पुण्याच्या या हॉटेलांमध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी का दिलं जातंय?

फोटो स्रोत, BBC
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेली अनेक वर्षं ज्याची भीती वाटत होती, अखेर त्याच समस्येने आता डोकं वर काढलं आहे. ती समस्या म्हणजे पाणी टंचाईची.
भारतातल्या अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना पाणी बचतीसाठी पुण्यात एक अनोखा उपक्रम सुरू आहे. पुण्यातल्या अनेक हॉटेलांमध्ये ग्राहकांना केवळ अर्धा ग्लास पाणी देण्याची नवी पद्धत सुरू झालीये.
नुकताच नजरेस पडलेला एक प्रसंग सांगते. शुद्ध शाकाहारी असलेल्या कलिंगा हॉटेलमध्ये एक जोडपं येऊन बसलं. वेटर आला आणि 'तुम्हाला पाणी हवंय का?' असं विचारलं.
"मी हो म्हटलं आणि त्याने मला अर्धा ग्लास पाणी आणून दिलं", गौरीपूजा मंगेशकर सांगत होत्या. "आधी मला वाटलं फक्त मलाच अशी वागणूक मिळतेय का? मग माझ्या लक्षात आलं की त्याने माझ्या नवऱ्यालाही अर्धा ग्लासच पाणी दिलं होतं."
गौरीपूजा यांना या गोष्टीचं जरा आश्चर्यच वाटलं. मग मात्र त्याचं महत्त्व पटलं.
महिनाभरापूर्वी पुणे महापालिकेनं पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जवळपास 400 हॉटेल्सने ही शक्कल लढवली.
पाणी बचतीसाठी आपण ठोस कृती आराखडा आखल्याचं पुणे रेस्टॉरंट आणि हॉटेल संघटनेचे अध्यक्ष आणि कलिंगा हॉटेलचे मालक गणेश शेट्टी यांनी बीबीसीला सांगितलं.
फरशी पुसण्यासाठी वापर
"आम्ही ग्राहकांना केवळ अर्धा ग्लास पाणी देतो आणि मागितल्याशिवाय पुन्हा पाणी देत नाही. उरलेलं पाणी झाडांना टाकतो किंवा फरशी पुसण्यासाठी वापरतो," शेट्टी समजावून सांगतात. "काही ठिकाणी कमी पाणी वापरणारी टॉयलेट्स बसवण्यात आली आहेत. काही ठिकाणी जल संवर्धन प्रकल्प उभारले आहेत. इतकंच नाही तर आमच्या कर्मचाऱ्यांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."
कलिंगा हॉटेलमध्ये रोज जवळपास 800 लोक येतात आणि अर्धा ग्लास पाणी वाटप केल्याने रोज जवळपास 800 लीटर पाण्याची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेट्टी म्हणतात, "पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि भविष्य सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला आजच कृती करावी लागेल."
80 वर्षे जुन्या पुणे गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार यांनी तर एक पाऊल पुढे जात छोटे ग्लास आणले आहेत. "आम्ही केवळ अर्धा ग्लास पाणी देत नाही तर आधीच्या मोठ्या पेल्यांच्या जागी लहान पेले आणले आहेत."

