You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रेक्झिट : थेरेसा मे आक्रमक, तर युरोपियन युनियनची सावध भूमिका
युनायटेड किंगडमचा सन्मान ठेवा, अन्यथा ब्रेक्झिटच्या चर्चेतून माघार घेऊ, असा इशारा पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिल्यानंतर युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर युनायटेड किंगडमशी अद्यापही तडजोड होऊ शकते, असं टस्क यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
युनायटेड किंगडम 29 मार्च 2019ला युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे. त्यामुळे यूकेला युरोपियन युनियनशी या संदर्भांत नोव्हेंबरपर्यंत करार पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.
मे यांनी शुक्रवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. "ब्रेक्झिट संदर्भात युरोपियन युनियनच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यावर घातलेल्या अटी मान्य करणं शक्य नाही. जोवर युरोपियन युनियनकडून पुढाकार घेतला जात नाही, तोवर ही कोंडी सुटणं अशक्य आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
मे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर टस्क यांनी पत्रकातून खुलासा केला आहे.
"युरोपियन युनियनची चर्चेची आणि तडजोडीची तयारी आहे, मात्र थेरेसा मे याच तडजोडीसाठी तयार नाहीत," असं म्हणून त्यांनी युरोपियन युनियनच्या निर्णयाची पाठराखण केली आहे.
"त्यांनी जो आराखडा सादर केला, त्यांनी जे आर्थिक प्रस्ताव सादर केले आहेत ते व्यावाहारिकदृष्ट्या पूर्ण होणं शक्य नाही तसेच त्यामुळे बाजारपेठ कमकुवत होण्याचा धोकाही आहे," असं असं युरोपियन युनियननं म्हटलं आहे.
युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडममध्ये होणाऱ्या व्यापारात सुसूत्रता यावी म्हणून वस्तूंबाबत समान नियम आणि करपद्धती असावी असं थेरेसा मे यांना वाटतं पण सेवांबाबत तशी तरतूद नसावी असं त्या म्हणतात.
हीच योजना युरोपियन युनियनच्या नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी ऑस्ट्रियामध्ये झालेल्या शिखर परिषदेत केला होता.
टस्क म्हणाले, "थेरेसा मे यांच्या प्रस्तावात काही सकारात्मक गोष्टींचा समावेश आहे पण युनियनच्या नेत्यांना वाटतं की मे यांनी सुचवलेला उपाय अपरिपूर्ण आहे. यामुळे युरोपीय बाजारपेठ कमकुवत होईल."
"शिखर परिषदेतली युनायटेड किंगडमची भूमिका तडजोड करण्याची तयारी नाहीच अशा स्वरूपाची होती. पण तडजोड झाली तर ती सर्वांच्याच फायद्याची ठरेल," असं टस्क म्हणाले.
"मी युरोपियन युनियनचा सन्मान ठेवला, तीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे. या प्रक्रियेच्या शेवटी मला सर्वांकडून सहकार्य आणि दृढ नात्याची अपेक्षा आहे आणि ती चर्चेत झालेल्या निर्णयावरच अवलंबून आहे," असं मे म्हणाल्या होत्या. आता या टप्प्यावर समोरच्या व्यक्तीनं दिलेला प्रस्ताव योग्य स्पष्टीकरण न देता धुडकावून लावणं हे स्वीकारण्याजोगं नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.
"थेरेसा मे यांच्याकडे पाहून असं वाटत नाही की त्या तडजोड स्वीकारतील. त्यांच्या पक्षातील आणि युरोपियन युनियनमधल्या नेत्यांना मात्र असं वाटतं की त्यांनी तडजोड करावी," असं बीबीसीच्या राजकीय संपादक लॉरा क्युएन्सबर्ग निरीक्षण आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)