You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इमानी कुत्र्याने मालकिणीची पाहिली 80 दिवस वाट
असं म्हणतात की कुत्र्यासारखा निष्ठावान प्राणी शोधून सापडणार नाही. इमानी श्वान मंडळींची अनेक उदाहरणं दिसतात.
कथाकहाण्यांचं म्हणाल तर कुत्र्यांच्या स्वामीभक्तीच्या अनेक कहाण्या आपल्याकडे प्रचलित आहेत. त्यातलीच एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुत्र्याने त्यांच्या चितेत घेतलेली उडी.
अशीच काहीशी स्वामीभक्ती मंगोलियामध्ये दिसून आली.
आपल्या मालकिणीचा मृत्यू जिथे झाला त्या रस्त्यावर कुत्र्याने 80 दिवसांपेक्षाही जास्त दिवस आपल्या मालकिणीची वाट पाहिली.
चीनच्या ऑनलाईन जगात मंगोलियाच्या या कुत्र्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना मंगोलियातच्या अंतर्गत भागातल्या होहोत शहरातली आहे.
या व्हीडिओला चीनमध्ये जवळपास 16 लाख व्ह्यूज आहेत.
एका स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरच्या मते इथले लोक त्या कुत्र्याला मदत करू इच्छितात.
"या कुत्र्याचं त्याच्या मालकिणीवर फारच प्रेम होतं. मालकिणीच्या मृत्यूनंतर त्या जागी हा कुत्रा रखवालदारासारखा उभा असतो. मी त्याला रोज पाहतो, तो याच रस्त्यावर उभा असतो. खरंच, कुत्र्यांचं आणि माणसाचं नातं खूप सच्चं असतं," टॅक्सी ड्रायव्हर सांगतो.
सोशल मीडियावरच्या आणखी एका व्यक्तीचं म्हणणं आहे की, "हा छोटा कुत्रा खूप इमानी आहे. माझ्या कुटुंबातही एक असा कुत्रा होता जो माझ्या शाळेतून घरी येण्याची रोज वाट पाहायचा."
इतर नेटिझन्सना मात्र या कुत्र्याची काळजी वाटते आहे.
"भर रस्त्यात मधोमध उभं राहणं या कुत्र्यासाठी धोकादायक आहे. त्याला काही झालं म्हणजे? मला वाटतं की कोण्या भल्या व्यक्तीने त्याला दत्तक घ्यावं आणि सुरक्षित ठिकाणी न्यावं."
अर्थात चीनच्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊन लोकांची मनं जिंकणारा हा पहिलाच कुत्रा नाही.
या वर्षाच्या सुरूवातीलाच नेटिझन्स एका म्हाताऱ्या कुत्र्यावर फिदा झाले होते जो एका स्टेशनच्या बाहेर आपल्या मालकाची वाट पाहात होता.
जपानमध्ये 1920 च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर 'हचिको : द अकिता' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला कारण ही एका इमानी कुत्र्याची कथा आहे. हा कुत्रा त्याच्या मालकाला रोज रेल्वे स्टेशनवर भेटायचा. मालकाच्या मृत्यूनंतरही हा सिलसिला नऊ वर्ष चालू होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)