अमेरिकेचा उत्तर कोरियाला प्रस्ताव - अण्वस्त्रं टाका, तुमच्या विकासाचं आम्ही बघतो

फोटो स्रोत, Reuters
आण्विक नि:शस्त्रीकरण केल्यास दक्षिण कोरियाची आर्थिक घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असं आश्वासन अमेरिकेनं उत्तर कोरियाला दिलं आहे.
दक्षिण कोरियाच्या बरोबरीने उत्तर कोरियात विकास घडवण्यासाठी विविध पातळ्यांवर मदत पुरवली जाईल, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ यांनी स्पष्ट केलं. नुकतेच प्योनगाँगहून परतलेल्या पाँपेओ यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं.
किम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेटणार आहेत.

फोटो स्रोत, EPA
या दोन नेत्यांनी याआधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. ट्विटरच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांना दिलेल्या धमक्या चांगल्याच गाजल्या होत्या. मात्र गेल्या महिन्यात दक्षिण आणि उत्तर कोरियादरम्यान झालेल्या इंटर-कोरियन समिटनंतर उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी झाला आहे.
पाँपेओ उवाच
"किम यांनी योग्य मार्ग स्वीकारला तर उत्तर कोरियाच्या नागरिकांसाठी येता काळ शांतता आणि सुबत्तेचा असेल," असं पाँपेओ यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री कांग क्युंग व्हा यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीनंतर सांगितलं.
आण्विक नि:शस्त्रीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी धाडस दाखवून कृती करायला हवी, असा सल्ला पाँपेओ यांनी किम यांना दिला आहे.
नि:शस्त्रीकरणाच्या उत्तर कोरियाच्या प्रयत्नांची शहानिशा अमेरिकेकडून होणं आवश्यक आहे, यावर पाँपेओ यांनी भर दिला.
काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने आपल्या ताब्यातील अमेरिकेच्या तीन नागरिकांची सुटका केली आहे.
उत्तर आणि दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्थेची तुलना
1953 मध्ये कोरियन युद्ध संपल्यानंतर, अमेरिकेचा मित्रराष्ट्र असलेल्या दक्षिण कोरियाने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. आशिया खंडातील सधन अर्थव्यवस्थांपैकी दक्षिण कोरिया एक आहे.
1960च्या दशकात सरकारच्या पुढाकाराने प्रायोजित औद्योगिक विकास मोहीम दक्षिण कोरियाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. यामुळेच 'सॅमसंग' आणि 'ह्यूनदाई' सारख्या मोठ्या कंपन्या उदयास आल्या.
1.4 ट्रिलिअन डॉलर्स सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात GDP असलेल्या दक्षिण कोरियाचा जगातल्या अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होतो.
दुसरीकडे उत्तर कोरियाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न 20 अब्ज डॉलर्स एवढंच आहे. जगातल्या अव्वल 100 अर्थव्यवस्थांमध्येही उत्तर कोरियाचा समावेश होत नाही.
उत्तर कोरियात कम्युनिझम शासनव्यवस्था आहे, मात्र हळूहळू भांडवलशाही व्यवस्था रुजते आहे. उत्तर कोरियात मोजकी धनाढ्य मंडळी चांगलं आयुष्य जगतात मात्र बहुतांश जनता गरिबीचं जीणं जगते.
आगामी काळात उत्तर कोरियासाठी विकास हेच प्राधान्य असेल, असं किम जाँग-उन यांनी स्पष्ट केलं आहे.
हे पाहिलंत का?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









