दोस्ताच्या मृत्यूने खचलेल्या 'गोड' कुत्र्याचे निधन

एक कुत्रा काही दिवसांपूर्वी वारला. पण हा कुत्रा काही साधासुधा नव्हता. जगातील सर्वांत क्यूट कुत्रा म्हणून ओळख असलेल्या या 'बू'वर एक पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं. पण त्याच्या मृत्यूने अनेक श्वानप्रेमी हळहळले आहेत.

'बू'च्या निधनाचं कारणही चटका लावणारं आहे. 'बू' जवळचा मित्र असलेला 'बडी' या कुत्र्याचं निधन 2017ला झालं होतं. त्यानंतर 'बू' निराशेत होता आणि त्यातच तो वारला.

12 वर्षांचा बू पोमेरियन जातीचा होता.

"त्याच्या मित्राच्या विरहामुळे तो अक्षरशः खचला होता. त्यात त्याचं निधन झालं," असं 'बू'च्या मालकानं म्हटलं आहे.

'बू'चा घनिष्ट मित्र 'बडी'चं 2017मध्ये निधन झालं होतं. त्याच्या निधनानंतर त्याचं मन खचलं होतं, असं त्याच्या मालकाने आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे.

'बू'च्या फेसबुक पेजला 16 लाख फॉलोअर्स आहेत. तसंच 'बू' हा टीव्हीवर झळकला आहे. त्याच्या जीवनावर "Boo- The Life of the World's Cutest Dog' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.

'बू' आणि त्याचा मित्र 'बडी' हे दोघे 11 वर्षं सोबत होते. 2017मध्ये रात्री झोपेतच बडीचं निधन झालं. त्यानंतर बू खचला. पुढे त्याच्या मालकाने असं म्हटलं आहे, "बू आता अशा ठिकाणी गेला आहे जिथं त्याला काही दुःख नाही किंवा त्याला विरहाची झळ देखील सोसावी लागणार नाही."

"आम्हाला असा विश्वास वाटतो की स्वर्गात सर्वांत आधी त्याला कुणी भेटणार असेल तर तो म्हणजे बडी. त्या इंद्रधनूच्या पल्याड तो त्याचं अभिवादन करण्यासाठी उत्सुक असेल. आपल्या आवडत्या मित्राला भेटण्यासाठी तो आतूर झाला असेल."

"बू, आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि जोपर्यंत आपली भेट होणार नाही त्या दिवसापर्यंत मी तुझी आठवण काढेन. ज्या ठिकाणीही तू असशील त्या ठिकाणी तू आणि बडी मनसोक्त बागडा," असं त्याचे मालक लिहितात.

बू अनेक सेलिब्रिटींना भेटला होता. प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेता सेथ रोगनला तो भेटला होता. तसेच अमेरिकन एअरलाइन्सचा तो सदिच्छा दूत होता. तसेच तो अनेक कार्यक्रमांमधून झळकला होता.

'बू'चे मालक सांगतात "आम्हाला असे खूप मेसेज मिळाले ज्यामध्ये लोक म्हणत आहेत की 'बू'मुळे आमच्या खडतर आयुष्यात आशेचा एक किरण निर्माण झाला. आणि त्याच्या आयुष्याचं ध्येय हेच असावं. त्याच्यामुळे जगभरातील हजारो लोक आनंदी झाले होते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)