कार्ल मार्क्स यांच्या लंडनमधील स्मारकाची विटंबना

कार्ल मार्क्स यांच्या उत्तर लंडनमधील स्मारकाची गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली आहे. हायगेट दफनभूमीमधल्या कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर Doctrine of Hate आणि Architect of Genocide हे शब्द लाल रंगानं खरडले होते.

काही दिवसांपूर्वी 4 फेब्रुवारीला कार्ल मार्क्स यांच्या कबरीवर हातोड्याने घाव घालण्यात आले होते. मार्क्सच्या स्मारकाचं नुकसान करण्याचा हा अतिशय नियोजित आणि जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. हातोड्यानं घाव घातल्यामुळं कार्ल मार्क्सच्या स्मारकाची चांगलीच नासधूस झाली होती.

या दोन्ही हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या या विध्वंसानंतर जर्मन तत्वज्ञाचं स्मारक आता पुन्हा पहिल्याप्रमाणे कधीच होऊ शकणार नसल्याचं हायगेट स्मशानभूमी धर्मादाय संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

"कार्ल मार्क्स यांच्या स्मारकाला भेट द्यायला गेल्यावर इथली नासधूस पाहून आपल्याला अतिशय धक्का बसला," अशी प्रतिक्रिया ब्रिटीश म्युझियममधील मॅक्सवेल ब्लोफिल्ड यानं व्यक्त केली.

पर्यटक नियमितपणे या स्मारकाला भेट देत असतात. त्यामुळं या स्मारकाची विटंबना ही अतिशय खेदाची गोष्ट असल्याचं 31 वर्षीय मॅक्सवेलनं नमूद केलं.

"हा लाजीरवाणा प्रकार आहे. कबरीवरचा लाल रंग पुसता येईल. पण बाकी जे नुकसान झालंय त्याचं काय? दोन वेळा हा प्रकार झाला. तो नक्कीच योग्य नाही," मॅक्सवेलनं म्हटलं.

मॅक्सवेलनं म्हटलं, की 2019 मध्ये कोणालातरी असं कृत्य करावं वाटतं याचंच मला आश्चर्य वाटतं.

1970 साली पहिल्यांदा या स्मारकाच्या संगमरवरी चबुतऱ्याचा दर्शनी भाग एका पाईप बॉम्बनं उडवण्यात आला होता. मार्क्सची पत्नी जेनी व्हॉन वेस्टफालेनच्या स्मारकासाठी तो 1881 साली पहिल्यांदा वापरला होता.

त्यानंतर हा चबुतरा काढण्यात आला. 1954 साली कार्ल मार्क्स आणि त्यांची पत्नी जेनी यांच्या कबरी या दफनभूमीतल्या सर्वांत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या.

यापूर्वी कार्ल मार्क्सच्या स्मारकावर स्वस्तिक काढण्यात आले होते तसंच त्यावर रंगही टाकण्यात आला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)