You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपले रेटिंग सुधारण्यासाठी रशियासोबत तणाव वाढवला - पुतिन
2019च्या निवडणुकांपूर्वी आपलं रेटिंग सुधारण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको रशियासोबत तणावाचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.
रशियाने युक्रेनच्या तीन जहाजांवर हल्ला करून जहाजावरील 23 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनच्या काही भागांत मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी मार्शल लॉ लागू करण्याची सूचना केली, त्याला संसदेने मान्यता दिली.
रशियाच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता असलेल्या किनारी भागात 30 दिवसांसाठी हा मार्शल लॉ लागू असेल.
राष्ट्राध्यक्ष पोरोशेंको यांना या तणावातून आपली रेटिंग वाढवायची असल्याचं पुतिन म्हणाले. बुधवारी एका इन्वेस्टमेंट फोरममध्ये या वादावर आपली मत मांडली.
"त्यांना परिस्थिती चिघळवण्यासाठी काहीतरी करायचं होतं," असं पुतिन म्हणाले.
"रशियासोबत युद्धाच्या भीतीमुळे देश धोकादायक परिस्थितीत आहे. याला कुणीही हलक्यात घेऊ नये," असं राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले.
काय आहे प्रकरण?
रशियाने 2014ला ताब्यात घेतलेल्या क्रिमियापासून काही अंतरावर रशियाने समुद्रातील युक्रेनच्या 3 बोटींवर रशियाने हल्ला केला आणि या बोटी जप्त केल्या. यामध्ये युक्रेनचे किमान तीन खलाशी जखमी झाले आहेत.
रशियाची ही कृती म्हणजे आगळिक असल्याची टीका युक्रेनने केली आहे.
रशियाने ही जहाजांनी बेकायदेशीररीत्या समुद्रात प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या या खलाशांची साक्षही टीव्हीवर प्रसारित केली असून त्यामध्ये युक्रेनचे खलाशी त्यांची कृती रशियासाठी प्रक्षोभक असल्याचं मान्य करताना दिसतात.
पण, आमच्या खलाशांना बळजबरीने डांबून त्यांनी कबुली देण्यास भाग पाडलं आहे, असा दावा युक्रेन नौदलाच्या प्रमुखांनी केला आहे.
गेल्या काही वर्षांतील रशिया आणि युक्रेन यांच्यात पहिल्यांदाच खुला संघर्ष होत आहे. तर रशियाचं पाठबळ असलेले फुटीरतावादी आणि रशियाचे स्वयंसेवक 2014पासून युक्रेनच्या फौजांशी पूर्वी युक्रेनमध्ये संघर्ष करत आहेत.
बऱ्याच पाश्चात्त्य देशांनी रशियाच्या कृतीचा विरोध केला आहे.
क्रिमिया प्रकरण काय आहे?
क्रिमिया द्वीपकल्प अधिकृतरीत्या युक्रेनचा भाग आहे. अझोव समुद्र आणि काळ्या समुद्राच्यामध्ये असलेला क्रिमिया द्वीपकल्प हा युक्रेनच्या दक्षिणेकडचा भाग आहे. तर रशिया आणि क्रिमियाच्या दरम्यान केर्च ही सामुद्रधुनी आहे.
2014मध्ये हिंसक निदर्शनानंतर युक्रेनचे रशियन समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोव्हीच यांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच रशिया आणि पाश्चिमात्य देशांत क्रिमिया हा कळीची मुद्दा ठरला होता.
रशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरतावाद्यांनी क्रिमियन द्वीपकल्प ताब्यात घेतले आहे. बहुतेक रशियन भाषिक असलेल्या लोकांनी त्यावेळी रशियात सामिल होण्याच्या बाजूने मतदान केलं होतं.
युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी ते सार्वमत बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)