You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोलंबियात कोकेनचं विक्रमी उत्पादन; ड्रग्सविरोधी मोहिमेला हरताळ
कोलंबियात कोकेन उत्पादनाने नवा उच्चांक गाठला आहे. संयुक्त राष्ट्रनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
कोकेनचं उत्पादन तब्बल 31 टक्क्यांनी वाढल्याचं UNODC अर्थात 'द युएन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम'ने जाहीर केलं. 1,400 टनवरून कोकेनचं उत्पादन 1,71,000 एवढं झालं आहे.
कोकेन उत्पादनात एवढी घाऊक वाढ झाल्यानं नव्यानं सुरू झालेल्या शांतता प्रक्रियेला खीळ बसू शकते असा इशाराही देण्यात आला आहे.
जगातलं सर्वाधिक कोकेनचं उत्पादन कोलंबियात होतं. अमेरिका जगातला कोकेनचा सर्वाधिक मोठा ग्राहक देश आहे.
कोकेनसंदर्भातली ही आकडेवारी चिंता वाढवणारी असल्याचं कोलंबियाचे न्याय मंत्री ग्लोरिआ मारिआ बोरेरो रेस्ट्रोपो यांनी सांगितलं.
नक्की किती उत्पादन होतं?
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, कोलंबियातलं वाढलेलं कोका उत्पादनाच्या नोंदणीकृत पातळीवरची सगळ्यांत मोठी वाढ आहे. तब्बल 25,000 हेक्टर एवढ्या प्रचंड जागेवर हे उत्पादन वाढलं. 2016च्या तुलनेत 2017मध्ये कोकेन उत्पादन 17 टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे.
स्थानिक बाजारात या वाढीव उत्पादनाची किंमत 2.7 बिलिअन डॉलर्स एवढी आहे.
पॅसिफिक महासागराशी जवळीक असणाऱ्या भागात कोकेनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.
इक्वेडोर या देशाजवळच्या नरिनो या राज्यात कोकेनच्या उत्पादनाखालील क्षेत्राचा आकार पेरू देशाएवढा आहे. विशेष म्हणजे पेरूतही मोठ्या प्रमाणावर कोकेन उत्पादन घेतलं जातं.
गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक कोकेन उत्पादन नरिनो प्रांतातच घेतलं गेलं आहे. देशातल्या एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 33 टक्के कोकाच पिकवला जातो.
कोकेनचा प्रश्न
ड्रग्सविरुद्धची लढाई सुरू असतानाच कोकेनचं विक्रमी उत्पादन कोलंबियासाठी अडचणीचं ठरतं आहे. ड्रग्सविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेतर्फे कोलंबियाला 400 मिलिअन डॉलर्स देण्यात येतात.
कोकेनऐवजी अन्य पीक घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय कोलंबिया सरकारनं घेतला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेशी 300 मिलिअन डॉलर्सचा करार देखील केला.
ड्रग्सचा प्रश्न हाताळण्यासाठी लवकरच नवा कायदा पारित करण्यात येईल असं नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक्यू यांनी स्पष्ट केलं. पुढच्या चार वर्षांत ड्रग्स निर्मूलन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं इव्हान म्हणाले.
ड्रोनच्या माध्यमातून कोको पिकांवर विषारी वायू फवारण्याच्या निर्णयावर मात्र टीका करण्यात आली आहे.
हा विषारी वायू कॅन्सरला निमंत्रण देतो, अशा जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर 2015 मध्ये कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्युआन मॅन्युअल सँटोस यांनी ग्लायफोस्फेट या वायूद्वारे कोकेन पिकांवर फवारणी करण्यावर बंदी घातली होती.
पाच दशकांहून अधिक काळ झालेला सशस्त्र संघर्ष 2016 मध्ये झालेल्या शांतता करारानंतर थंडावला. द फार्क या संघटनेनं बंडखोरी केली होती. मात्र या करारानंतरही कोकेन उत्पादनाचं प्रमाण वाढतच आहे.
शांततेवर अति भर दिल्यामुळे कोकेन उत्पादन वाढत असल्याची टीका काहींनी केली आहे. फार्क बंडखोरांचं कोकेन व्यापारावर वर्चस्व होतं. ते संपुष्टात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)