You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपाननं 2018ला ठरवलं 'सर्वनाशा'चं वर्ष
2018 या वर्षाबद्दल तुम्ही जर एका शब्दात सांगायचं असेल तर तो काय असेल?
जपानने या वर्षासाठी एका अशा चिन्हाची निवड केली आहे, ज्याचा अर्थ होतो 'सर्वनाश'.
जपानमधल्या टीव्ही चॅनेलने या शब्द घोषणा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं. क्योटो शहरातील एका पारंपरिक मंदिरातील मास्टरने एका पॅनेलवर हा शब्द लिहिला.
यावर्षी जपानमध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्या पार्श्वभूमीवर वार्षिक मतदानात जनतेने या कांजी चिन्हाला मत दिलं. त्याचा उच्चार साय असा केला जातो.
जपानमध्ये यावर्षी पूर, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेची लाट अशी अनेक संकटं आली. या संकटांचा जपानच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.
या आपत्तींमुळे झालेल्या नुकसानामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 1.2 टक्क्यांनी घसरला आहे.
जपानसाठी संकटाचं वर्ष
- जुलै महिन्यात आलेल्या पुराने 200 लोकांचा जीव घेतला आणि जवळजवळ 90 लाख लोकांचं स्थलांतर करावं लागलं.
- त्याच महिन्यात 65 लोकांचा उष्णतेच्या लाटेत मृत्यू झाला. यात 22,000 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
- जपानमध्ये जेबी नावाचं चक्रीवादळ आलं. या वादळाचा वेग 172 किमी प्रतितास होता. गेल्या 25 वर्षातलं हे सगळ्यांत भीषण चक्रीवादळ होतं.
- होकाईडो या भागात 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खल्लन झालं होतं.
क्योटोमध्ये कांजी अप्टिट्युड फाऊंडेशन या संस्थेतर्फे 1995 पासून दरवर्षी ही स्पर्धा भरवण्यात येते.
यावर्षीचं जे चिन्ह आहे त्याचा इंग्रजीत उल्लेख साय असा होतो. जवळजवळ 21,000 लोकांनी या चिन्हाची निवड केली आहे. शांततेसाठी असणाऱ्या चिन्हाचा दुसरा क्रमांक आहे.
उत्तर कोरियाने अणुचाचण्या केल्यानंतर 2017 मध्ये नॉर्थ हे चिन्ह निवडण्यात आलं होतं. 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक्सनंतर गोल्ड हे चिन्ह ठरवण्यात आलं होतं.
कांजी हे चीन भाषेतील चिन्ह जपानी आणि इतर भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)