल्या हे जरी खरं असलं तरी त्यांचा ढाचा हा जुनाच आहे. त्या तुलनेत पाकिस्तानचं F-16 हे अधिक चांगलं आहे.
आपली सुखोई आणि मिराज ही विमानं मात्र पाकिस्तानच्या लढाऊ विमानांपेक्षा अधिक चांगली आहेत. त्यामुळे हवाई सज्जतेच्या बाबतीत आपण त्यांच्या पुढे आहोत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली परिस्थिती चिघळतेय असं तुम्हाला वाटतं का?
कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई, कोणीही केली तरी परिस्थिती चिघळण्याची शक्यता असते. त्यामुळे परराष्ट्र सचिवांनी जेव्हा निवेदन दिलं त्यात त्यांनी मोजून-मापून शब्द वापरले होते. ते म्हटले की ही लष्करी कारवाई नाही.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानाचं असं म्हणणं आहे की भारतीय विमानांनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसून राहाणार का? आम्ही केलेली कारवाई ही स्वसंरक्षणार्थ आहे आणि भारताने हल्ला केला तर आम्ही सज्ज आहोत.
पण पाकिस्तान सगळ्या बाजूंनी बॅकफुटवर गेला आहे. त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. पण ते चर्चा कोणत्या गोष्टींची करणार? भारत कधीपासून सांगतो आहे की त्यांच्या देशात असणाऱ्या दहशतवादी तळ उद्धवस्त करा. पण त्यांनी काही केलेलं नाही.
त्यामुळे पाकिस्तानच्या चर्चेच्या प्रस्तावाला भारताचं उत्तर असेल की तुम्ही आम्हाला ठोस पुरावे द्या की तुम्ही या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहात मगच आम्ही चर्चा करू.
कोणत्याही बाजूची इच्छा नाही की परिस्थिती चिघळावी. पण दहशतवादाविरुद्ध काही कारवाई व्हायला हवीच.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)