जालना : जिथं 15 दिवसांतून एकदाच नळाला पाणी येतं

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
- Author, अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी जालन्याहून
दुपारी 1च्या सुमारास आम्ही जालना शहरात पोहोचलो. दुपारच्या 42 डिग्री उन्हाच्या तडाख्यानं रस्त्यावर शुकशुकाट होता. दोन-तीन ठिकाणी थोडी झुंबड पाहायला मिळाली कारण तिथे पाण्याची हापशी होती.
आम्ही गाडी जुन्या जालन्याच्या दिशेनं वळवली. मोंढा, बसस्टँड परिसर पार करत आम्ही शहरातल्या चमन परिसरात पोहोचलो. तिथं काही वयस्कर महिला डोक्यावर हंडे घेऊन जाताना दिसल्या. "पाणी कुठून आणताय?" असं विचारल्यावर उत्तर न देताच त्या पुढे चालत गेल्या.
मग बाजूच्या किराणा दुकानात पाण्याची बातमी करायला आलो आहोत, असं आम्ही सांगितलं. दुकानदार काकांनी तातडीनं बाहेर येत त्या महिलांना आवाज दिला "अहो यांना पाण्यावर फोटो पायजे फोटो," त्यांची हाक ऐकून महिलांनी डोक्यावरचे हांडे खाली ठेवले आणि त्या आमच्या दिशेनं आल्या. "फोटो दिला तर पाणी येणार का?" असा सवाल त्यांनी आम्हालाच केला.
तितक्यात नजर एका आजीबाईवर गेली. चेहऱ्यावर थकवा, चालण्यात कमालीचा हळूवारपणा. मंद आवाजात त्या म्हणाल्या, "भाऊ 35 वर्षं झाले हेच करत आहे, एकदा घरात येऊन बघ. आमच्याकडे अर्धं घर पाण्यासाठी लागणाऱ्या भांड्यांनी भरलं आहे. 15-15 दिवस पाणी येत नाही. त्यामुळे पिण्याचं पाणी साठवून ठेवावं लागतं तर सांडायचं वेगळं, तेव्हा कुठे मेळ जमतो."
एव्हाना आम्हालाही तहान लागली होती. मग आम्ही आजींसोबत इंदिरानगर परिसरातल्या त्यांच्या घराकडे निघालो.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
छोटीशी गल्ली आणि दोन्ही बाजूंनी घरं. अगदी टू-व्हीलर जाईल एवढाच रुंद रस्ता. आजीने शांताबाई बाबुराव सोनटक्के अशी स्वतःची ओळख करून दिली.
आम्ही 60 वर्षीय शांताबाई यांच्या घरासमोर पोहोचलो. जेमतेम 400 स्क्वेअर फूट एवढ्याशा घराच्या दरवाजातच शांताबाई यांचे पती बाबुराव यांनी किराणाची टपरी थाटली आहे. चॉकलेट- बिस्कीटांच्या बरण्या बाजूला करत त्यांनी घरात जायला वाट करून दिली. मोजून 3 पावलांवरच घरातली चूल होती.
पाण्याची भांडी
पाण्याच्या भांड्यांनीच घरातली अर्धी-अधिक जागा व्यापली होती.
"पाण्याची भांडी ठेवायला जागा हवी म्हणून स्वयंपाकाचा ओटा बांधला नाही. कारण 15 ते 20 दिवस पाणी येत नाही. पाणी आलं की ते साठवून ठेवावं लागतं. घर छोटं आहे त्यामुळे पाण्याची भांडी ठेवायला दुसरी जागा नाही.
सात जणांचं आमचं कुटुंब असूनही आम्हाला नगरपालिकेचं पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. आम्ही 10 हंडे, 2 टाक्या, 4 कॅन, 4 बकेट वापरून 300 लीटरपर्यंत पाणी साठवतो. हे पाणी पिण्यासाठी पुरत नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या नळाचं पाणी इतर उपयोगासाठी तर दूरच पण आम्हाला आठवडाभर पिण्यासाठी देखील पुरत नाही," शांताबाई सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
शांताबाई यांचा 35 वर्षीय मुलगा राजू सोनटक्के एका वही बनवणाऱ्या कंपनीत कामाला आहे.
