उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा: दबावच टाकणार असाल तर नकोच ती चर्चा

फोटो स्रोत, Getty Images
आमच्यावर अण्विक नि:शस्त्रीकरणासाठी दबाव टाकू नका, अन्यथा आम्हाला अमेरिकेबरोबर चर्चा करण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असा धमकीवजा इशारा उत्तर कोरियाने अमेरिकेला दिला.
12 जूनला सिंगापूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांची भेट नियोजित आहे. आण्विक निःशस्त्रीकरणाचा विचार करत असल्याचं उत्तर कोरियाचं म्हणणं होतं. त्यानंतर ही भेट ठरली होती.
पण त्यानंतर अमेरिका अत्यंत बेधडक विधानं करत आहे आणि त्यांचे इरादेही नेक नाहीत, अशी टीका उत्तर कोरियाचे उप-परराष्ट्रमंत्री किम क्ये-ग्वान यांनी केली आहे.
त्यांनी ही टीका करताना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनाच लक्ष्य केलं आहे.
"बॉल्टन यांच्याबद्दल आम्हाला वाटणारा तिरस्कार आम्ही कधीच लपवलेला नाही. याआधीही आम्ही बॉल्टन यांच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते," किम यांनी म्हटलं आहे.
उत्तर कोरियाच्या विधानात काय म्हटलं आहे?
KCNA या सरकारी वृत्तसंस्थेद्वारे उप-परराष्ट्र मंत्री किम क्ये-ग्वान यांनी सांगितलं की, "जर अमेरिका आपली कोंडी करून आपल्याला अण्वस्त्र टाकण्यास सक्ती करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्यात काहीही रस नाही. मग सिंगापूरमध्ये अमेरिका-उत्तर कोरिया चर्चेसाठी आम्ही यावं की नाही, याचा पुनर्विचार करावा लागेल."
"या बैठकीनंतर आता कोरियन द्वीपकल्पात शांतता नांदेल, अशी आशा आम्हाला होती. एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मोठं पाऊल म्हणून आम्ही या चर्चेकडे पाहत होतो," असंही ते म्हणाले.
शिवाय, उत्तर कोरियाने बुधवारी दक्षिण कोरियाबरोबरची नियोजित बैठकही तडकाफडकी रद्द केली आहे.
दक्षिण कोरियाच्या अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या लष्करी कारवायांवरून नाराजी व्यक्त करत आपण ही बैठक रद्द केली आहे, असं उत्तर कोरियाने KCNA वृत्तसंस्थेद्वारे म्हटलं आहे.
या कारवायांद्वारे आपल्याला चिथावण्याचा प्रयत्न केला जातोय, असं उत्तर कोरियाने म्हटलं आहे.
या कारवाया थांबवण्यात आल्या नाहीत तर किम आणि ट्रंप यांची बैठक होणार नाही, असा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे.
बीबीसीच्या सेऊल इथल्या प्रतिनिधी लॉरा बिकर यांच्या मते या विधानामुळे अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाचा करार आणि एकंदरीतच ट्रंप-किम भेट यांनाच धक्का बसला आहे.
जॉन बॉल्टन यांच्यावर वैयक्तिक टीका का?
अमेरिका हीच जागतिक महासत्ता आहे, असं मानणारे आणि त्यासाठी वेळ पडल्यास शस्त्रसंघर्षाची पाठराखण करणारे मुत्सद्दी म्हणून जॉन बोल्टन ओळखले जातात. उत्तर कोरियावर हल्ला करण्यात काहीच चूक नाही, असं विधानही त्यांनी या आधी केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या आठवड्यात काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, अण्विक नि:शस्त्रीकरणासाठी उत्तर कोरियाने लिबियाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काम करायला हवं.
पण लिबियाने नि:शस्त्रीकरण केल्यावर त्यांची काय अवस्था झाली, हे लक्षात घेता उत्तर कोरियाला या विधानामुळे चांगलाच धक्का बसला.
"बॉल्टन यांच्या या विधानातून असं दिसतं की, हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यात त्यांना काहीच स्वारस्य नाही," असं किम क्ये-ग्वान म्हणतात.
"बॉल्टन यांचा हेतू भयानक आहे, हेच त्यांच्या या विधानातून दिसतं. आपल्या देशाचा अण्वस्त्र साठा मोठ्या देशांसमोर उघडा पाडल्याने लिबिया किंवा इराक यांचं जे काही झालं, तेच उत्तर कोरियाचं व्हावं अशीच इच्छा या विधानातून व्यक्त होते. या माणसाचा आम्ही तिरस्कार करतो, हे आम्हाला उघडपणे सांगण्यात कसलीही अडचण नाही," किम म्हणाले.
हे फक्त बॉल्टनबद्दलच आहे का?
अर्थातच नाही! किम यांनी ट्रंप यांनाही इशारा दिला आहे.
ते म्हणतात, "उत्तर कोरियाने अण्वस्त्र नि:शस्त्रीकरण करेपर्यंत त्यांच्याशी चर्चा न करण्याची आपल्या माजी राष्ट्राध्यक्षांची प्रथा ट्रंप यांनीही चालू ठेवली, तर ते अमेरिकेच्या इतिहासातले सर्वात अयशस्वी राष्ट्राध्यक्ष ठरतील."
लष्करी कवायतींचा काय संबंध?
आतापर्यंत धमकावणीची भाषा करणाऱ्या किम यांनी जानेवारीत नरमाईचा सूर आळवत उत्तर कोरियाचा 'विजनवास' संपवण्याचा आपला विचार असल्याचं म्हटलं होतं.
त्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी केलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरिया आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या एकत्रित युद्धसराव कवायतींना त्यांनी दिलेली 'ना हरकत परवानगी'!

