You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'द सिल्व्हर फॉक्स' : बार्बरा बुश यांच्याबद्दल या 5 गोष्टी माहिती आहेत का?
पती आणि मुलगा असे दोघेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले पाहण्याचं दुर्मीळ भाग्य लाभलेल्या बार्बरा बुश यांचं 92व्या वर्षी निधन झालं.
त्यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात "कौटुंबिक साक्षरतेचा अथक प्रसार करणाऱ्या" अशा शब्दांत त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे.
गेले काही दिवस त्या ह्रद्यविकार आणि श्वसनाच्या त्रासानं अत्यवस्थ होत्या. त्यांनी औषधोपचार घेण्यासही नकार दिला. अंतिम काळ ह्युस्टनमधील घरात शांततेत घालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
बार्बरा बुश यांचे पती जॉर्ज बुश 93 वर्षांचे आहेत. ते अमेरिकेचे 41वे राष्ट्राध्यक्ष तर त्यांचे चिरंजीव जॉर्ज डब्ल्यू बुश हे 43वे राष्ट्राध्यक्ष होते. बुश यांना एक टर्म तर जॉर्ज डब्ल्यू बुश यांना दोन टर्म मिळाल्या.
बार्बरा बुश यांच्याबद्दल 5 गोष्टी
1. पती जॉर्ज बुश आणि मुलगा जॉर्ज डब्ल्यू बुश या दोघांचाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी पाहणाऱ्या बार्बरा या एकमेव अमेरिकन महिला होत्या.
त्यापूर्वी अॅबिगेल अॅडम्स यांचे पती जॉन अॅडम्स हे अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. तर त्यांचे चिरंजीव जॉन क्वीन्सी अॅडम्स हे सहावे राष्ट्राध्यक्ष होते. अर्थात, ते राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी अॅबिगेल हयात नव्हत्या.
2. बार्बरा बुश यांना त्यांच्या पांढऱ्या शुभ्र केसांमुळे 'द सिल्व्हर फॉक्स' म्हटलं जायचं.
3. पती राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा कामात हस्तक्षेप असतो, असं म्हटलं जायचं. त्याचं खंडन करताना त्या म्हणाल्या, "मी त्यांच्या कार्यालयीन कामात ढवळाढवळ करत नाही, आणि ते माझ्या घरगुती कामात लक्ष घालत नाहीत."
4. सामाजिक न्यायाचा त्यांनी जोरदार पाठपुरावा केला. वंशवादाच्या विरोधातही त्या उभ्या राहिल्या.
अमेरिकेतून निरक्षरता हद्दपार करण्यासाठी झालेल्या चळवळीतही त्या सक्रिय होत्या. त्यांनी घेतलेल्या भूमिका या प्रसंगी त्यांच्या पतींच्या पक्षाच्या विरोधीही होत्या. त्यामुळे त्या त्यांना कधीकधी मवाळही कराव्या लागल्या.
5. 2013मध्ये त्यांनी, 'देशानं खूप बुश अनुभवले' असं विधान NBC शी बोलताना केलं होतं. पण तरीही 2016 मध्ये त्यांचे दुसरे चिरंजीव जेब बुश यांच्या उमेदवारीस पाठिंबा मिळवण्यासाठी त्या मैदानात उतरल्या होत्या.
पण जेब यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यात अपयश आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)