महिलांना दाढी ठेवणारे पुरुष जास्त आवडतात?

"क्लीन शेव" आणि "जेंटलमन लुक"चा काळ गेला. आजकाल दाढी वाढवण्याचा ट्रेंड आहे. आपल्यापैकी बरेच जण तर 'No Shave November' ही फॉलो करत आहेत. पण पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वावर दाढीचा प्रभाव कसा पडतो?

एकेकाळी ट्राऊझर्सचा काळ होता, लांबसडक, कधीकधी तर बेलबॉटम्सही. मग आला जीन्सचा काळ. मध्ये कार्गो पँट्सचाही ट्रेंड आला होता आणि आता तर चिनोज.

तसंच एकेकाळी क्लीन शेव म्हणजे स्टायलिश आणि सभ्य, असं समीकरण होतं. आता दाढी वाढवण्याचा काळ आहे.

कुणी बेढब दाढी ठेवतं तर कुणी एकदम स्टायलिश. आणि दाढीकडे आता एक फॅशन स्टेटमेंट म्हणूनच बघितलं जातं.

अनेकदा महिलांना आकर्षित करायला पुरुष फॅशनचा सहारा घेतात. याचाच एक भाग म्हणून आजकाल दाढी ठेवणाऱ्या पुरुषांचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे. पण दाढीमुळे महिलांवर प्रभाव पडतो का?

तसं तर महिला पुरुषांच्या दाढीवर फिदा होतात, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पण दाढीतले पुरुष महिलांना आवडतात, असं काही सर्व्हे सांगतात.

पण काही सर्व्हेंनुसार क्लीन शेव केलेले पुरुषही महिलांना आवडतातच. मग नेमका कौल कुणाच्या बाजूने?

आणि आणखी एक प्रश्न उरतो - दाढीचे फायदे तरी किती?

दाढीचे फायदे काय?

मानवी उत्क्रांतीचा इतिहास सांगताना वैज्ञानिक म्हणतात की, दाढी पुरुषांना महिलांपेक्षा वेगळं अधिक शक्तीशाली दाखवण्यासाठी वापरली जायची.

पण खरंतर प्रत्येक माणूस जोडीदाराच्या शोधात असतो. देखण्या पुरुषांना चांगली मुलगी मिळते, असा समज अनादीकाळापासून चालत आल्यानं पुरुष स्वत:च्या चेहऱ्यावर प्रयोग करत आले आहेत.

लाजाळू किंवा मितभाषी पुरुषांपेक्षा बिनधास्त, स्मार्ट आणि स्ट्राँग पुरुष महिलांशी अधिक सहजतेने बोलूचालू शकतात. अनेक सर्व्हेंमधूनही हेच कळतं की स्त्रियांबरोबरच पुरूषांनाही दाढी ठेवणारे पुरुष ताकदवान, अनुभवी आणि आक्रमक वाटतात.

1842 ते 1971 दरम्यान ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार दाढी आणि केसांच्या फॅशनमागे स्वत:साठी जोडीदार शोधणं, हाच प्रमुख उद्देश होता.

शिवाय, त्याकाळी ब्रिटनमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेने बरीच कमी होती. म्हणून जोडीदार मिळावा म्हणून दाढी ठेवणाऱ्या पुरुषांची संख्याही जास्त होतं.

असं असलं तरी पुरुषाची ताकद त्यांच्या दाढीवरून ठरत नाही. तर यात त्या पुरुषाच्या आवाजाचाही खूप मोठा वाटा असतो.

शक्तीशाली पुरुषांचा आवाज इतरंपेक्षा खूप वेगळा असतो. लोकसुद्धा अशाच लोकांना नेता म्हणून निवडतात ज्यांच्या आवाजात दम असतो, जोश असतो.

दाढीमुळं महिलांवर प्रभाव पडतो का?

ब्रिटनमध्ये दाढी, मिशा आणि आवाजाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला होता. यात अशा सहा लोकांचे व्हीडिओ बनवले गेले जे अधून-मधून दाढी-मिश्या ठेवत होते.

नंतर तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांच्या आवाजात बदल करण्यात आले. मग 20 पुरुष आणि 20 स्त्रियांना त्यांच्याबद्दलचं मत विचारण्यात आलं.

त्यात भारदस्त आवाज असलेल्या पुरुषांना महिलांनी अधिक पसंत केलं. दाढी-मिशांमुळे मात्र लोकांच्या मतात जास्त काही फरक पडला नाही. पण दाढी ठेवणाऱ्या पुरुषांना जास्त पसंती मिळाली.

महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांनी फक्त दाढी-मिशा ठेवणं पुरेसं नाही. अनेकांच्या मते यासाठी पुरुषांनी तंदुरूस्त दिसणंही खूप महत्त्वाचं असतं. कदाचित यामुळेच आज तरुण मुलं बॉडी बनवण्यावर भर देत आहेत.

महिलांना काय वाटतं?

जसं पुरुष आपली देखरेख करतात तसंच अनेक महिलांनाही वाटतं की आपल्या पुरुष सोबत्यापेक्षा आपण अधिक सडपातळ दिसावं, पुरेसा मेकअप करावा. पण केवळ दिसणं हा एकच फॉर्म्युला वापरून आपण सर्वांवर छाप पाडू शकत नाही.

पुरुष देखणा असला तर त्याच्याकडे जास्त लोकांच्या केवळ नजराच वळू शकतात. मनाचं काय?

पुरुष अनेकदा मस्त दाढीवाला, देखणा असला तरी उत्तम माणसाची ओळख त्याच्या स्वभावानेच होते. म्हणून अनेक पुरुष दाढीत कितीही देखणे आणि स्मार्ट दिसत असले तरी त्यांपैकी अनेक सिंगलच राहून जातात.

पण तुम्ही प्रयत्न करत राहा. नवीन-नवीन फॉर्म्युल्यांचा वापर करत राहा. 'No Shave November' फॉलो करत असाल तर आणखीनच भारी.

हेही नक्की वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)