लालबागचा राजा : मंडळ म्हणतं 'आम्हाला फरक पडत नाही'

    • Author, प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असणारं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 'लालबागचा राजा' मंडळाच्याच कार्यकर्त्यांमुळे वादात सापडला आहे. मंडळाचे कार्यकर्ते 24 तास गणेशभक्तांच्या सेवेसाठी झटत असतात, त्यामुळे कुणी कितीही वाईट बोललं तर आम्हाला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मंडळाने दिली आहे. तर बीबीसी मराठीच्या वाचकांनी मात्र मंडळावर टीका केली आहे.

मंगळवारी दर्शनाच्या रांगेवरून कार्यकर्त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना धक्काबुक्की केली तसंच पोलीस उपायुक्त अभिनेष कुमार यांच्याशीही वाद घातला.

गणेशोत्सवाच्या काळात 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी दररोज हजारो गणेशभक्त येतात. यातून वादवादची प्रसंग घडत असतात. मंगळवारच्या घटनेनंतर बीबीसी मराठीच्या होऊ द्या चर्चा या सदरात 'लालबागमध्ये धक्काबुक्की : गणेशोत्सवात भक्तांच्या गर्दीचं नियोजन कसं करावं,' असा प्रश्न विचारला होता. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया अशा आहेत.

करण मढावी यांनी इथली सुरक्षा व्यवस्था संपूर्णपणे मुंबई पोलिसांकडे देण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात, "मंडळाचे काही लोक रांग बघताना किंवा हाताळताना अक्षरशः शिव्या देतात आणि धक्का बुक्की करतात. हा कारभार सर्रास चालतो, लोक दुर्लक्ष करतात कारण त्यांना दर्शन घेऊन मोकळे व्हायचं असतं."

समीर पखाले लिहितात, "लालबागचा गणपती पावतो किंवा सिद्धिविनायक किंवा आणखी कोणता, हे सर्व मनाचे खेळ आहेत. घरात आईबापासारखे दैवत असून बाहेर जाऊन अंधश्रद्धेपोटी स्वतःला त्रास करणं हे खूप वाईट आहे."

तर कुठल्याही मंडळानं त्यांचा गणपती झाकून ठेवू नयेत. त्यामुळे ज्याला पाहिजे तोच दर्शनासाठी रांग लावेल. नाहीतर लोक दुरूनच दर्शन करून जातील, असा उपाय रेश्मा जाधव यांनी सुचवला आहे.

सत्यजीत महाबरे यांनी मीडियावर टीका केली आहे. ते लिहितात, "मीडिया पब्लिसिटी करतो आणि लोकही त्यामागे धावतात. मोठया सोहळयात व्यवस्थेवर ताण असतो त्यामुळे सर्वांनी लाईनमध्ये राहून दर्शन घेतले तर ही वेळ येणारच नाही. VIP दर्शनाचा अट्टाहास सोडला तर हा प्रश्न नक्किच मार्गी लागेल."

आम्हाला फरक पडत नाही

यावर मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला. ते म्हणाले, "मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांनी मंगळवारी झालेला वाद मिटवला आहे. कार्यकर्ते 24 तास गणेशभक्तांच्या सेवेसाठी झटत असतात. दर्शनासाठी आलेल्या सर्वांचाच आम्ही आदर करतो. त्यामुळे कोणी कितीही वाईट बोललं-लिहिलं तरी आम्हाला फरक पडत नाही."

दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बुधवारी 'लालबागचा राजा'ला भेट दिली. शिवकुमार यांनी व्हीआयपी व्यक्तींच्या दर्शनाच्या रांगेची पाहणी केली असून असे प्रकार घडू नयेत असे आदेशही दिले आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना डिगे म्हणाले, "गणेशोत्सव संपल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि दोषींवर कारवाई करू." धर्मादाय आयुक्तालयाचे चार निरीक्षक विसर्जनापर्यंत 'लालबागचा राजा' मंडपात उपस्थित राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

"गर्दीच्या नियोजनावरून मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या गैरसमजातून हा वाद झाला. पण पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून हा वाद सोडवलेला आहे. सध्या कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकणी सीसीटीव्ही फुटेज जमा केलं असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल," अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि उपायुक्त मंजुनाथ सिंग यांनी दिली आहे.

मग चूक कुणाची?

