You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉमनवेल्थ संघटनेबाबत या 7 गोष्टी माहिती आहेत?
1. जगाच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश जनता कॉमनवेल्थ सदस्य
जगाची लोकसंख्या 7.4 अब्ज आहे. यापैकी एक तृतीयांश म्हणजे जवळपास 2.4 अब्ज नागरिक कॉमनवेल्थचे सदस्य असलेल्या 53 देशांचा भाग आहेत. यापैकी बहुतांश जणांनी वयाची तिशी सुद्धा ओलांडलेली नाही.
कॉमनवेल्थ सदस्य राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मेजण भारतात राहतात. 31 कॉमनवेल्थ सदस्य देशांमध्ये मिळून 1.5 दशलक्ष नागरिक राहतात.
2. हे देश कॉमनवेल्थचा कधीच भाग नव्हते
मोझांबिक 1995 मध्ये तर रवांडा 2009 मध्ये कॉमनवेल्थचा भाग झाले. मात्र या दोन्ही देशांमध्ये ब्रिटिशांची म्हणजे इंग्लंडची वसाहत नव्हती. या दोन्ही देशांचे संविधान आणि प्रशासन यांचा इंग्लंडशी काहीही संबंध नव्हता.
कॉमनवेल्थचे सदस्य देश कमी झाल्याची देखील उदाहरणं आहेत. 2003 मध्ये रॉबर्ट मुगाबेप्रणित झिम्बाब्वेनं कॉमनवेल्थ सोडलं. कारण निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याप्रकरणी झिम्बाब्वेला कॉमनवेल्थमधून निलंबित करण्यात आलं होतं.
1999 मध्ये लष्करी उठावामुळे पाकिस्तानला कॉमनवेल्थमधून निलंबित करण्यात आलं होतं. साडेचार वर्षानंतर पाकिस्तानला पुन्हा समाविष्ट करण्यात आलं.
वर्णद्वेषी धोरणावर टीका झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं 1961 मध्ये कॉमनवेल्थमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा कॉमनवेल्थमध्ये स्थान देण्यात आलं.
2016 मध्ये कॉमनवेल्थचं सदस्यत्व सोडणारा मालदीव हा शेवटचा देश होता.
3. राणी केवळ 16 देशांची प्रमुख
कॉमनवेल्थ सदस्य असणाऱ्या अनेक देशांपैकी केवळ 16 देशांमध्ये इंग्लंडच्या राणीकडे देशाची सूत्रं आहेत. 31 देशांमध्ये स्वतंत्र प्रजासत्ताक आहे तर सहा देशांमध्ये तिथल्या राजांची सत्ता आहे.
लेसोथो, स्वाझीलँड, ब्रुनेई दारुसलाम, मलेशिया, सामोआ आणि टोंगा या देशांमध्ये राजेशाही प्रशासन आहे.
4. कॉमनवेल्थचा विस्तीर्ण पसारा
जगाच्या क्षेत्रफळापैकी कॉमनवेल्थ सदस्य राष्ट्राचं मिळून एक चतुर्थांश क्षेत्रफळ आहे. कॉमनवेल्थ राष्ट्रांपैकी कॅनडाचा आकार सगळ्यात मोठा आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत कॅनडा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचंही आकारमान प्रचंड आहे. मात्र नौरु, सामोआ, तुवालू, वनातू ही पॅसिफिक महासागरातली बेटं तसंच डॉमिनिका, अँटिगा अँड बार्बुडा ही कॅरेबियन बेटांचा आकार अगदीच छोटा आहे.
5. कॉमनवेल्थची बदलती नावं
आधुनिक कॉमनवेल्थची रचना 1949 मध्ये करण्यात आली. कॉमनवेल्थच्या नावातून 'ब्रिटिश' हा शब्द आणि इंग्लंडच्या राजघराण्याप्रती असलेली निष्ठा हे दोन्ही उल्लेख वगळण्यात आले.
किंग जॉर्ज सहावे आणि राणी एलिझाबेथ दुसरी यांच्याकडे कॉमनवेल्थचं प्रमुखपद होतं. मात्र हे नेतृत्व परंपरागत नाही. प्रिन्स ऑफ वेल्स राजेपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्याकडे कॉमनवेल्थची धुरा असेल.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि यूके हे देश कॉमनवेल्थचे सदस्य आहेत. या देशांनी मिळून स्वतंत्र देशांची संघटना स्थापना केली.
2012 पर्यंत कॉमनवेल्थला स्वत:चं संविधान नव्हतं. 2012 मध्ये कॉमनवेल्थनं स्वत:ची सनद स्वीकारली. लोकशाही, लिंगसमानता, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा अशी एकूण 16 मूल्यं अंगीकारली.
वसाहतवादाचं प्रतीक आणि मामुली प्रभाव या कारणांसाठी कॉमनवेल्थवर टीका करण्यात येते. कॉमनवेल्थ हे नववसाहतवाद निर्मितीचं केंद्र असं संबोधत गांबियानं कॉमनवेल्थ सोडलं होतं.
आंतरराष्ट्रीय पातळीवरची उद्दिष्टं साध्य करण्याच्या दृष्टीनं तसंच विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत कॉमनवेल्थ सदस्यत्व उपयुक्त ठरतं असं कॉमनवेल्थचे समर्थक सांगतात.
'लोकशाही, विकास आणि वैविध्यतेचा सन्मान ही मूल्यं जपण्याचा निर्धार कॉमनवेल्थ सदस्य देशांनी केला आहे', असं कॉमनवेल्थचे सरचिटणीस लेडी स्कॉटलंड यांनी सांगितलं.
6. कॉमनवेल्थमध्ये इंग्लंडची अर्थव्यवस्था अग्रेसर
कॉमनवेल्थ देशांमध्ये इंग्लंडची अर्थव्यवस्था अव्वल स्थानी आहे. मात्र लवकरच भारत हे अग्रस्थान पटकावू शकतो. 53 कॉमनवेल्थ देशांचं एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न 10 ट्रिलिअन डॉलर्स एवढं आहे. मात्र तरीही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा आकडा कमीच आहे.
2016 मध्ये इंग्लंडनं कॉमनवेल्थ देशांना केलेली निर्यात आणि जर्मनीला केलेली निर्यात यांची आकडेवारी जवळपास (8.9%) सारखीच होती. दुसरीकडे इंग्लंडच्या एकूण आयातीपैकी 7.8 टक्के आयात कॉमनवेल्थ देशांमधून झाली. हे प्रमाण चीनमधून होणाऱ्या आयातीएवढं आहे.
7. कॉमनवेल्थ एकमेव नाही
फ्रेंच भाषा बोलणाऱ्या देशांची संघटना 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ ला फ्रान्कोफोनी' सुद्धा कार्यरत आहे. सोव्हियत युनियनमधून विघटन झालेल्या देशांनी मिळून 1991 मध्ये 'कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेन्डंट स्टेट्स' नावाची संघटना स्थापन केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)