पाकिस्तान: IAFच्या बालाकोट कारवाईचे मोदी सरकारने पुरावे द्यावे - ममता बॅनर्जी #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्या अशा:

1. मोदी सरकारने पाकिस्तानातल्या कारवाईचे पुरावे द्यावे - ममता बॅनर्जी

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे काही तर पुरावे मोदी सरकारने द्यावे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

दैनिक जागरणने दिलेल्या बातमीनुसार, दिल्लीत भाजप-विरोधी पक्षांची एक बैठक आटोपून कोलकात्याला परतल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींनी हल्ला केल्यानंतर विरोधी नेत्यांची एक साधी बैठकही बोलावली नाही. त्यातच अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की भारताने केलेल्या हल्ल्यात एकही जण मारला गेला नाही, तर काही वृत्तांनुसार एकाचा जीव गेला आहे."

"मग अशात मोदी सरकारने पूर्ण माहिती द्यावी. नाहीतर असं वाटतंय की मोदी जवानांच्या रक्ताचं राजकारण करत आहेत. कुणी जवानांबरोबर असं कसं करू शकतं?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

2. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना आरक्षण

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी जम्मू काश्मीर राज्याबाबत दोन महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं वृत्त सामनाने प्रसिद्ध केले आहे.

जम्मू-काश्मीर आरक्षण कायदा 2014मध्ये बदल करण्यासाठी आता अध्यादेश काढण्यात येत आहे. या राज्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहाणाऱ्या नागरिकांना आरक्षण देण्यात येणार आहे. यापूर्वी फक्त नियंत्रण रेषेजवळ राहाणाऱ्या लोकांना आरक्षण देण्यात आले होते.

तसंच राज्यातील गरीब सवर्णांनाही आरक्षण देण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे निर्णय जाहीर केले.

शिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने राजकोट येथे विमानतळाला मंजुरी दिली आहे. त्याच प्रमाणे कानपूर आणि आग्रा शहरांसाठी मेट्रो रेल्वेच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे.

3. नारायण राणेंच्या पक्षाला 'बादली' चिन्ह

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला 'बादली' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह मिळाल्यावर संपूर्ण राज्यभरात सर्व शक्तीनिशी निवडणुका लढवू, असे राणे यांनी सांगितलं आहे.

आज (शुक्रवारी) मुंबईतील रंगशारदा सभागृहात राणे यांनी कोकणवासीयांचा मेळावा आयोजित केला असून आगामी काळातील राजकीय वाटचालीवर ते सविस्तर भाष्य करणार आहेत.

भाजपा आणि शिवसेना यांची युती झाल्यावर नारायण राणे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राणे यांच्या पक्षचिन्हाबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. 10,001 शिक्षकांची मेगाभरती

संपूर्ण राज्यात शिक्षकांच्या 10,001 इतक्या जागा भरण्यासाठीची जाहिरात गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीच्या या जाहिरातीची गेले अनेक महिने प्रतीक्षा होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही जाहिरात वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

"पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही पहिलीच शिक्षक भरती होत आहे. हे करताना सर्व संबंधित गटाशी विचारविनिमय केला, त्यांच्या सूचना विचारात घेतल्या, या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे शिक्षक भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यामध्ये योगदान आहे. यापुढेही त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे," असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

ही जाहिरात सध्या पवित्र पोर्टलवर संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध असून 2 मार्च रोजी जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे.

5. राज्य पोलीस दल अधिक भक्कम करू- नवनियुक्त महासंचालक सुबोध जयस्वाल

"राज्य पोलीस दलाचा देशपातळीवर असणारा लौकिक कायम ठेवून, ते अधिक भक्कम करू," असं राज्याचे नवे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल गुरुवारी म्हणाले.

मावळते प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्याकडून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. तसंच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाली आहे.

लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

यावेळेस माध्यमांशी बोलताना जयस्वाल म्हणाले, "राज्यातील पोलीस दलातील प्रत्येक घटकाशी उत्तम समन्वय ठेवून त्याठिकाणची कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील."

सुबोध जयस्वाल हे मूळचे बिहारचे असून ते 1985च्या तुकडीचे IPS अधिकारी आहेत. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या तपासासठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाचे ते प्रमुख होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)