गाझा पट्टीत 52 ठार, 2400 जखमी, पण का पेटलाय जेरुसलेमवरून संघर्ष?

धुमश्चक्रीदरम्यान पॅलेस्टाईचा झेंडा हातात धरलेला तरुण

फोटो स्रोत, MAHMUD HAMS

फोटो कॅप्शन, धुमश्चक्रीदरम्यान पॅलेस्टाईचा झेंडा हातात धरलेला तरुण

गाझा इथे झालेल्या भीषण संघर्षात इस्रायली सैनिकांनी 55 पॅलेस्टिनी निदर्शकांना ठार केलं आहे तर 2,700 जण जखमी झाले आहेत, असं पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 2014 सालच्या गाझा युद्धानंतरची ही सगळ्यांत मोठी हिंसा होय.

इस्राईलच्या सैन्याने आपल्या आत्मरक्षणासाठी हल्ले केले असं इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. इस्राईलला उद्ध्वस्त करण्याचा हमासचा डाव होता तो उधळून लावण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं असं नेत्यानाहू म्हणाले.

पॅलेस्टिनी नेत्यांनी या 'नरसंहारा'चा निषेध केला आहे. तर, हे मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याची टीका संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी केली आहे.

पॅलेस्टिनी अनेक आठवड्यांपासून निदर्शनं करत होते, पण अमेरिकेच्या जेरुसलेम इथल्या दूतावासाच्या उद्घाटनामुळे त्यांची निदर्शनं सोमवारी उग्र झाली.

इस्राईल, पॅलेस्टाईन

फोटो स्रोत, AFP

जेरुसलेम ही आमचीच राजधानी आहे, असा दावा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोहोंनी केला आहे. या वादामुळेच अनेक देशांनी आपले इस्राईलमधले दूतावास जेरुसलेममध्ये न ठेवता तेल अविवमध्ये ठेवले आहेत. पण डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचा दूतावास जेरुसलेममध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला.

जेरुसलेमच्या पूर्व भागावर पॅलेस्टाईननं हक्क सांगितला आहे. पण संपूर्ण जेरुसलेमवर आमचाच हक्क आहे, या इस्रायलच्या दाव्याला आता अमेरिकेने पाठिंबा दिला आहे, असं पॅलेस्टिनी लोकांना वाटत आहे. त्यामुळे सीमेवर त्याचे पडसाद उमटत आहेत.

गाझा आणि वेस्ट बँक या ठिकाणी पॅलेस्टिनींचं वर्चस्व आहे.
फोटो कॅप्शन, गाझा आणि वेस्ट बँक या ठिकाणी पॅलेस्टिनींचं वर्चस्व आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हीडिओ मेसेज पाठवून स्वतःच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "इस्रायल सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्यांना आपली राजधानी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे."

इस्रायलमध्ये दूतावास सुरू करण्याचं पाऊल अनेक वर्षांपूर्वीच टाकायला हवं होतं, असंही ते म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

जेरुसलेमपासून 97 किमी अंतरावर असलेल्या गाझा पट्टीवर पॅलेस्टिनींमधला असंतोष सोमवारी उफाळून आला. सुमारे 40,000 पॅलेस्टिनी निदर्शकांनी गाझा पट्टीवर 13 ठिकाणी "हिंसक दंगलीत" सहभाग घेतला, असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं.

सीमेवर नेमकं काय झालं?

पॅलेस्टिनी लोकांनी दगड आणि आगीचे गोळे फेकले तर इस्राइली सैनिकांनी गोळीबार केला. टायर्स जाळण्यात आल्यामुळे चहूबाजूंना काळा धूर पसरला होता.

हमास या पॅलेस्टिनी संघटनेच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की इस्राईलच्या हल्ल्यात लहान मुलंही मारली गेली आहेत.

इस्रायल सैन्याने टाकलेल्या अश्रुधूराच्या नळकाड्यांपासून दूर पळणारे पॅलेस्टिनी नागरिक.

फोटो स्रोत, MAHMUD HAMS

फोटो कॅप्शन, इस्रायल सैन्याने टाकलेल्या अश्रुधूराच्या नळकाड्यांपासून दूर पळणारे पॅलेस्टिनी नागरिक.

