You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका मध्यावधी निवडणुका : कनिष्ठ सभागृह गमावलं, पण सिनेटवर ट्रंप यांच्याच पक्षाचा दबदबा
अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या प्रशासनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आठ वर्षांनंतर कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅट्सच्या वर्चस्वामुळे ट्रंप यांच्या काँग्रेसच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवण्याच्या मोहिमेला खीळ बसणार आहे.
मात्र सिनेटमध्ये ट्रंप यांच्या रिपब्लिक पक्षाने आपलं स्थान मजबूत केलं आहे. त्यामुळे ट्रंप यांना न्याधीशांच्या आणि इतर महत्त्वाच्या नेमणूका त्यांच्या मता प्रमाणे करता येणार आहेत.
मंगळवारी झालेल्या मध्यवर्ती निवडणुका म्हणजे ट्रंप प्रशासनाबाबत जनमताचा कौलचाचणी सारख्या होत्या. पण अजून 2020च्या निवडणुकांबाबत ट्रंप यांनी कुठलंही वक्तव्य केलंलं नाही.
निवडणुकांचे निकाल विरोधी पक्षांसाठी आश्वासक चित्र निर्माण करणारे आहेत.
नॅन्सी पेलोसी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सभापती असणार आहेत. त्यांनी 2007 ते 2011 या कालावधीत सभापतीपद भूषवलं होतं. वॉशिंग्टन शहरात जमलेल्या उत्साही गर्दीला त्यांनी संबोधित केलं.
'तुम्हा सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. अमेरिकेच्या नागरिकांसाठी उद्याचा दिवस नवी उमेद घेऊन येणारी असेल', असं पेलोसी यांनी सांगितलं.
रिपब्लिकन पक्षानं इंडियाना, टेक्सास आणि उत्तर डाकोटा या सिनेटच्या जागा जिंकल्या आहेत.
आठ वर्षांत प्रथमच काँग्रेसच्या खालच्या सभागृहात डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे त्यांना आता ट्रंप यांचा अजेंडा रोखणं शक्य होणार आहे.
व्हाईट हाऊसमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात मध्यावधी निवडणुकांचा कौल जाणं हा ऐतिहासिक कल पुन्हा परतल्याचं मानलं जात आहे.
आतापर्यंत काय घडलं?
- रिपब्लिकन पक्षानं 51 जागांसह सेनेटमधली आघाडी कायम राखली आहे.
- हाऊसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षानं 218 जागा जिंकून हाऊसचं नियंत्रण मिळवलं आहे.
- तसंच, रिपब्लिकन पक्षाकडून सहा गर्व्हनर पदे ताब्यात घेतली असून तिथेही तुर्तास आघाडी घेतली आहे.
ट्रंप यांना कौतुक
ट्रंप यांनी सेनेटमधील विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांचं कौतुक करणारं एक ट्वीवटही केलं आहे. "105 वर्षांत केवळ पाचव्यांदाच विद्यमान अध्यक्षांना सेनेटमधलं स्थान राखता आलं आहे...." असं राजकीय समालोचकाचं निरिक्षण ट्रंप यांनी दिलं आहे.
सर्वांत तरुण प्रतिनिधी
अलेक्झांड्रिया अकॉसिओ-कोर्टझ आणि अॅबी फिंकेनॉवर या दोन्ही 29 वर्षांच्या सर्वांत तरुण प्रतिनिधी हाऊसमध्ये निवडून आल्या आहेत. दोघीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. अलेक्झांड्रिया न्यूयॉर्क-13 डिस्ट्रिक्टमधून तर अॅबी या आयोवा - फर्स्ट डिस्ट्रिक्टमधून निवडून आल्या आहेत.
महिलांचा विक्रम
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार, हाऊसमध्ये एकूण 89 महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. यापूर्वी महिला प्रतिनिधींचा आकडा 84पर्यंत गेला होता. डेमोक्रॅटिक पक्षाकडून इल्हान उमर आणि रशिदा तालिब या दोन मुस्लिम महिलाही प्रथमच निवडून आल्या आहेत.
हाऊसमधल्या विजयाकडे वाटचाल करत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी समर्थकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "आजचा दिवस हा हारजितीपेक्षा नियंत्रण आणि समन्वय साधण्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे."
ट्रंप यांनी मानले आभार!
निकाल जाहीर होऊ लागल्यानंतर डोनाल्ड ट्रंप ट्वीटद्वारे मतदारांचे आभार मानले.
इंडियानाच्या जागेवर डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव झाला आहे. हा डेमॉक्रॅटिक पक्षासाठी मोठाच धक्का मानला जात आहे.
"आम्हाला सध्याच्या परिस्थितीत काहीही धोका नाही," असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सॅण्डर्स यांनी स्पष्ट केलं. "निकाल आले की त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात राष्ट्राध्यक्षांनाचा दिलं जाईल," असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अॅंथनी झुकर सांगतात, "ट्रंप यांनी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या काळात सगळा फोकस स्वत:वरच राहील, अशा दृष्टीनं प्रचार मोहीम राबवली. त्याचा त्यांना इंडियाना आणि टेनसी या प्रातांत फायदा होत असल्याचं चित्र आहे."
मध्यावधी निवडणुका
अमेरिकन कॉंग्रेसच्या सर्व 435 जागा, सीनेटच्या 100पैकी 35 जागा आणि 50 राज्यांपैकी 36 राज्यांचे गर्व्हनर यांची निवड करण्यासाठी या निवडणुका होत आहेत. डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या मध्यावर होत असलेल्या या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जातं.
ट्रंप थेट निवडणुकीत उभे नसले तरी या निवडणुकीचा चेहरा तेच आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांच्या इतिहासात मध्यावधी निवडणुकांची मोठी चर्चा प्रथमच होत आहे.
आपल्याकडे जशी राज्यसभा असते तसं तिथं सिनेट हे सभागृह आहे.
रिपब्लिकन पक्षाकडे 51 तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे 49 जागा होत्या. सिनेटच्या एक तृतीयांश जागांसाठी मध्यावधी निवडणुका झाल्या.
अमेरिकेच्या दुसऱ्या सभागृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. या सभागृहात 240 सदस्य रिपब्लिकन तर 195 डेमोक्रॅटिक पक्षाचे होते.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना पायउतार करण्यासाठी विरोधी पक्ष सरसावला आहे. मात्र त्यासाठी सभागृहातल्या सदस्यांची मंजुरी लागते. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत असं घडलेले नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)