यंदा पोलिसांना झालेल्या धक्काबुक्कीवरून सोशल मीडियावर 'लालबागचा राजा' मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. पण, तरीही 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला होणारी गर्दी कमी झाली नसल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं.

"जिथं प्रमाणाबाहेर गर्दी होते तिथं प्रमाणाबाहेर तणावही निर्माण होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांवरील ताणाला सरसकट मुजोरी म्हणणं योग्य ठरणार नाही. तो माज आहे की ताण हे पडताळून पाहणंदेखिल गरजेचं आहे," असं मत लेखक क्षितिज पटवर्धन यांनी मांडलं.

"दुसरीकडे आपल्याला एकूणच शिस्तीचं वावडं आहे. गर्दीला तर शिस्त नसतेच. याचा आपण सर्वांनीही विचार करायला हवा. मनात भक्तीभाव असेल तर घरात बसून का नाही भक्ती केली जात? कारण लोकांना इव्हेंटला हजेरी लावायची असते. आणि हल्ली सणांचे इव्हेंट झाले आहेत. त्यामुळे तिथला ताण हाताळताना प्रत्येकाचे अहंकार आडवे येतात. याची जाणीव कार्यकर्ते आणि लोकांनाही व्हायला हवी," असंही क्षितिज पुढे म्हणाला.

प्रसारमाध्यमांनीही शाहनिशा करूनच रिपोर्टींग करावं. कारण टीआरपीसाठी केल्या जाणाऱ्या वृत्तांकनावर जर लोक आपली मतं तयार करत असतील तर ते चांगलं लक्षण नव्हे. माध्यमांनी जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे, असंही मत ते पुढे नोंदवतात.

राजाच्या दरबारातील वादाची परंपरा

२०१२ साली गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस उरले असताना मंडळाच्या कार्यकर्त्याचा महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाला. त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या महिला पोलीस हिराबाई पवार यांना संबंधित कार्यकर्त्याने थोबाडीत मारली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

२०१३ साली लहान मुलं आणि महिलांची डोकी धरून 'राजा'च्या पायावर आदळतानाचे व्हीडिओ प्रसिद्ध झाल्याने वाद झाला होता. यावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.

पोलिसांकडूनही पदाचा गैरवापर?

'लालबागचा राजा' मंडळासमोर पोलीस कर्मचारी त्यांच्या सहकार्‍यांना रांगेत घुसवत असल्याची घटना 2015ला घडली होती. हे दृश्य पूनम अपराज यांनी मोबाईवर चित्रीत केलं होतं. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी अपराज यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर अपराज यांना लालबागच्या पोलीस चौकीत नेऊन डांबून ठेवलं आणि त्यांच्याकडून १२०० रुपये दंड वसूल करून त्यांची सुटका केल्याचा आरोप अपराज यांनी केला होता.

राजाच्या दर्शनाला गर्दी का होते?

दोन महिने आधी होणारा पाद्यपूजन सोहळा, त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून होणारे मूर्तीचे मुखदर्शन, राजाच्या दानपेटीत केलं जाणारं दान, दर्शनासाठी तासंनतास रांगेत उभं राहावं लागणं, मुंबईच्या महत्त्वाच्या भागातून वाजतगाजत निघणारी मिरवणूक, दुसऱ्यादिवशी पहाटे सर्वांत शेवटी होणारं विसर्जन आणि राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव या सर्व गोष्टींमुळे लालबागचा राजा चांगलाच प्रसिद्धीला आला आहे.

सुरूवातीच्या काळात लालगबाच्या राजाचे देखावे आकर्षणाचं केंद्रबिंदू होता. परंतु गेल्या दशकभरात राजाची सिंहासनावर आरूढ झालेली भव्य मूर्ती हेच भाविकांसाठी मोठं आकर्षण झालं आहे. शिवाय नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्यामुळे अलीकडच्या काळात राजकारणी, खेळाडू, सामाजिक क्षेत्रातली मंडळी आणि खेळाडू राजाच्या चरणी नतमस्तक होत असल्यामुळे सामान्य भाविकही राजाच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत.

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बॅन्ड, लेझिम आणि ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केटमधून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही. पी. रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गानं गिरगाव चौपाटीवर पोहोचते. या वाटेवर अनेकजण राजाची पूजा करतात आणि सामान्य भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)