'औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव कधी करणार ?' - #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात :-

1. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव कधी करणार? - राऊत यांचा सवाल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामांतर केले. तर अयोध्येतील प्रस्तावित विमानतळास श्रीराम आणि वैद्यकीय महाविद्यालयाला दशरथ असे नाव देण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामांतर कधी करणार? असा सवाल केला आहे. सामनानं या बाबतची बातमी दिली आहे.

राऊत म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांना नामोहरम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाने खडकी या शहराचे नाव बदलून औरंगाबाद ठेवले होते, तर हैदराबादचा एक निजाम असलेल्या मीर अस्मान अली खान याच्या नावावर धाराशिवचे नाव बदलून उस्मानाबाद ठेवण्यात आले."

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने या शहरांची नावे बदलून संभाजीनगर आणि धाराशिव केली जावी अशी मागणी केली होती, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2. ऊस दर आंदोलन - स्वाभिमानीचा ११ रोजी चक्का जामचा इशारा

ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून या मुद्द्यावर ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत दिला.

लोकमतने ही बातमी दिली आहे. यंदाच्या ऊस हंगामात दरावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना साखर कारखानदारांनी परस्पर हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. पण पहिली उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशार शेट्टी यांनी दिला असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

3. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिला सरपंचाने ठेवलं मंगळसूत्र गहाण

नाशिकमधील एकलहरे या गावात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन थकू नये, म्हणून तिथल्या महिला सरपंच मोहिनी जाधव यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उपलब्ध केल्याची बातमी ZEE 24 तासनं दिली आहे.

पैशांचा तुटवडा असल्याने कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं होतं. पण कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून जाधव यांनी त्यांचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि पैसे उपलब्ध करुन दिले. जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेत गहाण ठेवत 75 हजार रुपये कर्ज घेतलं. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन दिल, असं या बातमीत म्हटलं आहे.

4. लक्ष्मीपूजनाला फटाकेबंदीची ऐशीतैशी, '8 ते 10'शिवायही आतषबाजी

देशभरात सुप्रीम कोर्टानं लागू केलेल्या फटाकेबंदीची नागरिकांनी ऐशीतेशी केल्याचं लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं दिसून आल्याची बातमी एबीपी माझानं दिली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच आतषबाजीला सुरुवात झाली तर मुंबईत मरिन ड्राईव्हवर पोलीस बंदोबस्तामुळे रात्री आठच्या आधी कोणी फटाके फोडले नाहीत. मात्र दहा वाजून गेल्यावरही मुंबईकरांचा फटाके फोडून जल्लोष सुरूच होता, असं या बातमीत म्हटलं आहे.

5. महापौर बंगला ठाकरे स्मारक समितीकडे हस्तांतरित

दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. एक रुपया नाममात्र भाड्याने हा अडीच एकरचा परिसर या न्यासाला देण्यात आला आहे. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील बंगल्यात राहायला जाणार आहेत.

हेरिटेज वास्तू असलेल्या महापौर बंगल्याच्या दर्शनी भागात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे ठाकरे स्मारक भूमिगत होण्याची शक्‍यता आहे. सकाळनं याबाबतचं वृत्तं दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)