You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांचा अमेरिकेत आणीबाणी लागू करण्याचा निर्णय
अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणीबाणी पुकारणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.
शटडाऊन टाळण्यासाठी ते सीमासुरक्षा विधेयकावर सही करणार आहेत, परंतु काँग्रेसला फाटा देऊन लष्करी निधी भिंत उभारण्यासाठी वापरता यावा यासाठी ते हे पाऊल उचलणार आहेत.
डेमॉक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा सत्तेचा गैरवापर असून कायदाविरोधी कृती आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीत मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचं आश्वासन ट्रंप यांनी दिलं होतं. पण त्यासाठी त्यांना निधी मिळू शकलेला नाही.
व्हाईट हाऊसने काय म्हटलं आहे?
व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी म्हटलं आहे, "सीमा आणि आपल्या महान देशाची सुरक्षा यासाठी राष्ट्राध्यक्ष त्यांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी कटिबद्ध आहेत. सीमेवरील मानवी आणि राष्ट्रीय सुरक्षेचं संकट टाळण्यासाठी ते आणीबाणी पुकारण्यासह त्यांचे अधिकार वापरणार आहेत."
ही भिंत बांधण्यासाठी ट्रंप यांना 5.7 अब्ज डॉलर इतका निधी हवा आहे. तर सध्या जो तडजोडीचा कायदा झाला आहे त्यात सीमा सुरक्षेसाठी 1.3 अब्ज डॉलरचा निधी देण्यात आला आहे. यात ट्रंप यांनी आश्वासन दिलेल्या भिंतीसाठीच्या निधीचा समावेश नाही.
या वर्षीच्या सुरुवातीलाच ट्रंप यांनी भिंतीसाठी निधी मिळावा यासाठी आणीबाणी पुकारू असं म्हटलं होतं. पण असं पाऊल चुकीचा पायंडा ठरेल, असं मत काही रिपब्लिकन नेत्यांनी व्यक्त केलं होतं.
तर गुरुवारी सिनेटमध्ये बोलताना रिपब्लिकन पक्षाचे नेते मिच मॅककोनेल यांनी ट्रंप यांना पाठिंबा दिला. ते म्हणाले, "सीमांचं रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे जे मार्ग उपलब्ध आहेत, त्यांचा ते वापर करत आहेत."
सिनेटमध्ये गुरुवारी 83 विरुद्ध 16 मतांनी सीमासुरक्षा विधेयक मंजूर झालं. हे विधेयक आता मंजुरीसाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडे जाईल.
डेमोक्रॅटिक पक्षाची भूमिका काय?
सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी ट्रंप यांच्या भूमिकेवर कायदेशीर बाबींची मांडणी केली आहे. सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक शुमर आणि पेलोसी यांनी एका निवेदनात ट्रंप यांच्यावर टीका केली आहे.
"आणीबाणी जाहीर करणं हे कायद्याला धरून नाही शिवाय राष्ट्राध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा हा गैरवापर आहे. या भिंतीसाठी मेक्सिको पैसा देईल, असं वचन राष्ट्राध्यक्षांनी दिलं होतं. मेक्सिको, अमेरिकेचे नागरिक किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचं या निरुपयोगी आणि अत्यंत खार्चिक भिंतीसाठी मतपरिवर्तन करू शकलेले नाहीत. आता ते करदात्यांना वेठीस धरत आहेत."
डेमोक्रॅटिक पक्षाने घटनात्मक अधिकारांचं संरक्षण करू असं म्हटलं आहे.
राष्ट्रीय आणीबाणी काय असते?
आपत्तीच्या काळात आणीबाणी जाहीर केली जाते. अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर स्थलांतरित येत असल्याने आपत्ती निर्माण झाली आहे, असं ट्रंप यांचं मत आहे.
आणीबाणी जाहीर केली तर ट्रंप यांना विशेष अधिकार मिळतील, असं तज्ज्ञांना वाटतं. या अधिकारांचा वापर करून ट्रंप यांना आपत्ती निवारण आणि संरक्षण यावरील निधी भिंत बांधण्यासाठी वळवू शकतील.
पण अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरील ही स्थिती आणीबाणी जाहीर करण्यासाठी पुरेशी आहे का, याबद्दल तज्ज्ञांना शंका आहे.
तर दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात दररोज 2000 लोकांना या सीमेवर अटक झाली आहे किंवा परत पाठवलं गेलं आहे, हा आकडा आणीबाणी जाहीर करण्यासाठी पुरेसा आहे, असं आणीबाणी समर्थकांना वाटतं.
हा आकडा गेल्या दशकाशी तुलना करता कमी आहे, शिवाय देशात आश्रय मागणारे आणि कायदेशीररीत्या प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे, असं विरोधकांचं मत आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)