हमास ही इस्लामिक संघटना गेल्या 6 आठवड्यांपासून 'ग्रेट मार्च ऑफ रिटर्न' या नावाने निदर्शनं करत आहे. या आंदोलकांनी सीमेवरील कुंपण तोडण्याचा प्रयत्न केला, असं इस्राईलचं म्हणणं आहे.

14 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली तेव्हा लाखो पॅलेस्टिनी लोकांना आपलं घर सोडून पळून जावं लागलं होतं. हा दिवस पॅलेस्टाईनमध्ये दरवर्षी 'नकबा' (आपत्ती) या नावाने पाळला जातो. 14 मेच्या दिवशी आम्ही मोठी निदर्शनं करू, असं हमासने आधीच सांगितलं होतं.

या निदर्शनांमध्ये पॅलेस्टिनी महिलांनीही सहभाग घेतला.

फोटो स्रोत, MAHMUD HAMS

फोटो कॅप्शन, या निदर्शनांमध्ये पॅलेस्टिनी महिलांनीही सहभाग घेतला.

इस्रायलचं म्हणणं आहे की हे निदर्शक सीमा ओलांडून इस्रायली वस्त्यांवर हल्ले करणार होते, म्हणून आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

जेरुसलेममधल्या नव्या अमेरिकन दूतावासासमोर निदर्शकांनी पॅलेस्टाईचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यांत आणि इस्रायली पोलिसांत इथे काही काळ संघर्ष झाला. तेव्हा अनेक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आलं.

जखमी तरुणाला बाईवरून घेऊन जाताना.

फोटो स्रोत, MAHMUD HAMS

फोटो कॅप्शन, जखमी तरुणाला बाईवरून घेऊन जाताना.

इस्रायली लष्काराने म्हटलं आहे की सीमेच्या कुंपणाजवळ स्फोटकं ठेवणाऱ्या तिघांना त्यांनी ठार केलं. तसंच उत्तर गाझा पट्टीतल्या हमासच्या लष्करी ठिकाणांवर विमानांनी आणि रणगाड्यांनी हल्ले केले, असंही इस्रायलने म्हटलं आहे.

बेचकीने इस्रायली सैनिकांवर दगड मारणारा पॅलेस्टिनी तरुण.

फोटो स्रोत, SAID KHATIB

फोटो कॅप्शन, बेचकीने इस्रायली सैनिकांवर दगड मारणारा पॅलेस्टिनी तरुण.

जगभरातून काय प्रतिक्रिया?

  • यूके आणि पश्चिमेतल्या अनेक देशांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
  • युरेपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख फेडेरिका मोहरिनी यांनी म्हटलं आहे, "जीवितहानी होऊ नये म्हणून सर्वांनी कमालीचा संयम बाळगण्याची आवश्यकता आहे."
  • जर्मनीने म्हटलं आहे की इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी प्रमाणानुसारच प्रतिक्रिया द्यावी.
  • अरब लीगचे प्रमुख अहमद अबुल घेइत यांनी म्हटलं आहे की अमेरिका आणि इस्रायल यांची कृती निंदाजनक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारी आहे.
  • सर्वांत स्पष्ट प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांचे मानव हक्कांचे उच्चायुक्त झैद राद अल-हुसैन यांनी दिली आहे. त्यांनी "इस्रायलच्या धक्कादायक हत्यांचा" निषेध केला आहे.
X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

स्वागत आणि निषेध

डोलन्ड ट्रंप यांच्या कन्या आणि सल्लागार इवांका ट्रंप यांच्या उपस्थितीत अमेरिकन दूतावासाचं उद्घाटन झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू म्हणाले, "हा दिवस वैभवशाली आहे. ऐतिहासिक आहे. राष्ट्रध्यक्ष ट्रंप, जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देऊन तुम्ही इतिहास रचला आहे. आम्ही तुमचे ऋणी आहोत."

तर दुसरीकडे पॅलेस्टिनियन अथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या प्रवक्त्याने म्हटलं, "या कृतीमुळे अमेरिकेने शांतता प्रक्रियेतली आपली भूमिका रद्द केली आहे. अमेरिकेने जगाचा, पॅलेस्टिनी लोकांचा, अरब जगताचा आणि इस्लामिक राष्ट्रांचा अपमान केला आहे. अमेरिकेने चिथावणी देऊन अस्थिरता निर्माण केली आहे."

गाझा

फोटो स्रोत, AFP

line

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला वाद नेमका काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : जेरुसलेमबद्दल इस्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये नेमका वाद काय?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)