'फिश फूड गणेशा'बद्दल कधी ऐकलं आहे का?

    • Author, प्रशांत ननावरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'फिश फूड गणेशा'मुळे आता विसर्जनानंतर पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीच्या पोटातील 'व्हेज फूड' माशांच्या कामी येणार आहे.

सण-उत्सवांच्या काळात होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच दरवर्षी गणेशोत्सव जवळ आल्यानंतर पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींचा आग्रह धरला जातो.

'प्लास्टर ऑफ पॅरिस'पासून (पीओपी) तयार केलेली गणेशमूर्ती पर्यावरणास हानीकारक असल्यानं लोकांनीही शाडूच्या मातीच्या मूर्त्यांना पसंती देण्यास सुरूवात केली आहे.

पण शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचं विघटन झाल्यानंतरही अनेकदा त्यावरील कृत्रिम रंगाचा समुद्रातील जीवांना त्रास होतो.

या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मुंबईतल्या 'स्प्राऊट' या संस्थेनं पूर्णपणे पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार केली आहे. एवढंच नव्हे तर गणेशमूर्तीचं विघटन झाल्यानंतर ती माशांच्याही कामी येणार आहे.

मूर्ती लहान, किर्ती महान

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली तेव्हा गणेशमूर्ती एक फुटापेक्षा लहान असत. गेल्या शंभर वर्षांत मूर्तीच्या उंचीची स्पर्धा वाढली आहे. केवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळंच नव्हे तर घरगुती गणेशमूर्तींचीही उंची घराच्या छताला टेकताना दिसत आहे.

गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर तिच्या विघटनासाठी लागणारा वेळ आणि त्याच्या रंगाचा समुद्राच्या पर्यावरण होणारा परिणाम यासाठी लहान आकाराच्या मूर्ती वापरण्याचा आग्रह पर्यावरण प्रेमींकडून धरला जात आहे.

म्हणूनच 'फिश फूड गणेशा'ची उंची एक फुटापेक्षा कमी ठेवण्यात आली आहे, असं स्प्राऊट संस्थेचे संचालक आनंद पेंढारकर सांगतात.

गणपतीच्या पोटात माशांसाठी अन्न

"अनेकजण घरातल्या फिश टॅंकमधल्या माशांना पीठाचे गोळे करून खायला देतात. तीच संकल्पना वापरून आम्ही गणपतीच्या पोटात माशांसाठी पीठाचे गोळे ठेवतो. जेणेकरून मूर्तीच्या विसर्जनानंतर माशांना ते खाता येतील," असं आनंद सांगतात.

माशांच्या पोटात भरले जाणारे पीठाचे गोळे गव्हाचं पीठ, चण्याची डाळ आणि पालक पावडर यांच्या मिश्रणातून तयार केले जातात. त्याला शंकरपाळ्या किंवा चिप्सचा आकार देऊन ते आठ ते दहा दिवस उन्हात सुकवले जातात किंवा मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घेतले जातात.

"गणेशमूर्ती तयार करतानाच त्याच्या पृष्ठभागामध्ये पोकळी तयार केली जाते. त्या पोकळीत हे माशांसाठी खास तयार केलेलं अन्न भरून पोकळी बंद केली जाते. पीठ आणि वनस्पतींपासून हे अन्न तयार केलेलं असल्यानं लोकांच्या भावनाही दुखावल्या जात नाहीत," असंही आनंद पुढे सांगतात.

नैसर्गिक रंगाचा वापर

साच्याच्या साहाय्यानं शाडूच्या मातीची सुबक मूर्ती तयार केली जाते. त्यानंतर मूर्तीवर कोरीवकाम केलं जातं. सर्वप्रथम मूर्तीला पांढऱ्या रंगाचा थर देऊन तिला उन्हात सुकवल्यानंतर इतर रंगांनी सजवलं जातं.

"हळद, चंदन, मुलतानी माती आणि गेरू या चार गोष्टींचा आणि रंगांचा आपण आपल्या अंगावर वापर करतो. हेच रंग आम्ही गणेशमूर्ती रंगवण्याठी वापरतो. जेणेकरून विसर्जनानंतर हे रंग पाण्यात सहज विरघळतील आणि समुद्रातील माशांची अंडी आणि वनस्पतींवर त्यांचा थर तयार होणार नाही," आनंद सांगतात.

आपल्या मोठ्या पोटात गणपती सर्व दु:ख आणि वेदना सामावून घेत असतो, असं सांगितलं जातं. 'फिश फूड गणेशा'च्या माध्यमातून माशांसाठी आपल्या पोटात अन्न घेऊन जाणाऱ्या गणेशाची निर्मिती करण्यात आली आहे.

"या संकल्पनेमुळे पर्यावरणाची हानी रोखण्यास काही प्रमाणात हातभार लागेल. शिवाय विसर्जनानंतर 'फिश फूड गणेशा' माशांचाही खास मित्र होईल," असा विश्वास आनंद पेंढारकर यांना वाटतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)