You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गणेशोत्सवात निर्माल्याचं करायचं काय? यंदा टाकाऊ फुलं अशी वापरा
- Author, हेलेन ब्रिग्स
- Role, बीबीसी न्यूज
गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की हिरेजडित मखराची सजावट, ढोल ताशांचा गजर, मोदकांची मेजवानी आणि फुलं-दुरव्याचा हार. हे दहा दिवस देशभरात जल्लोष असतो. पाहाल तिकडे गणपतीचा मंडप, रस्त्या-रस्त्यावर मिरवणुकी आणि फुलांची उधळण.
बरं दहा दिवसांनंतर जेव्हा बाप्पांचं विसर्जन केलं जातं, तेव्हा मंडप काढला जातो, सजवलेला दरबारही मग रिकामा केला जातो आणि मोदक तर खालले जातातच. पण झेंडू, गुलाब आणि इतर विविध फुलांचे ढिगारे आपल्यापुढे उभे राहतात.
दहा दिवस देवाच्या चरणी भक्तिभावाने वाहिलेल्या त्या फुलांचं काय करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. त्याला आपण निर्माल्य म्हणतो.
वाहत्या पाण्यात ते सोडणं हा एक पर्याय असू शकतो, पण त्यामुळे जल प्रदूषणात वाढ होते. जाळून टाकण्यातही अर्थ नाही, उगाच प्रदूषण होईल.
मग करायचं काय?
परिमला शिवप्रसाद यांना वाटतं की त्यांच्याकडे यावर तोडगा आहे. 26 वर्षांच्या परिमला केमिकल इंजिनिअर आणि पर्यावरण उद्योजिका आहेत. त्या मूळच्या बंगळुरूच्या आहेत, पण सध्या जर्मनीतल्या बाथ विद्यापीठात संशोधन करत आहेत.
देवाला वाहिलेल्या फुलांचा नंतरही काही उपयोग व्हायला हवा, असं त्यांना वाटतं. आणि यातूनच एक समाजाभिमुख उद्योग उभारायचं त्यांचं स्वप्न आहे.
मंदिरांमध्ये वाहिलेल्या फुलांमधलं तेल किंवा अर्क काढता येईल का, यावर त्यांचं संशोधन सुरू आहे. त्यानंतर त्यांना या फुलांचं कंपोस्ट खत तयार करायचं आहे.
"मला मंदिरातली फुलं गोळा करावी वाटतात आणि त्याचा अर्क काढून नंतर बायोमास प्रोडक्ट तयार करावं वाटतं. या फुलांवर पुनर्प्रक्रिया कशी करावी याचा मी विचार करत आहे," असं परिमला सांगतात.
"त्यातून तयार झालेलं कंपोस्ट खत छोट्या घरांना वापरता येईल. कधीकधी मंदिरातच भाज्यांची बाग असते. कारण बऱ्याच मंदिरात अन्नछत्र देखील चालतं. तिथे या खताचा वापर करता येऊ शकतो."
धार्मिक कार्यक्रमानंतर भारतभरातल्या मंदिरांमध्ये दररोज अंदाजे 20 लाख टन निर्माल्य तयार होतं. या निर्माल्यापैकी बहुतांश निर्माल्यावर पनुर्प्रक्रिया केली जाऊ शकते.
परिमला सांगतात, "मी जेव्हा भारतात लहानाची मोठी होत होते तेव्हा खूप आजूबाजूला खूप सारी फुलं असायची. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते, तेव्हाच ठरवलं की फुलांवर पुनर्प्रक्रिया कशी करायची यावर अभ्यास करून मी व्यवसाय करेन."
"धार्मिक स्थळातील फुलांना इतर कचऱ्यासोबत एकत्र करणं अयोग्य आहे," त्या सांगतात.
ज्या ठिकाणी मंदिरं नदीच्या काठावर आहेत तिथं फुलं ही नदीत अर्पित केली जातात कारण ते पवित्र मानलं जातं. काही ठिकाणी ही फुलं जमिनीत भरण म्हणून घातली जातात. पण जर ती इतर कचऱ्याबरोबर एकत्र न करता खुल्या जागेत टाकली किंवा नदी, तलावात टाकली तर त्या परिसरातलं प्रदूषण वाढण्याचा धोका असतो.
कुजलेल्या फुलांमुळं शेवाळ तयार होतं आणि त्यामुळे पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळं सागरी जीवन धोक्यात येतं. कुजलेल्या फुलांमुळे जमिनीवरही प्रदूषणाची समस्या तयार होते.
पहिला टप्पा: प्रयोगशाळेत चाचणी
परिमला यांनी अशी उपकरणं तयार केली आहेत, ज्यांचा वापर करून मंदिरातल्या फुलांचा अर्क काढता येऊ शकतो. सुरुवातीला परिमला यांना प्रयोगशाळेत या उपकरणांचा वापर करावा लागेल.
"दररोज किमान आठ तास काम करून पाच किलो फुलांच्या पाकळ्यांचा अर्क काढता येऊ शकेल, याची तयारी करावी लागणार," असं परिमला सांगतात.
दुसरा टप्पाः प्रायोगिक तत्त्वावर कामाला सुरुवात
काही मंदिरात हे प्रयोग सुरू करण्याचा परिमला यांचा मानस आहे. सुरुवातीला बंगळुरूत काही मंदिरात त्यांनी तयार केलेलं उपकरण देण्यात येणार आहे. त्यांच्या केमिस्ट वडिलांच्या मदतीनं त्या हे काम करणार आहेत.
जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर त्या त्यांच्या प्रयोगाची व्याप्ती वाढवणार आहेत.
तिसरा टप्पा: स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं
हा समाजाभिमुख उपक्रम व्यावसायिक स्तरावर प्रत्यक्षात आणण्याची त्यांची मनीषा आहे.
"माझ्याजवळ केमिकल इंजिनिअरिंगची पदवी आहे. या पदवीचा वापर करून निर्माल्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी माझी इच्छा झाली."
"उद्योजिका होण्याचा विचार माझ्या मनात नव्हता. मला फक्त या विषयात PhD करायची इच्छा होती. विद्यापीठात संशोधन करणं आणि उद्योजिका होण्याकडे प्रवास करणं, या दोन्ही गोष्टींमुळे मला तितकाच आनंद मिळत आहे," अशी भावना परिमला यांनी व्यक्त केली.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)