You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जॉर्ज H W बुश : 90 टक्के लोकप्रियता असूनही निवडणूक हरणारा राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज H W बुश यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं आहे.
त्यांचे पुत्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W बुश (कनिष्ठ) एक निवेदन जारी करत म्हणाले, "जेब, नील, मार्विन आणि मला हे सांगताना हे अत्यंत दु:ख होत आहे की आमचे वडील आता या जगात नाहीत."
"ते अत्यंत चारित्र्यवान आणि जगातील सगळ्यात उत्तम वडील होते." असंही ते पुढे म्हणाले.
जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे त्यांचं पूर्ण नाव होतं, मात्र जॉर्ज बुश (ज्येष्ठ) या नावाने ते ओळखले जायचे. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करी वैमानिक म्हणून भाग घेतला होतं. त्यानंतर त्यांनी टेक्सासमध्ये तेलाचा व्यापार सुरू केला आणि वयाच्या 40व्या वर्षी मिलिनेयर होऊन 'तेलसम्राट' म्हणून ओळख मिळवली.
टेक्सास ते वॉशिंगटन व्हाया चीन
1964 मध्ये रिपब्लिक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि टेक्सासमधून निवडणूक लढवून अमेरिकन काँग्रेसमध्ये आपलं स्थान पक्क केलं. पण त्यापूर्वीचे त्यांचे काही प्रयत्न फसलेही.
1971 साली राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये राजदूत म्हणून नियुक्त केलं, त्यानंतर ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षही झाले.
निक्सन यांना 'वॉटरगेट' प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला. रिपब्लिकन पक्षाला सार्वजनिक रोष पत्करावा लागला, यानंतर काही काळ बुश हे चीनमध्ये राजदूत म्हणून गेले.
चीन मधून त्यांना लवकरच परत बोलावण्यात आलं आणि अनेक समस्यांनी ग्रासलेल्या अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेच्या म्हणजे CIAच्या धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या. राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड सत्तेत असेपर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली.
1980 साली त्यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी रिंगणात उडी घेतली, पण रोनाल्ड रेगन यांनी त्यांच्यावर मात केली. पण बुश यांची उपराष्ट्राध्यक्षपदी वर्णी लागली.
आठ वर्षं व्हाईट हाऊस मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बुश यांनी अखेर 1989 साली स्वतःच्या ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश केला.1990चं आखाती युद्ध बुश यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलं. कुवेतवर इराकने केलेल्या हल्ल्याच्या वेळी अमेरिका बेसावध होती. आपल्या लष्करी ताकदीच्या जोरावर अमेरिकेने 100 तासात इराकचं आक्रमण परतवून लावलं. त्यामुळे बुश यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली खरी, पण त्याचं रूपांतर ते मतांमध्ये करू शकले नाहीत.
90 टक्के पेक्षा लोकप्रियता मिळवूनही रिपब्लिक पक्षावर देशातल्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळेच 1992 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिल क्लिंटन बुश (ज्येष्ठ) यांचा पराभव करू शकले.
बुश यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली नाही. पण 2001 साली त्यांचा मुलगा जॉर्ज W. बुश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसणारी बाप-लेकाची ही फक्त दुसरी जोडी होती.
या वर्षीं एप्रिल महिन्यात त्यांची पत्नी बार्बरा यांचं निधन झालं होतं. त्याच्या काही दिवसांनंतर त्यांना जंतूसंसर्ग झाल्यामुळे ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं.
श्रद्धांजली
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप, जे सध्या G20 परिषदेसाठी अर्जेंटिना दौऱ्यावर आहेत, यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे जॉर्ज H W बुश यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी देशासाठी केलेल्या सेवेव्यतिरिक्त आम्ही त्यांना त्यांच्या कुटुंबीयांप्रति, विशेषतः त्यांच्या पत्नीसाठी असलेल्या प्रेमासाठीसुद्धा स्मरणात ठेऊ.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बुश (ज्येष्ठ) यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, "बुश यांच्या रूपात अमेरिकेने एक सेवक आणि देशभक्त गमावला आहे. आज आम्ही दु:खी आहोत तरी मनात त्यांच्याप्रति कृतज्ञता आहे. बुश कुटुंबीयांबरोबर तसंच जॉर्ज आणि बार्बरा यांनी प्रेरणा दिलेल्या लोकांबरोबर आमच्या संवेदना आहेत."
"त्यांच्या कार्याचा जो वारसा मागे सोडून गेले आहेत, त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. निदान तसा प्रयत्न तरी करावा, अशी त्यांची नक्कीच अपेक्षा होती असंही ओबामा म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)