अमरावतीचा वॉटरमॅन तहानलेल्यांचा देवदूत

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut
- Author, नीतेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून
अमरावती जिल्ह्यातल्या बासलपूरनजिक गेलात तर तुम्हाला हा दुचाकीवरचा वॉटरमॅन नक्की दिसेल. उन्हातान्हाचं रस्त्यावर फिरताना तहानलेल्या प्रत्येक वाटसरूसाठी हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. राजू चर्जन वॉटरमॅन बनून गेल्या 20 वर्षांपासून हे काम अखंडपणे करत आहेत.
राजू चर्जन हे अमरावती जिल्ह्यातील बासलापूर गावातले एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामं आटोपून दुपारी घरी यायचं. अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचं तहानलेल्यांना पाणी द्यायला... हे राजू यांचं गेल्या 20 वर्षांपासून रुटीन आहे.
त्यांच्याकडे असलेल्या 4 पिशव्या आणि 20 बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात. आणि या थंडगार पाण्याच्या या पिशव्या दुचाकीला बांधून प्रवाासाला बाहेर पडतात. जवळपास किमान 30 किलोमीटर ते नक्कीच फिरतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर एक दुपेटा असतो. अमरावतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्त्यात नजरेस पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लास पाणी पाजतात. त्यांच्या या कामामुळे राजू चर्चन या भागात 'मोबाईल वॉटरमॅन' म्हणून ओळखले जातात.
कोणत्याही ऋतूची पर्वा न करता पाणी वाटपाचं काम ते करतात. झाडाखाली जरा वेळ थांबलेल्या मजुरांना ते आवर्जून ग्लासभर पाणी देतात. विशेष म्हणजे यासाठी ते कुठलेच पैसे घेत नाही. महागाईच्या काळात त्यांच्या दुचाकीच्या पेट्रोलचेही पैसेही आपल्याच खिशातून देतात. कुणाकडूनही ते पैसै स्वीकारत नाही.
ही संकल्पना सुचली कशी?
चर्जन सांगतात, "तहानलेल्या व्यक्तीलाच त्या एका ग्लासाची किंमत कळू शकते. माझ्यावर एकदा अशीच वेळ आली होती. मी एकदा प्रवास करत होतो, तेव्हा माझ्या एक वर्षाच्या मुलाला तहान लागली होती. तो रडत होता. मुलाला नेमकं काय झालं हेच कळत नव्हतं. माझ्याकडे पाणी नव्हतं. काही किलोमीटर पायपीट केल्यानंतर एका घरातून मला थोडं पाणी मिळालं आणि त्याची तहान भागवली. त्याचं रडणं थांबलं. तेव्हापासून मी मनाशी निश्चय केला आणि 'मोबाईल पाणपोई' सुरू केली".

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut
पक्ष्यांसाठीही जलदूत
45 डिग्री तापमानात, रणरणत्या उन्हात रस्तोरस्ती फिरून पाणी पाजणारे राजू चर्जन सध्या जलदूत ठरले आहेत. अमरावती- चांदूर या मार्गावर माणसांबरोबर पक्ष्यांसाठीही पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. दर एक किलोमीटर अंतरावर पक्षांसाठी झाडावर त्यांनी पाण्याची सोय केली आहे. फांदीला ही जलपात्र बांधून ठेवली आहेत. त्यामध्ये पाणी टाकायला ते कधीच विसरत नाही.
ते सांगतात, "एकीकडे धरणाने तळ गाठला आहे. जिल्ह्यात आणि त्याहून गावात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवतेय. जंगलातले पाण्याचे स्रोतही आटलेत. अशा परिस्थितीत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि ती प्रत्येकांनी पार पाडली पाहिजे."
"रस्त्यांवरून जात असताना खासकरून पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलवर प्रवास करणारे पाण्याची मागणी करतात. रस्त्यावर मजुरी करणारे कामगारही प्रचंड तहानलेले असतात. या तीव्र उकाड्यात प्रत्येक दहा मिनिटाला प्यायला पाणी लागतं. तहानेने व्याकूळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पाणी पाजल्यास ते सलाईनसारखं काम करतं आणि मलाही डॉक्टर झाल्यासाखं वाटतं", ते सांगतात.
विनाशुल्क सेवा
राजू चर्जन यांच्याकडे एक एकर शेती आहे. त्यातून वर्षाला 1 ते दीड लाखाचं उत्पन्न त्यांना मिळतं. याबरोबर ते इलेक्ट्रिक फिटिंगची कामं ते करतात. घरातील वायरिंग दुरुस्ती करून दिवसाला सरासरी ते 500 रुपये कमावतात. त्यातले दररोज पेट्रोल भरण्यासाठी 150 ते 200 रुपये जातात.
"पाणी भरण्याच्या पिशव्यांनाही खर्च असतोच. आठ दिवसाआड चार पिशव्या खराब होतात. त्या फेकण्याशिवाय पर्याय नसतो. चार पिशव्यांची किंमत जवळपास 800 रूपयाच्या घरात जाते. पण पाणी पाजण्यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कुठल नाही. त्यामुळे यासाठी कुणाकडून एक पैसा मी घेत नाही, घेणारही नाही", असं राजू सांगतात.
या मोबाईल वॉटरमॅनमुळे अनेकांना तजेला मिळाला आहे. अमरावतीचे गजानन होले यासंदर्भातला अनुभव सांगतात. अमरावतीवरून वर्ध्याकडे जात असताना गजानन यांचा उन्हामुळे जीव कासावीस झाला. सोबत पाणीही नव्हतं. जीव घाबरा झाला. उकाड्याने त्रासून झाडाखाली बसलेले गजानन होले दृष्टीस पडल्याबरोबर राजू त्यांच्यापाशी गेले आणि ग्लासभर पाणी त्यांना दिलं. या पाण्याने अमृतासारखं काम केलं असल्याची प्रतिक्रिया गजानन होले देतात.

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut
गजानन म्हणाले "हे गृहस्थ आले आणि एक ग्लास पाणी मिळालं. आता बरं वाटतंय. नाहीतर अडचणच होती."
गजानन प्रमाणे अनेक जण चर्जन यांच्या पाण्याने तृप्त झालेत. मात्र समाजसेवकांच्या भाऊगर्दीत चर्जन प्रसिद्धीपासून प्रचंड लांब आहेत हे विशेष.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








