यवतमाळ : जिथे पाहुण्यांना आणावं लागतं स्वत:चं पाणी

मायाताई इनकाने

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

फोटो कॅप्शन, मायाताई इनकाने
    • Author, नीतेश राऊत आणि रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मे महिना सुरू आहे, सूर्य आग ओकतोय आणि त्यात भर पडली आहे ती भीषण पाणीटंचाईची. त्यातही गुडघेदुखीने त्रस्त मायाताई इनकाने यांना पाणी भरायला 500 फूट लांबवर असलेल्या हँडपंपावर जावं लागतं. किमान दोन घागरी पिण्याचं पाणी मिळण्यासाठी त्यांना तासनतास वाट बघावी लागते. जेव्हा पाणी मिळतं तेव्हा ते 20 पायऱ्या चढून आणावं लागतं.

यवतमाळच्या मणिराम सोसायटीतल्या एका दुमजली घरात मायाताई राहतात. त्यांची संपूर्ण दिनचर्या पाण्याभोवती फिरतेय. त्या आणि त्यांचे पती रमेश आळीपाळीनं पाणी भरतात. त्यांच्या दिवसाची सुरुवातच पाण्याच्या नियोजनानं होते. सकाळचा चहा घेण्याआधी हापशीवर नंबर लावतात.

मायाताईंचं कुटुंब मोठं, त्यामुळे 200 लीटर पाण्यात त्यांचं भागत नाही. म्हणून त्यांना दिवसभरात 10 ते 15 फेऱ्या पाण्यासाठी माराव्या लागतात.

पाणी भरण्यासाठी त्यांनी घरातली एकूण एक भांडी काढून ठेवली. छोट्या छोटया भांड्यात पाणी भरलेलं असावं हा त्यांचा प्रयत्न असतो. आग ओकणारा सूर्य डोक्यावर असतो, तरीही हातात दोन बादल्या घेऊन पाण्यासाठी फेऱ्या काही संपत नाही.

पाण्याचा वापर त्यांनी नियोजनबद्ध करून ठेवलाय. स्वच्छतागृहाला लागणारं पाणी आणि अंघोळीसाठी लागणाऱ्या पाणी यात बचत व्हावी यासाठी त्या सतत प्रयत्नात असतात. पण तरीही जिथे पाणी लागत तिथे लागतंच.

मायाताई इनकाने

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

फोटो कॅप्शन, माया आणि रमेश इनकाने

मुलींची लग्नं झालेली आहेत. उन्हाळ्यात काही दिवसांसाठी त्या माहेरी येतात. पण पाणीच नसल्याने यंदा त्या माहेरपणाला मुकल्या.

मायाताई सांगतात, "पाणीटंचाई बघता घरी येणारे पाहुण्यांना आम्ही पाणी घेऊन येण्यास सांगतो. सांगायला वाईट वाटतं पण पर्याय नाही. पायानं चालणं होत नाही. तरीही दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, पिण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्याची व्यवस्था करावीच लागते. त्यासाठी कधी रात्रीही वणवण करावी लागते."

हजार लोक एक बोअर

यवतमाळ शहरातील भांगरनगर येथील मणिराम सोसायटीमधील जवळपास हजार लोकांची तहान भागवण्यासाठी एकमेव बोअरवेल आहे. परिसरात तशा अनेक बोअरवेल आणि विहिरी आहेत पण त्या सगळ्या आटल्या आहेत. त्यामुळे मणिराम सोसायटीच्या नागरिकांना याच बोअरवेलचा आधार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पाणी भरण्यासाठी प्रचंड भांडणं व्हायची. अनेकांना पाण्यासाठी ताटकळत उभं राहावं लागायचं. याच परिसरातील नागरिक रमेश इनकाने यांनी यात बदल घडवून आणला. प्रत्येकाला चार बादल्या पाणी मिळावं यासाठी त्यांनी रांगा लावायला सुरुवात केली. आता प्रत्येकाला चार बादल्या पाणी मिळतंय खरं पण त्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. या परिसरात दिवसा रात्री केव्हाही गेलात तरी रांगा कधीच संपत नाही.

यवतमाळ

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

"या परिसरात आठ दिवसाआड एकदा टँकर येतो. एका कुटुंबाला 200 लीटर पाणी देऊन मोकळा होतो. रमेश इनकाने सांगतात, "या परिसरात 8 ते 10 हापशी आहेत पण त्यांना पाणी नाही. हातामध्ये सहज पकडली जाणारी चार भांडी भरायची आणि पुन्हा रांगेत लागायचं हाच सकाळपासून दिनक्रम असतो," रमेश सांगतात.

टँकर अपुरे

गेल्या काही वर्षांत यवतमाळ शहरानं अशी पाणीटंचाई कधीच पाहिली नाही. पिंपळगाव, लोहारा, उमरसरा, घोटा,वाघापूर, वडगाव या परिसरात पाण्याच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. एक महिना झाला तरी नळाद्वारे पाणी सोडण्यात आलेलं नाही. त्यामुळं टँकरचं पाणी हाच यवतमाळकरांसमोर एकमेव पर्याय आहे.

