You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
UKमध्ये राजकीय संकट : ब्रेक्झिटवरून दोन मंत्र्यांचे राजीनामे
दोन दिवसांत 2 मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने युनायटेड किंगडममध्ये ब्रेक्झिटवरून राजकीय संकट गहिरं झालं आहे. रविवारी ब्रेक्झिट मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी परराष्ट्र मंत्री बोरीस जॉन्सन यांनीही राजीनामा दिला आहे.
डेव्हिस यांच्या राजीनाम्यानंतर जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचं ब्रेक्झिट नियोजन अडचणीत आलं आहे. दोन दिवसांतील 2 राजीनाम्यामुळं पंतप्रधान थेरेसा मे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
डेव्हिड डेव्हिस यांच्या जागी गृहनिर्माण मंत्री डॉमिनिक राब यांची नियुक्ती करण्यात आली.
पंतप्रधान मे संसदेत युनायटेड किंगडमचं ब्रेक्झिटचा नवं नियोजन सादर करण्यापूर्वीच जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याने टोरी पक्षाच्या खासदारांनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने जॉन्सन यांचे आभार मानले असून पर्यायी व्यवस्था लवकरच केली जाईल, असं म्हटलं आहे.
बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा कुएन्सबर्ग यांनी जॉन्सन यांचा राजीनामा पंतप्रधान मे यांच्यासाठी लाजीरवाणी घटना असून याचं रुपांतर मोठ्या राजकीय संकटात होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रिटनने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडावं यासाठीच्या मोहिमेचा चेहरा म्हणून जॉन्सन यांची ओळख बनली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे नेतृत्वाचं संकट निर्माण होणार आहे. लेबर पक्षाने जॉन्सन यांच्या राजीनाम्यामुळे मे अधिकारहीन झाल्या आहेत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. जॉन्सन पूर्वी लंडनचे महापौरही होते.
तत्पूर्वी डेव्हिड डेव्हिस यांनी राजीनामा देताना मे यांनी बरंच काही अगदी सहज सोडून दिलं आहे, असं म्हटलं आहे. डेव्हिड डेव्हिस यांनी बीबीसीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या ब्रेक्झिटच्या नियोजनावर शंका घेतली आहे. "त्यांना खरोखर युरोपीयन युनियन सोडायचं आहे का? मला तरी तसं वाटत नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.
ब्रिटनने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडावं यासाठी चालवण्यात आलेल्या मोहिमेला ब्रेक्झिट असं नाव मिळालं आहे. यासाठी 23 जून 2016ला मतदान घेण्यात आलं. यामध्ये ब्रिटनने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडावं या बाजूने 51.9 टक्के लोकांनी मतदान झालं. युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी सध्या युरोपीयन युनियनसोबत ब्रिटनच्या वाटाघाटी सुरू आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)