कुठे टिप देणं अपमान आहे कुठे बंदी, तर इथं टिप नाकारून स्वीकारतात...

काही ठिकाणी टिप दिली तर आपण अडचणीत येऊ, तर काही ठिकाणी नाही दिली तर वेगळ्याच नजरेनं पाहिलं जाईल.

जितकं ब्रिटिश लोक टिप ठेवणं गंभीरपणे घेतात तितकं ही गोष्ट जगात कुणी गंभीरपणे घेत असेल का याबद्दल शंकाच आहे. असं म्हटलं जातं की 'टिप'चा शोध हा ब्रिटिशांनीच 17व्या शतकात लावला आहे.

उमराव लोक त्यांच्यापेक्षा 'छोट्या लोकांना' छोट्या-मोठ्या भेटवस्तू देत असत त्याचंच हे रूप आहे. टिप देणं हे युकेमध्ये रुजलं आहे आणि इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलं आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का?

काही देशात टिप देणं हे त्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिल्यासारखं समजलं जातं.

चला तर जाणून घेऊया.... कोणत्या देशात काय आहेत टिपबद्दलचे नियम?

तुम्हाला वाटेल की युनायटेड किंगडमच्या राजकारण्यांना ब्रेक्झिट व्यतिरिक्त काही बोलण्यासाठी फुरसतच नाही.

पण सध्या युकेमधले दोन्ही मुख्य पक्ष एका वादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत.

युकेच्या बार आणि रेस्तराँमध्ये टिप ठेवण्यावर बंदी यावी यावर चर्चा होत आहे.

अमेरिका

अमेरिकेत असं गमतीनं म्हटलं जातं की केवळ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया ही टिप देण्यापेक्षा किचकट आहे. इथं टिप देण्याची संस्कृती 19व्या शतकात आली.

जेव्हा अमेरिकन लोक युरोपमध्ये फिरायला जाऊ लागले तेव्हा त्यांनी टिप देतात हे पाहिलं. हा प्रकार लोकशाहीविरोधी समजला जात असे. टिप देणाऱ्यांच्या दानावर जगणारा एक वर्ग निर्माण केला जात आहे, अशी टीका टिप देणाऱ्यांवर होत असे.

आता आपण 21व्या शतकाबद्दल विचार करू. टिप द्यावी की देऊ नये याबद्दल अजून अमेरिकन लोक वाद घालताना दिसतात. पण टिप देणं आता अमेरिकन लोकांच्या मानसिकतेचा एक भाग झाल्याचं म्हटलं जातं. अर्थतज्ज्ञ ऑफर अझार म्हणतात, "2007मध्ये रेस्तराँ व्यवसायात सेवा देणाऱ्या लोकांना 42 अब्ज डॉलर देण्यात आले असावेत. टिप म्हणजे मिळणाऱ्या पगाराला पूरक गोष्ट आहे असं मानलं जातं."

चीन

इतर आशियाई देशांप्रमाणे चीनमध्ये टिप दिली जात नसे. अनेक दशकं तर टिपवर बंदी होती आणि ती लाच देण्याप्रमाणे मानली जात असे. अजूनही टिपचं प्रमाण वाढलेलं दिसत नाही. ज्या ठिकाणी स्थानिक लोक जातात त्या रेस्तराँमध्ये टिप दिली जात नाही.

पण जिथं विदेशी पर्यटक येतात अशा हॉटेलमध्ये टिप दिली जाते. विदेशी पर्यटक जेव्हा हॉटेलमध्ये येतात तेव्हा जे लोक सामान उचलतात त्यांना टिप देणं हे सर्रास आढळतं. टूर गाईडला आणि टूर बस ड्रायव्हरला टिप देण्यात काही गैर मानलं जात नाही.

जपान

जपानमध्ये शिष्टाचाराचे नियम खूप गुंतागुंतीचे आहेत. काही खास निमित्त असेल तर टिप दिली जाते. जसं की लग्नं, अंत्यसंस्कार. काही खास कार्यक्रमाच्या वेळी टिप देणं ठीक आहे, पण हॉटेलमध्ये टिप दिल्यास स्वीकारणाऱ्याला ते अपमान झाल्याप्रमाणे वाटतं. कारण त्यामागे तत्त्वज्ञान असं आहे की मुळात सर्व्हिस चांगली देणं हे आद्यकर्तव्यच आहे.

