जैन मंदिर चौक बनलं बाबरी मशीद चौक : पाकिस्तानात दिली गेली हिंदू स्थळांना मुस्लीम नावं

    • Author, शुमैला जाफरी
    • Role, बीबीसी, इस्लामाबाद

उत्तर प्रदेशात योगी सरकारने शहरांची मुस्लीम नाव बदलून हिंदू करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. त्यावरून बरीच टीका, विनोद आणि त्याचं समर्थनही होतंय. मात्र अशा नामांतरात आपला शेजारी पाकिस्तानही मागे नव्हता. पाकिस्तानातही मुस्लिमेतर भाग आणि शहरांची नावं बदलून मुस्लीम नावं ठेवलेली आहेत.

पाकिस्तानात नामांतराची ही लाट फाळणीपासून सुरू झाली होती. नव्याने निर्माण झालेल्या या देशाने स्वतःला भारतीय वारशापासून वेगळं केलं. खरंतर या राष्ट्राने दक्षिण आशियापासून दूर अरब राष्ट्रांच्या जवळ जाणारी स्वतःची नवी ओळख, मुस्लीम ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला.

या नामांतराची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ लाहोरपासून 50 किलोमीटरवर असलेल्या एका छोट्या शहराचं नाव 'भाई फेरू' होतं. एका शीख भक्ताच्या नावावर हे नाव ठेवलं होतं. शिखांचे सातवे गुरू या ठिकाणी गेले असताना तिथल्या भाई फेरुच्या भक्तीने ते भारावून गेले आणि या शहराला त्यांचं नाव दिलं. या शहराचं नाव आता 'फूल नगर' ठेवण्यात आलं आहे.

लाहोरमध्येही अनेक भागांची नावं हिंदू किंवा शीख आहेत. जसे एका भागाचं नाव कृष्ण नगर होतं. त्याला इस्लामपुरा नाव देण्यात आलं. जैन मंदिर चौकाचं नाव अधिकृतपणे 'बाबरी मशीद चौक' करण्यात आलं.

भारतात बाबरी मशीद पाडल्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानात जैन मंदिर पाडण्यात आलं होतं. बलुचिस्तानातल्या 'हिंदू बाग' भागाचं नाव बदलून 'मुस्लीम बाग' करण्यात आलं.

नावं बदलली असली तरी रोजच्या वापरात जुन्याच नावांचा उल्लेख होतो. शिवाय पाकिस्तानात अजूनही अनेक ठिकाणांना हिंदू किंवा शीख नावं आहेत.

लाहोरमध्ये दयाल सिंह महाविद्यालय, गुलाब देवी आणि गंगाराम हॉस्पिटल, किला गुज्जर सिंह भाग, लक्ष्मी चौक, संतनगर आणि कोट राधा कृष्ण अजूनही आहेत.

कराचीत गुरू मंदिर चौरंगी, आत्माराम प्रितमदास रोड, रामचंद्र मंदिर रोड आणि कुमार रोड, बलुचिस्तानात हिंग्लज आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात हरीपूर नावं आजही दिसतात.

आणि आता भारत आपल्या धर्मनिरपेक्ष मार्गावरून भरकटून 'नवीन पाकिस्तान' बनत असताना पाकिस्तान मात्र आपल्या इतिहासातून धडा घेताना दिसतोय. पण त्यासाठी नरसंहार आणि कट्टरतावादासारखी मोठी किंमत त्याला चुकवावी लागली आहे.

पाकिस्तानात आता मात्र विविधतेचा स्वीकार होताना दिसतोय. गेल्या काही वर्षांत धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये पाकिस्तान त्यांचाही आहे, ही भावना रुजवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

त्यांना सैन्य आणि मुख्य प्रवाहाच्या राजकारणात सामावून घेतलं जातंय. त्यांचा धार्मिक वारसा आणि धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचेही प्रयत्न होत आहेत.

पाकिस्तानला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र खूप वर्षांनंतर पाकिस्तान योग्य दिशेने वाटचाल करतोय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)