You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हामिद अन्सारी : मैत्रिणीसाठी पाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या तरुणाची गोष्ट
- Author, शिराज हसन
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी, इस्लामाबाद
हेरगिरी आणि कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात प्रवेश केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात 3 वर्षांची शिक्षा झालेले भारतीय नागरिक हामिद निहाल अन्सारी आज भारतात परत आले. अट्टारी-वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हामिद यांना भारताच्या हवाली केलं.
यावेळी हामिदची आई फौजिया, वडील निहाल आणि भाऊसुद्धा तिथं हजर होते. 6 वर्षानंतर हामिदला पाहून या तिघांनाही आपले अश्रू आवरले नाहीत. यानंतर हामिद आणि त्याच्या कुटुंबानं भारतीय भूमीला डोकं टेकवून मदत करणाऱ्या अधिकारी आणि सरकारचे आभार मानले.
2012साली फेसबुकवरून झालेल्या मैत्रीने त्यांना आधी अफगाणिस्तान आणि नंतर पाकिस्तानात पोहोचवलं.
2012ला अन्सारी यांना पाकिस्तानातील कोहाट परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी मरदान इथल्या तुरुंगात झाली.
पण मुंबईतून ते पाकिस्तानात पोहोचले तरी कसे?
33 वर्षांचे हामिद अन्सारी मुंबईचे आहेत. त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात पदवी घेतली आहे. मुंबईतून बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी मुंबईतील एका कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम सुरू केलं होतं.
त्यांची आई फौजिया अन्सारी मुंबईत हिंदी विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्या कॉलेजमध्ये उपप्रचार्य पदावर कार्यरत आहेत. अन्सारीचे वडील बँक कर्मचारी तर भाऊ डेंटिस्ट आहे.
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील कैद्यांसंदर्भात काम करणारे पत्रकार जतीन देसाई सांगतात, "हामिद ओळख फेसबुकच्या माध्यमातून कोहाट इथल्या एका मुलीशी झाली होती. तिला भेटण्यासाठी हामिदला कोहाटला जायचं होतं."
देसाई सांगतात, "हामिद यांनी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश न आल्याने कोहाटामधील स्थानिक लोकांशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला."
काबुलच्या मार्गाने कोहाटला
4 नोव्हेंबर 2012ला त्यांनी मुंबईतून काबुलचं विमान पकडलं. एका विमान कंपनीत मुलाखत देण्यासाठी जातो, असं त्यांनी घरी सांगितलं होतं. ते 15 नोव्हेंबरला परत येणार होते. पण काबुलला गेल्यानंतर त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. त्यांचा फोन बंद पडल्यामुळे त्यांच्या घरच्यांना शंका वाटू लागली. असं सांगितलं जात या काळात त्यांनी काबुलवरून जलालाबाद आणि तिथून कुठल्याही कागदपत्रांशिवाय तोरखमच्या मार्गाने पाकिस्तान गाठलं. कुर्क इथं थांबून ते कोहाटला गेले.
पोलीस सांगतात त्यांनी कोहाटमध्ये हॉटेलमध्ये खोली बुक करण्यासाठी हमजा या नावाने खोटं ओळखपत्र सादर केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांना अटक केली.
अन्सारींच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की हमीदशी संपर्क होत नसल्याने त्यांनी हामिदच्या घरातील लॅपटॉप उघडून फेसबुक आणि ईमेलवरील संवाद वाचला. यावरून हामिद पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटमध्ये एका मुलीला भेटण्यासाठी जाऊ इच्छित होते, अशी माहिती त्यांना मिळाली.
हामिदच्या आईने नंतर असा दावा केला की हामिद यांनी फेसबुकवरून काही पाकिस्तानी लोकांशी संपर्क साधला आणि त्यानंतर हा मार्ग निवडला.
हामिदने चौकशीत बेकायदेशीरपणे अफगाणिस्तानत प्रवेश केल्याचं मान्य केल्याची माहिती पाकिस्तानमधील माहिती विभागाने सांगितलं होतं.
फेसबुकवर कोणाशी संपर्क साधला?
हामिदचे कुटुंबीय आणि प्रकरणावर काम करणाऱ्या संस्थांच्या मते हामिदने कोहाटमधील लोकांशी संपर्क साधला होता. पाकिस्तानात जाण्यासाठी मदत मिळावी, म्हणून त्यांनी हे संपर्क केले होते. या लोकांचे अकाऊंटची सत्यता पडताळता आलेली नाही, असं संबंधितांचं मत आहे.
2010 ते 2012 या कालावधीत पाकिस्तानात येण्याबद्दल त्यांनी ज्यांच्याशी संपर्क साधला त्यात कुर्कमधील अताउर्रहमान यांचा समावेश होता. याशिवाय हामिद अन्सारी सबा खान, हुमैरा हानिफ, साजिया खान या नावाच्या फेसबुक अकाऊंटशी त्यांनी संपर्क केला होता, असा दावा करण्यात आला. ही नावं कोर्टात सादरही करण्यात आली.
3 वर्षाची कैद
2012ला पाकिस्तानातून हामिद अन्सारी बेपत्ता झाल्यानंतर पेशावरच्या उच्च न्यायालयात फौजिया यांनी वकिलांच्या माध्यमातून हामिदचा ताबा मिळावा यासाठी हेबस कार्पस याचिका दाखल केली. पाकिस्तानच्या संरक्षण खात्याने हामिद यांना सुरक्षा संस्थांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्या विरोधात लष्करी न्यायालयात कारवाई सुरू आहे, अशी माहिती दिली. फेब्रुवारी 2016मध्ये एक लष्करी न्यायालयाने हामिद अन्सारीला हेरगिरीच्या आरोपाखाली 3 वर्षांची शिक्षा सुनावली. पाकिस्तानच्या प्रवक्त्याने हामिदने चौकशीत हेरगिरीचा आरोप मान्य केल्याचा दावा केला होता.