फोटो स्रोत, Getty Images
भरपूर लष्कर आणि युद्धसामुग्री यांच्यासह वर्षातून काही वेळा होणाऱ्या या कवायतींना उत्तर कोरियाचा आक्षेप होता. आमच्यावर चढाई करण्याच्या उद्देशानेच या कवायती करतात, असं उत्तर कोरियाचं म्हणणं होतं.
दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमुळे या कवायती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या ऑलिंपिकमध्ये उत्तर कोरियाही सहभागी झाला. पण आता ऑलिंपिक संपल्यानंतर बुधवारपासून या कवायती पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
उत्तर कोरियाने या कवायतींचं वर्णन "चिथावणीखोर कृती" याच शब्दांत केलं आहे. या कवायतींच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासह प्रस्तावित असलेल्या सगळ्या बैठका रद्द केल्या.
उत्तर कोरियाचा सूर अचानक का बदलला? - सेऊलमधल्या बीबीसी प्रतिनिधी लौरा बिकर यांचं विश्लेषण
उत्तर कोरियाच्या मते त्यांनी काहीही पदरात पडलेलं नसतानाही खूप नमती भूमिका स्वीकारली आहे. उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्या बंद केल्या. यापुढे आणखी अण्वस्त्र चाचण्या होणार नाहीत, असं वचनही त्यांनी देऊ केलं. त्यांनी अणुचाचण्या घेण्याची आपली जागाही बंद करण्यास घेतली होती.

फोटो स्रोत, EPA
त्या पुढे जात त्यांनी दक्षिण कोरियासह अण्विक नि:शस्त्रीकरणाची शपथही घेतली होती. तसंच गेल्याच आठवड्यात त्यांनी तीन अमेरिकन कैद्यांना आपल्या कारागृहातून मुक्त केलं होतं.
पण उत्तर कोरियाने संपूर्ण नि:शस्त्रीकरण केल्याशिवाय त्यांना आर्थिक मदत करायची नाही, असा अमेरिकेचा हेतू असल्याचं जाणवतं. यासाठी उत्तर कोरिया तयार नाही.
ट्रंप-किम या चर्चेआधी आपला आवाज अमेरिकेला ऐकवणं आणि चर्चेच्या वेळी बरोबरीच्या नात्याने वागणूक मिळण्याची अपेक्षा ठेवणं, या गोष्टी बुधवारच्या उत्तर कोरियाच्या विधानातून साध्य होतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









