Brexit : गुगलवर शोधले जाणारे 4 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर आपण काय करतो. कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर गुगल सुरू करतो आणि हवी ती माहिती सर्च करतो. Brexit ब्रेक्झिटवर तुमच्या मनात काही शंका आली तर तुम्ही हेच करता. ब्रेक्झिटबद्दल गुगलवर सर्वांत जास्त विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तर अशी

1. Brexit म्हणजे काय?

Brexit हा British Exitचा शॉर्ट फॉर्म आहे. Brexit म्हणजे यूके युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया होय.

युरोपियन युनियन युरोपमधील 28 देशांचा समूह आहे. हे देश एकमेकांशी व्यापर करतात आणि या देशांतील नागरिकांना सहज जाता येतं आणि कामही करता येतं.

जून 2016मध्ये यूकेमध्ये सार्वमत घेण्यात आलं. त्यानुसार 40 वर्षांपासून युरोपियन युनियनचा भाग असलेल्या यूकेने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अर्थात हे तितकं सरळ नाही. 19 मार्च 2019ला यूके युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे.

2. Brexit Deal काय आहे?

Brexitच्या बाजूने मतदान झाल्यानंतर यूके आणि युरोपीयन युनियनमध्ये चर्चा सुरू झाली. यूकेने युरोपियन युनियनमधून कसं बाहेर पडावं यासाठी करार करायचा आहे. यूकेच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा करार सादर केला.

त्यातील मुद्दे असे :

  • यूके युरोपियन युनियनला 39 अब्ज पाऊंड देईल.
  • बदलासाठीचा कालावधी 20 मार्च 2019 ते 31 डिसेंबर 2020 असा आहे. या कालावधीत व्यावसायिक करार होतील. व्यवसायांना बदलाशी जुळवून घेण्यासाठी हा कालावधी असेल.
  • युरोपियन युनियनचे नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय 31 डिसेंबर 2020पर्यंत यूकेत मुक्तपणे जाऊ शकतात.
  • या कालावधीत व्यापारात फार बदल होणार नाहीत.
  • नॉदर्न आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये कसलीही भौगोलिक सीमा असून नये असं यूके आणि युरोपियन युनियनला वाटतं. पण करारात Backstop असावेत असं म्हटलं आहे.

3. Brexitच्या करारावर मतदान कधी होईल?

25 नोव्हेंबरला पंतप्रधान युरोपियन नेत्यांचा या कराराला औपचारिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर यूकेच्या संसदेत खासदारांचं पाठबळ मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करतील. हे बहुतेक करून डिसेंबरमध्ये होऊ शकेल.

सध्याच्या घडीला मे यांच्या कराराला पाठबळ मिळणार नाही असं चित्र आहे. सर्वच पक्षात या करारावर नाराज असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता, सद्यस्थितीत त्यांच्या कराराला पाठबळ मिळणं कठीण दिसतं.

4. Brexit खरोखर होईल का?

यूकेच्या कायद्यानुसार Brexit होणार आहे. पण काही लोक यावर पुन्हा मतदान घ्यावं असं म्हणत आहेत. आता करार माहिती असल्याने लोकांना यूकेने युरोपियन युनियन बाहेर पडावे असं वाटतं का, असं लोकांना विचारावं, असं या लोकांना वाटतं. याला "People's Vote" म्हटलं जात आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)