You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माणसाची आणि कुत्र्यांची मैत्री 9000 वर्षांपेक्षाही जुनी
- Author, हेलेन ब्रिग्ज
- Role, बीबीसी न्यूज
कुत्र्याला माणसाचा जवळचा मित्र म्हणतात. त्याला कारणंही तशीच आहेत. मानव इतिहासातील महत्त्वाच्या क्षणाचा तो साक्षीदार आणि सोबतीसुद्धा आहे. मानवाने पहिल्यांदा शेतीची सुरुवात केली तेव्हा हा कुत्रा त्याच्यासोबत होता.
शेळ्या-मेंढ्यांना घेऊन या पृथ्वीतलावरचे पहिले-वहिले शेतकरी पश्चिम आशियातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर कुत्रीही होती, असं वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे.
संशोधकांना सापडलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होतं की उत्क्रांतीच्या टप्प्यात लांडग्यांपासूनच पुढे वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांची निर्मिती झाली.
मध्य-पूर्वेत माणसाने सुपिक जमिनीवर शेतीची सुरुवात झाली. यात आजचा आधुनिक इराक, सिरीया, लेबेनॉन, जॉर्डन, इस्राईल आणि इजिप्त यांचा समावेश आहे.
शेतीआधी मानवाचे पूर्वज शिकार करून गुजराण करायचे. शेतीचा शोध लागल्यावर ते एका ठिकाणी स्थायिक झाले आणि गहू, जव, डाळी यांचं पिक घेऊ लागले.
याच दरम्यान त्यांनी जंगली गायी, मेंढ्या आणि डुकरांना माणसाळलं. जवळपास नऊ हजार वर्षांपूर्वी ते आपलं शेतीचं ज्ञान आणि त्यांचे पाळीव प्राणी घेऊन युरोप आणि आशियात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या बरोबर कुत्रीही होती.
मानव उत्क्रांतीचा हा इतिहास आपल्याला माहीत आहे.
मात्र मानवाच्या युरोप आणि आशिया प्रवासात त्यांच्यासोबत कुत्रेदेखील होते, हे नवीन अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
युरोप आणि आशियातल्या काही ऐतिहासिक ठिकाणांवरून कुत्र्यांच्या अवशेषांच्या डिएनएचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
त्यावरून पूर्वी मानवासोबत कुत्र्यांनीही भटकंती केल्याचं सिद्ध होतं.
फ्रान्समधल्या रेन्स विद्यापीठातले डॉ. मॉर्गन ऑलिव्हिअर सांगतात, "मानव आणि कुत्रे यांचा इतिहास एकमेकांत गुंतलेला आहे. मानवाने युरोपात पाय ठेवला तेव्हा कुत्रेही त्यांच्या मागेमागे गेले. मानव आणि कुत्रे एकत्र असायचे, हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे."
लांडग्यांचा कुत्र्यांपर्यंतचा प्रवास
- लांडग्यांपासून कुत्र्यांच्या उत्क्रांतीची ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे.
- जवळपास 20 ते 40 हजार वर्षांपूर्वी जंगली लांडग्यांना मानवाने माणसाळलं, तेव्हापासून त्यांच्यात बदल होत गेले आणि कुत्री विकसित झाली.
- हजारो मैल अंतरावर असलेल्या लांडग्यांच्या दोन वेगवेगळ्या जातींपासून कुत्री निर्माण झाल्याचा अंदाज आहे.
- माणसाने अनेक वर्ष पाळल्यामुळे लांडग्यांचं वर्तन आणि त्यांच्या जनुकांमध्ये बदल होत गेले आणि आजच्या आधुनिक युगातल्या कुत्र्यांचा जन्म झाला.
जेव्हा मानवासोबत युरोपात आलेल्या कुत्र्यांचा, युरोपात आधीच असलेल्या कुत्र्यांशी संबंध आला तेव्हा नव्याने जन्माला येणाऱ्या कुत्र्यांचा जीन पूल बदलला.
गेल्या अनेक शतकातल्या प्रजननाच्या प्रक्रियेत कुत्र्यांच्या जीनचे गुणधर्म अधिकाधिक बदलत गेले. आजच्या आधुनिक युगात जी कुत्री आपल्याला दिसतात ती मानवाच्या प्रवासात त्याची सोबत करणाऱ्या पूर्वीच्या कुत्र्यांपेक्षा खूप वेगळी आहेत.
Biology Letters या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)