"शहरात जवळपास 100 पेक्षा जास्त टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु अनेक परिसरात टँकरही पोहोचत नाही. एका टँकरचं 3800 लीटर पाणी परिसरातील नागरिकांची तहान भागवण्यास अपूरं पडतं. इस्तरी नगर, गोवर्धन लेआऊट या भागात आजवर टँकर आलेलाच नाही. टँकर न आल्यानं परिसरातील नागरिक आक्रमक आहेत. नगरपालिका जाणीवपूर्वक आपल्या मर्जीतील लोकांना मुबलक पाणी पुरवठा करतात," असा आरोप सागर नाईक करतात. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना चक्क स्मशाभूमीतल्या बोअरवेल गाठावी लागते. पण नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष असल्याचं ते सांगतात.

यवतमाळ

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

टँकरनं प्रभागनिहाय पाणीपुरवठा केला जातो. त्यात एका प्रभागात आधी किमान 6 ते 8 टँकरच्या फेऱ्या व्हायच्या. टँकरची तीच संख्या आता 2 ते 3 वर आली आहे. त्यात पाणीवाटप योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी एका नियंत्रकाचीही नेमणूक करण्यात आली. पाणी वाटपाचं काम अत्यंत जोखमीचं आहे.

निखिल नगर परिसरात गजानन पिल्लारे नियंत्रक म्हणून काम करतात. "पाण्याचं वाटप करताना त्यांना अनेकांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. समान वाटप केल्यानंतर ज्यांना पाणी मिळत नाही ते अर्वाच्य शिव्या देतात," असं गजानन पिल्लारे सांगतात.

यवतमाळ

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

फोटो कॅप्शन, गजानन पिल्लारे यांना पाणी वाटताना विविध प्रकारच्या जाचाला सामोरं जावं लागतं.

अनेकदा लोक अंगावर धावून येतात ही परिस्थिती सांभाळणं कठीण झालंय. गजानन यांच्या मते, "काही दिवसांत ही परिस्थिती अजून बिकट होणार आहे. पाणी प्रश्नावरून लोक अधिक आक्रमक होतील."

वैद्यकीय क्षेत्रावर परिणाम

पाणीटंचाईतून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुटले नाही. या महाविद्यालयाला दररोज 2 लाख लीटर पाण्याची आवश्यकता असते. पण सध्याच्या परिस्थितीत ही गरज पूर्ण होणं अवघड झालं आहे. एप्रिल महिन्यात पाण्याअभावी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु रुग्णालय प्रशासनाने पाणी टंचाईमुळे शस्त्रक्रियांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं म्हटलंय.

यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार यांनी रुग्णालयाला होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याचं मान्य केलं. तसंच पाणीटंचाईच्या झळा रुग्णांना सहन कराव्या लागत असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना मान्य केलं.

ते म्हणतात, "प्राधिकरण आम्हाला पाणी देत नाही. सध्याचा पाणीपुरवठा आम्हाला अपुरा आहे. रुग्णांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. रुग्णालयातील वॉर्डात पाणी नाही, स्वच्छतागृहाची अवस्था तर बघवत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून अशीच अवस्था आहे. बोअर आणि विहिरीवर कसंतरी मॅनेज करणं चालू आहे."

यवतमाळ

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

फोटो कॅप्शन, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

"शस्त्रक्रियांवर फारसा फरक पडला नसला तरी, रुग्णालयाला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरचा चालक पळून गेल्याने एक दिवस कठीण परिस्थिती उद्भवली होती. म्हणून एक दिवस शस्त्रक्रिया खोळंबली होती. पण त्यानंतर आम्ही स्वतःचा टॅंकर विकत घेतला. पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगरपालिकेला 2 महिन्यापासून पत्र दिलं आहे. पण त्यांचा टँकर अजून इकडे दिसलेला नाही," असं ते म्हणाले.

रुग्णालयामार्फत सात टँकर भाड्यानं घेण्यात आले आहेत. रुग्णालयाला दिवसाला 25 ते 40 हजार लीटर पाणीपुरवठा होतो आहे. या पाण्याचा पुरवठा अत्यावश्यक म्हणजे शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता विभाग यांनाच केला जातो. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना पाणी नसल्यानं प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने संस्था आणि लोकप्रतिनिधींना मोफत पाणीपुरवठा करण्याचं आव्हान करण्यात आलंय.

पाणीटंचाई नेमकी कशामुळे?

