You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठी कुटुंबावर इंग्लंडमध्ये हल्ला : आठवडा होत आला तरी हल्लेखोर मोकाट
- Author, गगन सबरवाल
- Role, बीबीसी मराठीसाठी
लंडनमध्ये 16 सप्टेंबर रोजी एका मराठी कुटुंबाच्या घराचं कुंपण जाळण्यात आलं. शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला त्वरित कळवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
डिजिटल कन्सलटंट मयुर कार्लेकर, त्यांची पत्नी रीतू आणि त्यांची दोन मुलं त्यांच्या घरात झोपलेली असताना त्यांच्या घराला आग लावण्यात आली. ही आग लागल्याचं त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं. रात्री 12.30 वाजता शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला बोलवलं आणि आग आटोक्यात आणली.
लंडनच्या बॉर्कवूड पार्क भागात त्यांचं घर आहे. बीबीसी मराठीसोबत बोलताना कार्लेकर यांनी सांगितलं, "ही खूप भीतीदायक घटना होती. ही आग सिगरेटमुळे लागली नव्हती तर मुद्दाम कुणीतरी लावली होती. असं आम्हाला अग्निशमन दलानं सांगितलं आणि हे जास्त भीतीदायक आहे."
ही घटना द्वेषातून झाली आहे की नाही याचा तपास मेट्रोपोलिटन पोलीस करत आहेत. पण अद्याप कुणालाही अटक झाली नाही, असं पोलिसांनी बीबीसीला सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसलं आहे की, 'हुडीज' घातलेले चार-पाच तरुण त्या भागात आले आणि घराच्या कंपाउंडजवळ आग लावण्याचा प्रयत्न केला. कार्लेकर हे मराठी असून गेल्या 20 वर्षांपासून ते इंग्लंडमध्ये राहत आहेत.
"आम्ही कधी कोणाला काही त्रास दिला नाही. आम्ही सर्वांना शक्य ती मदत केली आहे. मी विशेष पोलीस स्वयंसेवकाचं काम देखील केलं आहे. ही घटना माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी धक्कादायक आहे," कार्लेकर सांगतात.
कार्लेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आगीचे फोटो टाकले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आग दिसत आहे.
या घटनेचा तपास पोलिसांनी 32 तासांनी सुरू केल्यामुळे कार्लेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत कुणाचा मृत्यू होत नाही तोपर्यंत या देशात अशा घटनांकडे लक्ष दिलं जात नाही अशी खंत कार्लेकरांनी व्यक्त केली आहे.
"या भागात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी या भागात दरोडा पडला होता. इतरही घटना घडल्या असतील, पण कुणी पोलिसांत तक्रार केली नसेल. लोकांनी समोर होऊन अशा घटनांविरोधात आवाज उठवला पाहिजे. जोपर्यंत आपण एक होऊन या विरोधात आवाज उठवत नाहीत तोपर्यंत काही होणार नाही," असं ते म्हणाले.
2016च्या युरोपियन युनियन जनमतानंतर लंडनमध्ये द्वेषमूलक घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये 80,393 घटनांची नोंद झाली आहे तर 2015-16मध्ये 62,518 घटनांची नोंद झाली होती. ही वाढ 29 टक्के आहे. 2011-12 पासून गृह खात्यातर्फे द्वेषमूलक घटनांची नोंद ठेवण्यात येते. तेव्हापासूनची ही सर्वाधिक मोठी वाढ असल्याचं म्हटलं जातं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)