You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
G20 परिषदेत मोदी उवाच : जपान, अमेरिका, इंडिया म्हणजे 'जय'
वार्षिक G20 परिषदेसाठी जागतिक नेते अर्जेंटिनात दाखल झाले आहेत. रशिया आणि युक्रेनमधला तणाव तसंच अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारावरून सुरू असलेल्या चढाओढीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे.
रशियाने युक्रेनचं एक जहाज ताब्यात घेतल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी पूर्वनियोजित बैठक रद्द केली. काळ्या समुद्रातल्या या घटनेत रशियाने युक्रेनच्या 24 खलाशांना ताब्यात घेतलं होतं.
शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत इंधनाच्या वाढत्या किमतीवर बोलण्याची शक्यता आहे. त्यांनी गुरुवारी ब्युनोस एरिसमध्ये 'योगाद्वारे शांतता' या कार्यक्रमाने आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.
या परिषदेसाठी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एरिसमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात यजमान राष्ट्राध्यक्ष यांनी सर्व सहभागी देशांना आवाहन केलं की "फक्त चर्चांमधूनच सगळे प्रश्न सुटतील, आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे."
परिषदेच्या सुरुवातीला भारत, जपान आणि अमेरिका यांच्या त्रिपक्षीय चर्चा झाली. यावेळी भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले की "जपान, अमेरिका आणि इंडिया एकत्र आल्यावर JAI (अर्थात जय) होतो. ही एक चांगली गोष्ट आहे."
G20 काय आहे?
जगातली सर्वाधिक औद्योगिकरण झालेली 19 राष्ट्रं आणि युरोपीय महासंघ यांचा मिळून G20 हा समूह आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन आणि अमेरिका, हे सर्व या समूहाचे सदस्य आहेत.
दक्षिण अमेरिकेत होत असलेली G20 परिषद पहिल्यांदाच अर्जेंटिनात होतेय. यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 20,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शुक्रवारी सुरू झालेल्या या दोन दिवसीय परिषदेचा उद्देश "स्वच्छ आणि शाश्वत विकास" असल्याचं परिषदेच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.
शुक्रवारी सर्व बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती तसंच शहरातलं मुख्य व्यापारी केंद्रंही बंद ठेवण्यात आले होते.
गेल्या वर्षी जर्मनीच्या हॅमबर्ग शहरात ही परिषद झाली होती. त्यावेळी हिंसक आंदोलनाचं गालबोट या परिषदेला लागलं होतं.
परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चीनवर लादण्यात आलेल्या निर्बंधांविषयी चर्चा करणार होते. मात्र ही आशा आता धुसर होताना दिसतेय.
जगातल्या या दोन आर्थिक महासत्तांध्ये व्यापार युद्ध सुरू झालं आहे आणि ते अधिक चिघळण्याचीच चिन्हं अधिक आहेत.
या चर्चेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक हवामान बदल.
ब्राझीलचे अध्यक्ष झैर बोल्सोनारो यांनी पॅरिस पर्यावरण करारातून काढता पाय घेतला तर आपण दक्षिण अमेरिकेचा व्यापारी संघ असलेल्या मर्कोझर ब्लॉकशी व्यापारी करार करायला नकार देऊ, असं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. AFP या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे.
टर्कीमध्ये गेल्या महिन्यात सौदीचे ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा खून झाला होता. त्यात सौदी सरकारच्या कथित सहभागावरून प्रश्नांची सरबत्ती सुरू असल्याने सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासाठीही ही परिषद मुत्सद्देगिरीची कसोटी ठरण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या तणावाबद्दल कोण काय म्हणालं?
रशियाने काळ्या समुद्रात ताब्यात घेतलेली युक्रेनची जहाजं आणि खलाशांना परत मायदेशी पाठवलेलं नाही. त्यामुळे आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटणार नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
या निर्णयाला आणखी एक किनार आहे. ती म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचे माजी वकील मायकल कोहन यांनी 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांच्या रशियातल्या मालमत्तेविषयी अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहाला खोटी माहिती दिल्याचं सिद्ध झालं होतं.
भेट रद्द करण्याचा निर्णय दुःखद असल्याचं पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्को यांनी म्हटलं आहे. मात्र बैठक रद्द झाल्याच्या निर्णयावर त्यांनी जी आधी प्रतिक्रिया दिली होती, त्यात ते म्हणाले होते, "असं असेल (ट्रंप यांनी बैठक रद्द केली असेल) तर परिषदेत राष्ट्राध्यक्षांना (पुतिन यांना) इतर उपयुक्त बैठका घेण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ मिळेल."
या वादासाठी 'पूर्णपणे' रशिया जबाबदार असल्याचं जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनी म्हटलं आहे. पुतिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पण त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मर्केल यांना स्वतःलाच परिषदेत पोहोचायला उशीर झाला.
मर्केल यांच्या विमानाला गुरुवारी रात्री कलोनमध्ये तातडीनं उतरवण्यात आलं. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर त्या पुन्हा रवाना झाल्या. मात्र तोवर ब्युनोस एरिसमध्ये इतर नेत्यांनी चर्चेला सुरुवात केली होती.
चीन अमेरिकेमधलं व्यापार युद्ध किती तीव्र?
चीनच्या 200 अब्ज डॉलरच्या आयातीवर सध्या असलेल्या शुल्कात नियोजित वाढ करणार असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. चीन अमेरिकेत करत असलेल्या 267 अब्ज डॉलरच्या इतर निर्यातीवरही शुल्क लावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
व्हाईट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना चीनला नवा करार करायचा आहे, असं डोनाल्ड ट्रंप म्हणाले होते. मात्र "मला करायचा आहे की नाही, हे मला माहीत नाही आणि सध्या असलेला करारच मला पसंत आहे," असं त्यांनी म्हटलं होतं.
मात्र आपण आशावादी असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग झुआंग यांनी म्हटलं आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले, "अमेरिका प्रामाणिकपणा दाखवून दोन्ही देशांना मान्य असेल, असा प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढे येऊ शकते."
अमेरिकेने जुलैपासून चीनच्या 250 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर शुल्क आकारलं आहे. प्रत्युतरादाखल चीनने अमेरिकेच्या 110 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जकात लावली आहे.
कॅपिटल इकॉनॉमिक्सचे ज्युलियन इव्हन्स-प्रिचर्ड म्हणतात, "माझ्या मते सर्वांत जास्त शक्यता काय दिसते तर (चीनचे अध्यक्ष) शी जिनपिंग हे ट्रंप यांना मोठ्या सवलती देणार नाहीत आणि त्यामुळे G20 बैठकीतून फार काही निष्पन्न होणार नाही."
सौदी युवराजांची मुत्सद्देगिरीचं कौशल्य पणाला
इस्तंबुलमधल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात 2 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोज्गी यांची हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप व्यक्त होतोय. या हत्येत सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या 17 सौदी नागरिकांवर कॅनडानं बंदी घातली आहे.
आपण युवराज सलमान यांना भेटून "अगदी स्पष्ट" संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, "खाशोज्गी यांच्याबाबत काय घडलं, याचा संपूर्ण आणि पारदर्शक तपास आम्हाला अपेक्षित आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)