मागच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शहराची तहान भागवणारी निळोना, चापडोह ही दोन धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळं MIDCसाठी राखीव असलेल्या गोकी प्रकल्पातून टँकरच्या माध्यमातूनच शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या व्यतिरिक्त नगर परिषदेने 23 सार्वजनिक विहिरी अधिग्रहित केल्या त्यापैकी 2 विहिरीवरून टँकरचा भरणा सुरू आहे. नगरपालिकेचे 61, शिवसेनेचे 28, भाजपचे 5, काँग्रेसचे 4, इतर पक्षांचे मिळून 110 टँकरमधून पाण्याचा प्रवास निरंतर चालू आहे. यातून 20लाख लीटरचा पुरवठा केला जातो, पण यवतमाळ शहराची तहान 35 लाख लीटरची आहे. त्यातही शहरात फिरणाऱ्या टँकरवर मोफत पाणी पुरवठ्याच्या जाहिराती ठळकपणे दिसून येतात.

यवतमाळ

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

फोटो कॅप्शन, ठिकठिकाणी पाण्याच्या अशा रांगा लागलेल्या आहेत.

स्थानिक पत्रकारांनींही 1972 च्या दुष्काळापेक्षाही आताची निर्माण झालेली पाणीटंचाई भीषण असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. मुक्त पत्रकार नितीन पाखले सांगतात, "यवतमाळला सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई ही 1972 पेक्षा भयानक आहे. गतवर्षी सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होईल, हे संकेत आधीच मिळाले होते. तेव्हा प्रशासनानं पूर्वनियोजन केले असते तर आजच्या पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी झाली असती".

ते पुढे सांगतात, "पालकमंत्री मदन येरावार यांनी यवतमाळ शहरासाठी बेंबळा धरणातून 304 कोटींची 'अमृत'योजना आणली. ही योजना 2019मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यापूर्वीच 30 एप्रिल व नंतर 10 मेपर्यंत या योजनेचे पाणी यवतमाळला आणू, अशा वल्गना पालकमंत्री येरावार यांच्यासह भाजप नेत्यांनी केल्या."

यवतमाळमधील शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणतात, "पर्जन्यमान कमी झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता पाणीटंचाई होणार हे निश्चितच होते. तेव्हापासून नियोजन केले असते तर आज यवतमाळकरांवर ही गंभीर परिस्थिती ओढवली नसती. पाण्याची व्यवस्था करण्याचे सोडून पालकमंत्री मदन येरावार यांनी केवळ पत्रकार परिषदा घेऊन केवळ तारखा जाहीर केल्या. मात्र पाणी कोणालाही मिळालेले नाही. शहरात पाण्याचे एवढे दुर्भिक्ष्य आहे की कोणी दगावले तर नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी येऊ नका, असे सांगितलं जात आहे."

सरकार काय म्हणतंय?

पालकमंत्री मदन येरावार यांनी आपली भूमिका मांडली ते म्हणतात, "आपण सगळ्या योजना राबवत आहोत. निळोना आणि चापडोह हे धरण दीड महिन्याआधीच आटली होती. त्यातल्या मृत साठ्यासाठी दीड कोटी रुपयांचे फ्लोटिंग पंप चापडोहमधून आणले. गोकी धरणातून सुयोग नगर, दर्डा नगर, लोहारा असं 1 लाख लोकांना पाणीपुरवठा होतो आहे. मोठी लाईन असल्यानं बेंबळा धरणाचं पाणी आणताना थोडा त्रास होतोय. पण दर 15 दिवसाला निळोना धरणाचं पाणी सोडण्यात येत आहे. चापडोहवरून जे कनेकंटेंट आहे त्यांचा सप्लायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं नगर परिषदेने 64 टँकर आणि दररोजच्या 6 ट्रिप म्हणजे एका दिवसाला 18,000 लिटर पाणी मिळत आहे."

ते पुढे म्हणतात, "सर्वांचा रोष हा नगरसेवकांवर असतो, पाणीटंचाई असली तरी नागरिकांना असे वाटते की, घरातील पाणी संपलं की पाणी पुन्हा भरून घ्या, पुन्हा पाणी येणार की नाही याची भीती असते. त्यामुळं घरासमोरुन टँकर गेला तरी तो पाणी भरतोच. त्यामुळं आम्ही सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी कामावर लावले. वेळ पडल्यास त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात येईल. पाणी पुरवठा जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्र उघडण्यात आलं आहे. टँकरने दिवसाला 6 फेऱ्या मारल्या जातात आणि तसं झालं नसेल तर त्यांना प्रत्येक फेरी नुसारच आपण पैसे देतो. GPS प्रणालीनुसार फेऱ्यांची गणना केली जावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा यासातही वाट्टेल तेवढे टँकर मागावा पण शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ देऊ नका, असे आदेश देण्यात आले आहे."

यवतमाळ

फोटो स्रोत, BBC/Nitesh Raut

पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे त्याहीपेक्षा ती नियोजनाच्या अभावामुळे अधिक तीव्र झाली. प्रशासनाच्या नियोजनाअभावी जागोजागी निर्माण झालेले टँकर व पाणी माफिया यांनी उच्छाद मांडला आहे. पाणीटंचाई बांधकाम व्यवसायाला मारक ठरली आहे. प्रगतीपथावर असलेली अनेक बांधकामं बंद पडली आहेत. पाणीच नसल्याने रस्त्याची कामं ठप्प पडली आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)