मृत अर्भकाला जन्म दिल्यावरून 30 वर्षं तुरुंगवास झालेल्या महिलेची सुटका

एका प्रसाधनगृहात मृत अर्भकाला जन्म देणाऱ्या महिलेची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. एल सॅल्व्हाडोरच्या एका कोर्टाने या महिलेला 30 वर्षं कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

एव्हलीन बीत्रिज एरनांदो क्रूज असं या 20 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. बेकायदेशीर गर्भपाताच्या गुन्ह्याखाली झालेल्या या शिक्षेपैकी तिने तीन वर्षांचा कारावास भोगला आहे.

तिनं गर्भारपणात कोणतीही काळजी न घेतल्यामुळं (अर्भकाची) हत्या केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. पण गरोदर असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, अशी तिनं आणि तिच्या वकिलांनी भूमिका मांडली होती.

या खटल्याची पुन्हा सुनावणी होण्यासाठी प्रशासन याचिका दाखल करत असलं तरी या सुनावणीदरम्यान तिला घरी राहाण्याची परवानगी आज कोर्टाने दिली आहे.

सुटका झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तुरुंगाच्या दाराजवळ एकत्र येऊन "Evelyn, you are not alone" (एव्हलिन तू एकटी नाहीस), अशा घोषणा दिल्या.

2016च्या एप्रिल महिन्यात एव्हलीन एरनांदोने तिच्या घरीच प्रसाधनगृहात एका बाळाला जन्म दिला. प्रसूतीच्या वेळी खूप रक्त वाहून गेल्यामुळे तिची शुद्ध हरपली आणि त्यातच तिच्या बाळही वाचू शकलं नाही.

तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस आले, असं तिच्या आईने बीबीसीला सांगितलं.

गरोदर असल्याची कल्पना असती तर मी डॉक्टरकडे गेले असते, एव्हलीनने सांगितलं. तिच्या पहिल्या चौकशीमध्ये "आपल्यावर वारंवार बलात्कार झाल्याचं" सांगितलं होतं. बलात्काराची तक्रार करू नये, यासाठी तिला धमकावण्यात आलं होतं, अशी बाजू तिच्या वकिलांनी मांडली होती.

एरनांदोच्या गरोदरपणाचे सहा महिने पूर्ण झालेले होते. अधूनमधून रक्त जात असल्यामुळं ती मासिक पाळी असल्याचा समज झाला, त्यामुळे गरोदरपणाची लक्षणं आणि पोटदुखी, यामध्ये आपला गोंधळ झाल्याचा दावा तिनं केला.

"मला माझ्या बाळाला मारायचं नव्हतं. गरोदर असल्याचं मला माहीतच नव्हतं," असं तिनं कोर्टात सांगितलं. पण तिच्या या दाव्यावर न्यायाधीशांचा विश्वास बसला नाही.

तिचं मूल जन्मानंतर मृत झालं की आधीच मृत पावलं होतं, याच मुद्द्यावर खटल्यामध्ये सर्वाधिक भर देण्यात आला. मात्र संबंधित तज्ज्ञ ते निश्चित ठरवू शकले नाहीत.

1956 साली तयार करण्यात आलेल्या दंडसंहितेनुसार एल सॅल्व्हाडोरमध्ये गर्भपाताला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. यामुळे एल सॅल्व्हाडोरमध्ये विविध कारणांनी गर्भपात होऊन किंवा मृत बालकांचा जन्म झाल्याचे कारण देणाऱ्या अनेक महिलांना तुरुंगवास भोगावा लागला आहे.

या कायद्यामुळे अजूनही किमान 20 महिला देशातील तुरुंगामध्ये आहेत, असं मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे. पुनर्विचार याचिका आणि पुन्हा सुनावणी करायला लावून गेल्या दशकभरामध्ये 30 महिलांची सुटका करण्यात या संघटनांना यश आलं आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते अॅग्र्यूपेसिऑ स्योदादाना यांनी एरनांदोच्या सुटकेचं स्वागत केलं आहे. तसंच "तिला दोषी ठरवणारा कोणताही शास्त्रीय पुरावा नसल्याचं पुढील सुनावणीतील न्यायाधीशही मान्य करतील," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

"एल सॅल्व्हाडोर हा महिलांसाठी सर्वांत जास्त असुरक्षित देशांपैकी एक" असल्याचं अम्नेस्टी इंटरनॅशनलने सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)