हामिद अन्सारी यांची सुटका होण्याच्या प्रकरणातला महत्वाचा मुद्दा म्हणजे जीनत शहजादी यांचं बेपत्ता होणं आहे. जीनत शहजादी लाहोरस्थित एका स्थानिक चॅनेलमध्ये काम करत होत्या. हमीद अन्सारी यांच्या कुटुंबीयाशी त्या संपर्कात होत्या.
जीनत यांनी हामिद यांच्या पालकांशी संपर्क साधला. हामिद यांचं जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याचा खटला पालकांच्या वतीने जीनत यांनी दाखल केला. जुलै 2015 मध्ये जीनत यांच्या मदतीमुळेच फौजिया अन्सारी यांनी तत्कालीन ISI प्रमुख लेफ्टनंट जनरल रिजवान अख्तर आणि महानिर्देशक लष्करी गुप्तचर लेफ्टनंट जनरल रिजवान सत्तार यांना पत्र लिहिण्यात आलं.
फौजिया यांच्यातर्फे लिहिण्यात आलेल्या पत्रात उर्दूमध्ये आमच्यावर दया करा असं म्हटलं होतं. याच काळात जीनत शहजादी बेपत्ता झाल्या.
मानवाधिकार कार्यकर्ते हिना जिलानी यांच्या मते जीनत 19 ऑगस्ट 2015 रोजी रिक्षातून ऑफिससाठी जात असताना दोन कोरोला गाड्यांनी त्यांचा रस्ता अडवला. या गाडीतून हत्यारबंद माणसं बाहेर पडली. या माणसांनी जीनत यांना जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं.
जीनत बेपत्ता झाल्यावर त्यांचा भाऊ सद्दामने आत्महत्या केली. सख्खी बहीण बेपत्ता झाल्याने सद्दाम खूप अस्वस्थ झाला होता असं जीनत यांच्या आईने बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
बेपत्ता झाल्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच 2017 मध्ये जीनत शहजादी यांची सुटका करण्यात आली. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळच्या भागातून जीनत यांची सुटका करण्यात आली असं बेपत्ता व्यक्तींसाठीच्या आयोगाचे प्रमुख न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी सांगितलं.
सुटका झाल्यानंतर जीनत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. प्रसारमाध्यमांशी बातचीत केलेली नाही.
हामिद यांची सुटका
हामिद अन्सारी यांची तीन वर्षांची शिक्षा 16 डिसेंबरला पूर्ण झाली. या दिवसानंतर त्यांना अटकेत ठेवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही.
हामिद यांच्या शिक्षेचा कालावधी 16 डिसेंबरला संपणार असल्याने त्यांच्या मायदेशी परतण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता प्राधान्याने करावी अशी याचिका हामिद यांचे वकील काजी महमूद अन्वर यांनी दाखल केली होती. जेणे करून हामिद यांना अडथळ्यांविना भारतात परतता येईल.
या याचिकेवर पेशावर उच्च न्यायालयाने आदेश देताना पाकिस्तान सरकारला नोटीस देत सुटकेची कागदपत्रं तयार करण्याचे आदेश दिले होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भारत-पाकिस्तान कराराअंतर्गत त्याच दिवशी वाघा बॉर्डरवर हामिद यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
काजी महमूद यांच्या मते गेल्या शनिवारी मरदान जेलचे अधीक्षक आणि लष्कराच्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतर हामिद यांच्या सुटकेसंदर्भात आणखी एक याचिका पेशावर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
लष्करी गुप्तचर यंत्रणांकडून अनुमती मिळाल्यानंतर हामिद यांच्या परतीच्या प्रवासासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भारतीय दूतावासाशी संपर्क करण्यात आला असं पाकिस्तान सरकारने उच्च न्यायालयाला सांगितलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान कैद्यांच्या अदलाबदलीसाठी 2008 मध्ये एक करार झाला होता. शिक्षेचा कालावधी पूर्ण करणाऱ्या कैद्यांना वाघा बॉर्डरवर समोरच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं जातं. एखाद्या कैद्याचे परतीची कागदपत्रं तयार नसतील तर एका महिन्याच्या आत सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येते.
हामिद अन्सारी यांची कागदपत्रं तयार असल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
सुटकेसाठी आतूर हामिद अन्सारी
''दोन्ही देशांच्या सरकारांनी हमीद यांच्या प्रकरणाकडे मानवाधिकारांच्या दृष्टीने बघावं. करतारपूर कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली. दोन्ही देशातले दुरावलेले संबंध थोडं निवळताना दिसत आहेत. मानवतेच्या माध्यमातून हामिद यांची घरवापसी झाली तर संबंध आणखी सुधारू शकतात. हामिद यांच्या आईवडिलांना मुलाच्या परत येण्याची कल्पना देण्यात आली आहे," असं जतीन देसाई यांनी सांगितलं.
30 नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांना हामिद अन्सारी यांच्यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, "त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मला या खटल्याबद्दल कल्पना नाही पण मी याप्रकरणी लक्ष घालेन."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)