You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा पाकिस्तान सरकारने घेतला ताबा
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील या मुख्यालयात या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर असल्याचं सांगितलं जात आहे.
पंजाब प्रांताच्या गृह खात्यानुसार, पंजाब सरकारने मध्य-उल-असबारचा मदरसा आणि परिसरातील सजनाह-उल-इसलाम ही मशीद आपल्या ताब्यात घेतली आहे. ही मशीद जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय मानली जाते. एक प्रशासकीय अधिकारी या परिसरावर नियंत्रणासाठी नेमण्यात आला आहे.
पाकिस्तान सरकारच्या एका निवेदनानुसार या मदरशात 70 शिक्षक आणि 600 विद्यार्थी आहेत. या परिसराचा ताबा सध्या पंजाब सरकारकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.
मदरशाच्या कर्मचाऱ्यांनीही या संस्थानाला कुलूप ठोकण्यात आल्याचं बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी ओमर द्रविस नगियाना यांच्याशी बोलताना स्पष्ट केलं. सध्या इथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या अवंतिपुराच्या लेकपुरा भागातून जाणाऱ्या CRPFच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला झाला. ज्यात 43 जवान मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए मोहम्मदनं घेतली होती.
गुरुवारीच पाकिस्तानने जमात-उद-दावा आणि त्याची धर्मादाय संस्था फलह-ए-इन्सानियत या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीज सईद हा 2008 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता.
"कट्टरतावाद आणि दहशतवाद हे आपल्या प्रांतातले मोठे प्रश्न आहेत. पाकिस्ताननेही दहशतवादात 70 हजारपेक्षा जास्त जीव गमावले आहेत. याशिवाय, आमच्या साधनसंपत्तीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एका महत्त्वाच्या बैठकीनंतर बोलताना सांगितलं होतं.
पठाणकोट, उरी ते पुलवामापर्यंतचे हल्ले
स्थापनेच्या दोन महिन्याच्या आतच जैश ए मोहम्मदनं श्रीनगरच्या बदामी बाग परिसरात असलेल्या भारतीय लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
यानंतर 28 जून 2000ला जम्मू काश्मीर सचिवालयावर झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी घेतली.
यानंतर 24 सप्टेंबर 2001ला एका युवकानं स्फोटकांनी भरलेली कार श्रीनगर विधानसभा भवनावर धडकवली.
त्याचवेळी काही कट्टरवाद्यांनी विधानसभेच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागील भागाला आग लावली. या घटनेत 83 लोक मारले गेले.
हल्ल्यानंतर लगेचच जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा इन्कारही केला.
13 डिसेंबर 2001 ला भारतीय संसदेवर आणि जानेवारी 2016ला पंजाबमधील पठाणकोटच्या वायु सेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्यालाही जैश ए मोहम्मद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.
पठाणकोटच्या आधीही भारतात झालेल्या हल्ल्यांना जैश ए मोहम्मदला जबाबदार ठरवण्यात आलं आहे. यातला सर्वात मोठा हल्ला 2008मध्ये मुंबईत झाला होता.
2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचे दोषी अफजल गुरुसुद्धा जैश ए मोहम्मदशी संबंधित होते. त्यांना 10 फेब्रुवारी 2013मध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
डिसेंबर 2016मध्ये काश्मीरच्या उरीमध्ये असलेल्या लष्कराच्या तळावर जो हल्ला झाला त्यालाही जैश ए मोहम्मद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. उरीच्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता.
यानंतर काहीच दिवसात भारतानं सीमारेषेवर 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याचा दावा केला होता.
वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)