राजू सांगतात, "एका व्यक्तीला दिवसाला 6 लीटर पाणी पिण्यासाठी तर 20 लीटर पाणी वापरण्यासाठी लागतं. त्यानुसार 7 जणांना दिवसाला पिण्यासाठी 42 लीटर तर 15 दिवसांसाठी 630 लीटर पाणी लागतं. तर वापरण्यासाठी 15 दिवसांसाठी 2100 लीटर पाणी लागतं. आमच्या भागात कधी 15 तर कधी 20 दिवसांनी नळाला पाणी येतं."
"तासभरच नळाचं पाणी येतं. शिवाय पाण्याचा दाब कमी असल्यानं ते घरावरच्या टाकीत पोहोचवू शकत नाही. हौद भरला तरी तो 2 दिवस पुरतो.
पिण्याचं पाणी साठवण करून जपून वापरतो. वापरण्यासाठी घराजवळच्या पुरातनकालीन बारवातून आम्ही पाणी आणतो. तिथून दिवसाला 4-5 वेळा कॅन भरून आणतो. हे बारव नगरपालिकेच्या ताब्यात आहे," राजू पुढे सांगतात.
शांताबाई गेली 35 वर्षें इंदिरानगरमध्ये राहत आहेत.
"सुनेला बाहेरून पाणी आणायला लावण्यात कमीपणा वाटतो म्हणून मीच पाणी आणते. मला गुडघेदुखीचा त्रास आहे. पण पर्याय नसल्यानं मुलाच्या मागे गाडीवर बसून जाते आणि पाणी आणते," शांताबाई सांगतात.
पाणी : चित्र सगळीकडे सारखेच
जालन्यातल्या बऱ्याचशा मध्यमवर्गीय तसंच उच्चभ्रू वसाहतीत पाण्याच्या बाबतीत हेच चित्र असल्याचं लक्षात येतं. एका बाजूला जायकवाडीतून थेट पाणी आणि दुसऱ्या बाजूला घाणेवाडी प्रकल्प असताना सामान्य लोकांवर पाण्यासाठी अशी वेळ का येते हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर सांगतात, "2010पासून जालना-जायकवाडी प्रकल्पाचं काम सुरू असताना शहरातल्या अंतर्गत जलवाहिनीचं नूतनीकरण होणं गरजेचं होतं. ते झालं नाही. त्यामुळे आज फक्त 15 टक्के पाणी वापरात येत आहे. अंतर्गत नियोजनाच्या अभावी सर्वच भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे मुबलक पाणी असतानाही शहर पाणी टंचाईला सामोरं जात आहे."
पाणीसाठा आहे पण...
मराठवाड्यातली गेल्या 3 वर्षांतली पावसाची एकूण आकडेवारी पाहिली तर पाऊस चांगला झाला आहे. ज्या जायकवाडीतून जालना शहराला पाणीपुरवठा होतो त्या जायकवाडीत 45 % पाणीसाठा उपलब्ध आहे.
तरीही अशी परिस्थिती का उद्भवली हे जाणून घेण्यासाठी आम्ही जालना नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे इंजिनिअर रत्नाकर आडशिरे यांच्याशी संपर्क साधला.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
"यावेळी पाऊस चांगला झाल्यानं जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी, घाणेवाडी प्रकल्पात जलसाठा आहे. मात्र जालना नगरपालिकेकडे तेवढी पाणी साठवण क्षमता नाही. यासाठी आम्ही 5 नवीन साठवण टाक्यांचं काम हाती घेतलं आहे. यापैकी 3 टाक्यांचं काम पूर्ण झालं आहे," असं ते सांगतात.
"तसंच जुनी नादुरुस्त जलवाहिनी नव्यानं टाकण्याचं कामही सुरू आहे. ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्याचं 15 दिवसाचं अंतर कमी करून 10 दिवसांनी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








