You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विजय मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी 1 वर्षंही लागू शकतं - कायदेतज्ज्ञ
विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला लंडन कोर्टाने आधीच परवानगी दिली होती. त्यानंतर आता ब्रिटनच्या गृह खात्याने देखील विजय मल्ल्या यांच्या प्रत्यापर्णाला परवानगी दिली आहे.
अशा स्थितीमध्ये विजय मल्ल्यांसमोर आता कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीबीसीने कायदेतज्ज्ञांशी बोलून मल्ल्यांसमोर कोणता पर्याय उपलब्ध आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
"मल्ल्या यांना कोर्ट ऑफ अपीलमध्ये अपील करण्यासाठी 14 दिवसांची मुदत आहे. तो त्यांचा हक्क आहे. जर मल्ल्या यांचं अपील मंजूर करून त्यांच्या केसवर सुनावणी झाली तर पुढच्या प्रक्रियेला किमान पाच सहा महिने लागू शकतात. ही प्रक्रिया अतिशय किचकट स्वरूपाची आहे त्यामुळे वेळ लागू शकतो," असं कायदेतज्ज्ञ सरोश झाईवाला यांनी म्हटलं आहे.
"जर समजा या ठिकाणी जरी मल्ल्या यांच्याविरोधात निकाल लागला तर ते सुप्रीम कोर्टात अपील करू शकतात. या प्रक्रियेला आणखी पाच सहा महिने किंवा वर्ष लागू शकतं."
"द क्राउन प्रोसेक्यूशन सर्व्हिस (सरकारी बाजू) कोर्टाला अशी विनंती करू शकते की लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावा, पण त्यांना सांगावं लागेल की हे अत्यावश्यक का आहे? खालच्या कोर्टाने दिलेला निकाल पूर्णपणे बदलला जाऊ शकतो. हे ब्रिटनमध्ये बऱ्याचदा घडतं," असं झाईवाला सांगतात.
क्राउन प्रोसेक्युशन सर्व्हिसमध्ये प्रत्यार्पण तज्ज्ञ म्हणून काही काळ काम पाहिलेले निक व्हामोस सांगतात की "गृह सचिव साजिद यांनी दिलेला निर्णय फार काही आश्चर्यकारक नाही. कारण न्यायालयाचा निर्णय त्यांना मान्य करावाच लागतो. मल्ल्या यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं की ते हायकोर्टात जाणार आहेत. आता त्यांच्याकडे 14 दिवसांची मुदत आहे. त्यांचे वकील आता अर्ज करू शकतात. त्यांना सर्वांत आधी 'लिव्ह टू अपील' मिळणं आवश्यक आहे.
लिव्ह टू अपीलचा अर्थ असतो की या प्रकरणावर पुनर्विचार व्हावा की नाही. लिव्ह टू अपील मान्य होणं म्हणजे प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा तपासला जातो.
अपीलच्या सुनावणीसाठी दोन तीन महिने लागू शकतात. कारण मल्ल्या यांची केस फार गुंतागुंतीची आहे आणि त्यात अनेक कायदेशीर बाबी आहेत. हाय कोर्टात पुन्हा प्रतिवाद ऐकला जाणार नाही. फक्त निकालावरच विचार केला जाईल," असं निक व्होमास यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)