You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हुआवेच्या CFO मेंग वांगझोयू यांना का झाली अटक?
चीनची टेलकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी हुआवे (Huawei) आंतरराष्ट्रीय रडारवर आहे. अनेक देशांनी या कंपनीच्या उत्पादनांवर सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. तर 1 डिसेंबरला या कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी मेंग वांगझोयू यांना कॅनडामध्ये अटक झाली आहे.
मेंग अमेरिकेत 'वाँटेड' असून त्यांच्यावर अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध मोडल्याच्या संदर्भातील आरोप आहेत, अशी माहिती 7 डिसेंबरला कोर्टात देण्यात आली.
तर दुसरीकडे जपानचं सरकारने हुआवे आणि चीनची आणखी एक कंपनी ZTEकडून उत्पादनं विकत घेण्याचा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असं वृत्त आहे.
नेमकी चिंता काय आहे?
चीन हुआवेचा उपयोग Proxy म्हणून करते, अशी काही देशांना भीती वाटते. स्पर्धक देशांत हेरगिरी करणं आणि महत्त्वाची माहिती मिळवणं यासाठी हुआवेचा वापर केला जात असावा, असं या देशांना वाटते. तर हुआवेने ती स्वतंत्र कंपनी असून तिचा सरकारशी कर देण्याशिवाय दुसरा कसलाही संबंध नाही, असा खुलासा केला आहे.
पण चीनमधील कोणताही उद्योग सरकारच्या प्रभावातून कसा काय मुक्त राहू शकतो, असा प्रश्न टीकाकार करतात. हुआवेचे संस्थापक रेन झाँगफे चीनच्या लष्करात अभियंते होते. तसेच त्यांनी 1978ला कम्युनिस्ट पक्षात सदस्यत्व घेतलं होतं.
ही कंपनी स्वतःला कर्मचाऱ्यांची मालकी असलेली आणि चीनच्या सरकारशी कसलाही संबंध नसलेली कंपनी असल्याचं दाखवते.
या कंपनीने संशोधन आणि विकास यावर 2017मध्ये 13.3 अब्ज डॉलर इतका खर्च केला होता. हा खर्च 2018मध्ये आणखी वाढवण्यात येणार होता. टीकाकारांना असं वाटतं की चीन सरकार या कंपनीला तिची उपकरणांत इतरांचं संभाषण चोरून ऐकणे, हॅकिंग, संवेदनशील नेटवर्कवर ताबा मिळवण्यासाठी बदल करण्याचे आदेश देऊ शकते.
स्पर्धक देशांच्या पायाभूत सुविधांचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या एखाद्या कंपनीला चीन कितपत स्वतंत्र राहू देऊ शकतं, अशी शंका टीकाकारांना आहे. ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमाकांची स्मार्टफोन बनवणारी कंपनी आहे.
कोणत्या देशांनी काय कारवाई केली आहे?
नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडने या कंपनीला स्थानिक मोबाईल नेटवर्कना 5जी उपकरणं देण्यास बंदी घातली आहे.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने Next-Generation मोबाईल नेटवर्कमध्ये या कंपनीला दरवाजे बंद केले आहेत.
कॅनडामध्ये या कंपनीच्या उपकरणांचा सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षण सुरू आहे.
यूकेमध्ये BT या सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीने हुआवेच्या किटवर बंदी घातली आहे.
7 डिसेंबरला युरोपीयन युनियनचे तंत्रज्ञान आयुक्त अँड्रस अनसिप यांनी चीन उत्पादकांबद्दल काळजी केली पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. यूकेमध्ये हुआवेच्या उत्पादनांवर बंदी नसली तरी या कंपनीच्या उत्पदनांवर GCHQ Intelligence एजन्सीकडून पडताळणी केली जाते. GCHQने तिच्या अहवालात या उत्पदनांत काही त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे या कंपन्यांची उत्पदनांबद्दल मर्यादित खात्री देता येईल, असं या संस्थेनं म्हटलं होतं. या आठवड्यात Financial Timesच्या वृत्तात हुआवेने GCHQने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं म्हटलं आहे. हॅकिंगपासून आपली उपकरणं सुरक्षित करू असं हुआवेने म्हटल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
मेंग यांना अटक का झाली?
मेंग यांना झालेली अटक कॅनडाने जाहीर केलेली नव्हती. त्यांच्यावरील आरोपही जाहीर केलेले नव्हते. त्यांच्या जामिनावर तिथल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कॅनडाच्या वकिलांनी मेंग यांनी हुआवेची उपकंपनी Skycomचा वापर करून 2004 ते 2014 या कालावधीत इराणवरील निर्बंधाचं उल्लंघन केलं असं म्हटलं आहे. त्यांनी Skycom ही स्वतंत्र कंपनी असल्याचं दाखवलं असंही वकिलांनी सांगितलं.
चीनने मेंग यांनी कोणात्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसून त्यांची सुटका करावी असं म्हटलं आहे.
हुआवेनं म्हटलं आहे की मेंग यांनी गैरकृत्य केल्याबद्दल कंपनीला काहीही माहिती नाही. कॅनडा आणि अमेरिकेतील न्यायव्यवस्था योग्य निर्णयापर्यंत येईल. आमची कंपनी जिथं काम करते, तिथले सर्व कायदे पाळते. या नियम आणि कायद्यात विविध संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका, युरोपीयन युनियन यांचे कायदे, नियम, निर्बंध यांचा समावेश आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)