You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण कोरियात तरुणी उतरवत आहेत मेकअप
चेहऱ्यावरचे मेकअपचे थर पुसून आपण जसे आहोत, तसे इतरांना सामोरे जाण्याची मोहीम दक्षिण कोरियात सुरू झाली आहे. मात्र स्वतःलाच स्वीकारण्याच्या या प्रयत्नाचे स्वागत होण्याऐवजी त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.
दक्षिण कोरियातील यू-ट्यूब स्टार लीना बी हिने या 'नो मेक-अप' मोहिमेला सुरुवात केली. चेहऱ्यावरील मेकअप उतरविण्याचे ट्युटोरिअल्स लीनाने यू-ट्युबवर टाकले. ही गोष्ट सहजासहजी स्वीकारली जाणार नाही, याची तिला कल्पना होती. मात्र थेट जीवे मारण्याच्या धमक्या मिळणे हे तिच्यासाठी धक्कादायक होतं. पण 21 वर्षीय लीनाने पूर्ण विचारांती निर्णय घेतला होता.
एरवी मेकअप कसा करायचा याचे धडे देणाऱ्यांना 'मेकअप नको' असे प्रमोट करणारा व्हीडिओ अपलोड करणं कितपत पचनी पडेल, याची लीनाला चिंता होती. मात्र कोरियन महिलांच्या स्वतःला सौंदर्यप्रसाधनांच्या थराखाली दडवायच्या सवयीविरोधात ठामपणे भूमिका घेण्याची वेळ आली आहे, हेदेखील तिला कळत होतं.
"मेकअपशिवाय आपला चेहरा इतरांना दाखवण्याची भीती कोरियन महिलांच्या मनात बसली आहे. तुम्ही दिसायला कुरूप आहात, हे ऐकणंच महिलांना अपमानास्पद वाटतं. मलाही तसंच वाटायचं," या मोहिमेबद्दल बोलताना लीनाने सांगितले.
पण तिने धाडसाने आपल्या खोटया पापण्या काढतानाचा, गडद लाल रंगाची लिपस्टिक पुसतानाचा व्हीडिओ अपलोड केला. त्यानंतर काही वेळातच पाच लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. काहींनी तिला पाठिंबा दिला, पण बहुतांश जणांनी तिच्यावर टीका दिली. काहींनी तर 'आम्ही तुला शोधून जीवे मारू' अशी धमकीही दिली. "अशा धमक्या मिळाल्यानंतर घराबाहेर पडण्याचीही भीती वाटत होती," असं लीनानं म्हटलं.
दक्षिण कोरियातील अनेक तरुण मुली लीना बीच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. 'मेक-अपच्या थरापासून सुटका' असं नावच त्यांनी आपल्या अभियानाला दिलं आहे. या मुलींना आपल्या लांब केसांना कात्री लावली, कॉस्मेटिक्स पुसून टाकले आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. समाजाने सौंदर्याच्या ज्या पारंपरिक कल्पना मुलींवर लादल्या आहेत, त्याविरोधात कोरियातील तरुण मुली आपला निषेध व्यक्त करत आहेत.
नोकरीसाठी प्लास्टिक सर्जरी?
कोरियामधे लहानपणापासूनच मुलींवर सुंदर दिसण्याचं महत्त्व बिंबवलं जातं. शिडशिडीत अंगकाठी, नितळ चेहरा, गोल चेहरा अशी सौंदर्याची विशिष्ट परिमाणं किती महत्त्वाची आहेत, हे सतत सांगण्यात येतं. कोरियातली ब्युटी इंडस्ट्री ही जगातील सर्वांत मोठ्या ब्युटी इंडस्ट्रीपैकी एक आहे. जगातील सर्वाधिक कॉस्मेटिक सर्जरी या दक्षिण कोरियात होतात. सौंदर्य असेल तरच यश मिळते, असा समज इथल्या समाजामधे पक्का रुजला आहे. इतका की, नोकरी शोधणाऱ्या 88 टक्के मुलींना तुम्ही कसे दिसता ही गोष्ट नोकरी मिळण्यासाठी महत्त्वाची आहे, असं वाटतं. या 88 टक्क्यांमधील निम्म्या मुलींनी नोकरी मिळविण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करायला तयार असल्याचेही कबूल केले.
स्वतःचा स्वीकार महत्त्वाचा
काम आणि सौंदर्य यांच्याबद्दल मुलींच्या मनात रुजलेला हा गैरसमज दूर करण्यासाठी दक्षिण कोरियन न्यूज आउटलेटची निवेदिका ह्यून-यू-यिम हिनेही एक धाडसी निर्णय घेतला. अनेक वर्ष कॉन्टॅक्ट लेन्स आणि खोट्या पापण्या लावून स्वतःला सुंदर दाखवण्याचा खटाटोप थांबवत तिने चष्मा लावून बातम्या वाचल्या. तिची ही छोटीशी कृतीही अतिशय महत्त्वाची आणि बोलकी होती. कारण चष्मा लावलेली मुलगी ही सुंदर असूच शकत नाही, हा समज खोडून काढण्य़ाचा तिने प्रयत्न केला. प्रेक्षक हा बदल कसा स्वीकारतील याविषयी तिच्या मनात शंका होती. मात्र तिला समर्थन देणाऱ्या हजारो मेल्स आले.
"चष्मा लावून प्रेक्षकांसमोर जाण्यात गैर काय आहे, असा प्रश्न माझ्या मनात आला. लाइट्सचा काही प्रश्न असेल तर पुरुष अँकरही चष्मा काढतात. मात्र त्यांना आपण चष्मा काढल्यानंतर कसे दिसू, लोक आपल्याला स्वीकारतील का असले प्रश्न पडत नाहीत. मग महिला अँकरनी हा विचार का करावा," ह्यून-यू-यिमने आपली भूमिका मांडली. "आहे तसे लोकांसमोर जाताना जास्त बरं वाटलं," असं ती म्हणाली.
लीना बी, ह्यून-यू-यिमसारख्या अनेक तरुणी मेकअपला विरोध करत आहेत. 'मेक-अपच्या थरापासून सुटका' या मोहिमेचा अर्थ केवळ कॉस्मेटिक्सच्या वापराला विरोध एवढाच मर्यादित नाही. वर्षानुवर्षे परंपरेने सौंदर्याच्या लादलेल्या कल्पनांमधून बाहेर पडून स्वतःला व्यक्त करण्याचा आणि स्वीकारण्य़ाच्या प्रवासाची ही सुरुवात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)