'भारत शत्रुराष्ट्र आहे, पण काही बाबतीत आमच्या सारखाच आहे'

    • Author, वुअसतुल्लाह खान
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, पाकिस्तानहून बीबीसीसाठी

जेवढ्या धर्माधारित संघटना आणि सत्ताधारी संस्था आहेत त्या एकमेकांच्या शत्रू असूनही त्यांना एकाच विचारधारेच्या चश्म्यातून पाणी पिण्यास काहीच हरकत का नाही, हे मला आजवर कळलेलं नाही.

उदाहरणार्थ उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणी हिंदू जहालमतवाद्यांसाठीही देशद्रोहासारखीच आहे. मुस्लीम कट्टरतावादीसुद्धा त्यांना गद्दार आणि धर्माचे शत्रू मानतात.

हिंदू आणि मुस्लीम जहालमतवादी सेक्युलर शिक्षण तर मोठ्या आनंदाने घेतात. नवनवीन गॅझेट, गाड्या, स्वॉफ्टवेअर वापरण्यात त्यांना संकोच वाटत नाही.

कोणताच कट्टरतावादी मोबाईल फोनचं नवं मॉडेल घ्यायला नकार देणार नाही. मात्र नवे विचार अंगिकारणं तर सोडा ते ऐकून घ्यायलाही नकार देऊन तुमच्याच तोंडावर हात ठेवील.

पश्चिमेकडे प्रबोधनाच्या काळात इतर अनेक सुधारणांसोबतच वैज्ञानिक विचार आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी विद्यापीठंही मोठ्या संख्येनं स्थापन करण्यात आली.

हळूहळू ही विद्यापीठं नवीन विचारांचं स्फुलिंग उमलवणारी ठिकाणं झाली. कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक, कुठल्याही विषयावर प्रश्न विचारू शकतो आणि त्याचं उत्तर हात उगारून किंवा शिव्या देऊन नाही तर तर्काने द्यावं लागायचं.

मात्र जग ज्या काळापासून जीव मुठीत धरून पळालं त्याच काळात पुन्हा ढकललं जात आहे, असं वाटतंय. फॅसिस्ट विचारसरणीने राजकारणाला कवेत सामावल्यानंतर आता विद्यापीठांमधूनही ऑक्सिजन कमी करताना दिसतेय.

हळूहळू विद्यापीठांना धार्मिक मदरशांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न होत आहेत आणि प्रश्न विचारणं गुन्हा ठरू लागला आहे.

पाकिस्तानात धर्मनिरपेक्ष नेते खान अब्दुल वली खान यांच्या नावावर स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठात गेल्या वर्षी मशाल खान नावाच्या विद्यार्थ्याला ईश्वरनिंदेच्या खोट्या आरोपावरून त्याच्याच मित्रांनी ठार केलं होतं, हे तुम्हाला आठवतच असेल.

या हत्येच्या आरोपात केवळ पाच जण सध्या तुरुंगात आहेत, इतर सर्वांची मुक्तता झाली आहे.

डॉ. मुबारक अली पाकिस्तानचे सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत. मात्र त्यांना शिक्षणाचं कार्य देण्यात कुठल्याही विद्यापीठाला भीती वाटते. डॉ. परवेज हूद यांच्याकडे धार्मिक संघटना संशयाच्या नजरेने बघतात.

सरकारी विद्यापीठांमध्ये शिकवणारे बहुतांश प्राध्यापक ना प्रश्न विचारण्याची परवानगी देतात ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोकळेपणाने समजवून सांगतात.

जो काही कोर्स आहे तो मोठे पोपट लहान पोपटांना शिकवत आहेत.

अशा परिस्थितीत सीमेपलिकडून जेव्हा ही बातमी येते की प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी धमक्या मिळाल्यानंतर अहमदाबाद विद्यापीठात शिकवायला नकार दिला आहे किंवा दिल्ली विद्यापीठातल्या पदव्युत्तर शिक्षणातून प्राध्यापक कांचा इलैया यांची पुस्तकं काढून टाकण्यात आली आहेत किंवा विद्यापीठात आता असं कुठलंच सेमिनार किंवा वर्कशॉप असं होऊ शकत नाही, ज्यामुळे सरकारची नाराजी ओढावण्याची भीती असेल, तेव्हा मला खूप आनंद होतो.

आनंद याचा की आपण एकटे नाही. शेजारी शत्रू असला तरी त्याची सोबत तितकीही वाईट नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)