You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत चीनची ढवळाढवळ – ट्रंप यांचा आरोप
अमेरिकेत होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकीत आपल्याविरोधात चीन कारस्थान करत असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात ट्रंप यांनी केला आहे.
न्यूयॉर्कमध्ये UNच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यावधी निवडणुकीतल्या चीनच्या हस्तक्षेपाचा मुद्दा देशविदेशातल्या बड्या नेत्यांसमोर मांडला. अमेरिकेत 6 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका होणार आहेत.
"माझा पराजय व्हावा अशी त्यांची इच्छा आहे, कारण व्यापाराच्या मुद्द्यावर त्यांना आव्हान देणारा मी पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहे," असं ट्रंप म्हणाले.
अर्थात, ट्रंप यांनी या आरोपांच्या पुष्ट्यर्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार शुल्कावरून जोरदार वाद सुरू आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र ट्रंप यांचे हे आरोप अयोग्य असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.
बैठक कशासाठी आणि झालं काय...
आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्रांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी UNच्या सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. ट्रंप यांनी हीच संधी साधत चीनला लक्ष्य केलं.
ट्रंप म्हणाले की, "नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत माझ्या विरोधात चीन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे, ही दु:खदायक गोष्ट आहे."
"मी जिंकू नये असं त्यांना वाटतं, कारण मी त्यांना व्यापाराच्या मुद्द्यावर आव्हान दिलं आहे. त्यात आमचा विजयही होत आहे. प्रत्येक आघाडीवर आम्ही जिंकत आहोत. त्यांनी आमच्या निवडणुकांमध्ये दखल द्यावी, असं मला वाटत नाही," असं ट्रंप यांनी स्पष्ट केलं.
चीनचं उत्तर
ट्रंप यांनी केलेल्या आरोपांना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी उत्तर दिलं. ते सुरक्षा परिषदेतच म्हणाले की चीन इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत नाही.
"इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचं धोरण चीनने आजवर अवलंबलेलं नाही. चीनच्या परराष्ट्र धोरणाची ती परंपराच नाही. चीनवर करण्यात आलेले आरोप अयोग्य असल्याने मी ते फेटाळतो," असं वांग यी म्हणाले.
त्यानंतर, ट्रंप यांनी ट्वीट केलं आणि चीनमधील वृत्तपत्रांची कात्रणं जोडून हा 'प्रपोगांडा' असल्याचं त्यात लिहिलं.
ट्रंप प्रशासनानं यापूर्वीही चीनवर निवडणुकांतल्या हस्तक्षेपाचा आरोप केला होता.
गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटलं की, रशिया, उत्तर कोरिया, इराण आणि चीन हे देश अमेरिकेतील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याची योजना आखत आहेत.
ट्रेड वॉर
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध पेटलेलं आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या देशातून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर कर वाढवण्यास सुरुवात केली आहे.
सप्टेंबरमध्ये ट्रंप प्रशासनानं चीनी उत्पादनांवर 200 अब्ज डॉलरचं शुल्क आकारण्याचा आदेश दिला. त्यापूर्वीही अमेरिकेनं चीनच्या उत्पादनांवर 50 अब्ज डॉलरचं आयात शुल्क आकारलं होतं.
प्रत्युत्तरादाखल चीननंही तेवढ्याच किमतीचं आयात शुल्क आकारलं.
दोन्ही देशांच्या लष्करी संबंधांतही कटुता आली आहे. अमेरिकेनं चीनच्या लष्करानं रशियाकडून शस्त्र खरेदी केल्यामुळे चीनवर निर्बंध घातले.
त्याला उत्तर देताना, चीननं अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या नौदलाच्या प्रमुखाला परत बोलावून घेतलं आणि दोन्ही देशातली लष्करी चर्चा स्थगित केली.
त्याशिवाय, चीननं अमेरिकेच्या नौदलाच्या एका जहाजाला हाँगकाँगमध्ये थांबू दिलं नाही.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)