भारताच्या आर्थिक राजधानीचं पुढचं दार म्हणजे पुणे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक पंढरी. पुणे भारताचं ऑक्सफर्ड आणि केंब्रिज असल्याचे गौरवोद्गार पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काढले होते.
1878 साली बांधलेल्या खडकवासला धरणातून 40 लाख पुणेकरांची तहान भागवली जाते. मात्र हल्ली पाणी टंचाईनं डोकं वर काढलं आहे.
शेट्टी सांगतात शहराने पहिल्यांदाच दोन वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाईचा सामना केला होता. "फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात निम्मी पाणी कपात करण्यात आली होती. दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा व्हायचा."
महापालिकेद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा आणि कशासाठी करू नये, यांचे निर्देश देण्यात आले होते. इतर वापरासाठी जमिनीतल्या पाण्याचा वापर करावा, यासाठी बोअरवेल खोदण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यात आलं.
दोन महिन्यांसाठी बांधकामांवर बंदी
दोन महिन्यांसाठी शहरातली सर्व बांधकामं थांबवण्यात आली, कार गॅरेजला केवळ ड्राय वॉशची परवानगी होती, कोरडी होळी खेळण्यात आली, क्लब आणि वॉटर रिसॉर्टला रेन डान्स कार्यक्रम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, स्विमिंग पूलही बंदी ठेवण्याचे आदेश निघाले.
सर्व प्रकारच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यात आलं आणि गैरवापर करणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला.
पुण्याचे जल संवर्धन तज्ज्ञ कर्नल शशिकांत दळवी सांगतात, "हे खूप गंभीर होतं."
यावर्षी तर परिस्थिती 'अधिक वाईट' झाल्याचं ते म्हणतात. "ऑक्टोबरमध्येच धोक्याची घंटा वाजली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपण याचा कसा सामना करणार आहोत?" असा प्रश्न त्यांना पडतो.

यावर्षीच्या सुरुवातीला सरकारने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार भारत आतापर्यंतच्या सर्वात वाईट पाणी टंचाईचा सामना करत आहे. जवळपास साठ कोटी लोकांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. येणाऱ्या वर्षात समस्या अधिक चिघळतच जाईल आणि 2020पर्यंत 20 शहरांतल्या भूगर्भातलं पाणी पूर्णपणे संपलेलं असेल, असं हा अहवाल सांगतो.
भारतातलं एक प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या शिमल्यातला पाणीसाठा मे महिन्यात संपला तर बंगळुरूमध्येही जमिनीखालील पाणी संपत चालल्याचं गेल्या वर्षी सांगण्यात आलं.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याासाठी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये होणाऱ्या वादाच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. शेतकरी, गावकरी, शहरी भागातले नागरिक, झोपडपट्ट्यांमधले रहिवासी, उद्योग-व्यवसाय आणि हॉटेल इंडस्ट्री यांच्यात पाण्यासाठी गोंधळ सुरू होतो.
यावर्षी तर ही परिस्थिती आताच ओढावली आहे. ही तर जेमतेम हिवाळ्याची सुरुवात आहे. महाराष्ट्रात तर अनेक भाग दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे आणि पाणी टंचाईचं सावट दिसायला सुरुवात झाली आहे.
आणि यंदा पुण्यालाही या पाणीटंचाईचा फटका बसला आहे. ऑक्टोबरमध्येच पुणे महापालिकेने 10% पाणी कपात सुरू केली आहे. मात्र या टंचाईमुळे कर्नल दळवी पूर्णपणे गोंधळून गेले आहेत.
ते म्हणतात, "दोन वर्षांपूर्वी कमी पावसामुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवली होती. मात्र यावर्षी जुलैअखेरपर्यंत पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. धरणं पूर्ण भरली होती. तर मग हे पाणी गेलं कुठे?"

फोटो स्रोत, BBC
हवामान बदल, बेसुमार जंगलतोड आणि शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या यामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. खडकवासला धरणातला गाळ कधीच काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या धरणाची पाणी क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
"2025 पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार आहे." त्यामुळे केवळ पुणेच नाही तर देशभरात पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कर्नल शशिकांत दळवी काही उपाय सुचवतात.
ते सांगतात, "पाण्याची गळती थांबवणे, भूगर्भातील बेसुमार पाणी उपसा बंद करणे, छतावरील पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि त्याचा पुनर्वापर, बंधनकारक करावं. नाहीतर टंचाई अधिक गंभीर होत जाईल."
हॉटेलमध्ये ग्राहकांना अर्ध ग्लास पाणी देण्याविषयी तुमचं काय मत आहे? ही केवळ एक क्लृप्ती आहे का, असं मी विचारलं असता कर्नल दळवी सांगतात, "नाही, अजिबात नाही. ही काही क्लृप्ती नाही. ही तर एक उत्तम कल्पना आहे. थेंबे थेंबे तळे साचे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