ज्या ठिकाणी टिप देणं अपेक्षित आहे, तिथं पैसे एका पाकिटात घालून दिले जातात. पैसे पाकिटात घालून देणं हे कृतज्ञतेचं आणि आदराचं प्रतीक मानलं जातं. समोरच्या व्यक्तीला न दुखावता टिप कशी नाकारावी याचं प्रशिक्षण हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिली जातं.

फ्रान्स

1955मध्ये फ्रान्समध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला. बिलातच सेवा शुल्क टाकण्यात यावं असं ठरवण्यात आलं. यामुळे वेटरच्या पगारामध्ये वाढ झाली. पर्यायानं ते टिपवर अवलंबून राहणार नाहीत असा विचार त्यामागे होता.

तरी सुद्धा टिपची प्रथा ही चालूच राहिली. नव्या पिढीचा कल टिप न देण्याकडे आहे असं म्हटलं जातं. 2014मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार 15 टक्के ग्राहक असं म्हणाले की आम्ही कधीच टिप देणार नाही. आधीच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिका सांस्कृतिकदृष्ट्या इंद्रधनुष्याप्रमाणे समजला जातो. इथं काही सेवा अशा दिल्या जातात ज्या इतर देशात दिल्या जात नाहीत. जसं की कारचं रक्षण करणं. दक्षिण आफ्रिकेत बेरोजगारीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या एकूण टक्केवारीतील अंदाजे 25 टक्के तरुण हा व्यवसाय करताना दिसतात. तसेच काही तरुण पार्किंग शोधण्यासाठी देखील वाहन मालकांना मदत करताना दिसतात. आकडेवारी असं सांगते की गेल्या वर्षी, दिवसाला 140 गाड्या चोरीला गेल्या होत्या.

या सेवेसाठी 1 डॉलरहून कमी रक्कम दिली जाते. त्यात काही कुणाला वावगं वाटत नाही. पण मुख्य प्रश्न वेगळाच आहे. ही प्रक्रिया अनियंत्रित आहे आणि एखाद्या व्यक्तीनं जर करार मोडला तर त्यावर काय कारवाई होईल याचे नियम या ठिकाणी नाहीत.

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडमध्ये बिलाचं राउंड अप केलं जातं आणि हॉटेल स्टाफ किंवा हेअर ड्रेसर्सला टिप दिली जाते. पण स्वित्झर्लंड असा देश आहे की जिथं वेटरलाही भरपूर पगार आहे. तिथं वेटरला महिन्याला 4,000 डॉलर मिळतात. म्हणजे अंदाजे 2,95,000 रुपये. अमेरिकेतल्या वेटर लोकांना टिपवर अवलंबून राहावं लागतं. तसं इथं नाही.

भारत

भारतात बिलवरच सेवा कर आकारला जातो. टिप दिली नाही तर फारसं काही वाइट समजलं जात नाही. पण काही ठिकाणी टिप दिली जाते. 2015च्या सर्व्हेमध्ये असं आढळलं जातं की टिप देण्यात भारतीय लोक इतर आशियाई लोकांच्या पुढं आहेत. भारतीयांपेक्षा बांगलादेश आणि थायलंडमधले लोक जास्त टिप देतात.

सिंगापूर

मोठ्या हॉटेलमध्ये टिप दिल्यावर कुणाला राग येणार नाही. पण जर कॅब ड्रायव्हर किंवा रेस्तराँमध्ये जर तुम्ही टिप दिली तर तुमच्याकडे रागानं पाहिलं जाईल. कारण सरकारनं त्यांच्या वेबसाइटवर स्पष्ट लिहिलं आहे की टिप देणं किंवा स्वीकारणं हा जीवनाचा मार्ग नाही.

इजिप्त

टिप देणं हा इजिप्तच्या संस्कृतीचा भाग आहे. इथं त्याला बक्षीस म्हटलं जातं. श्रीमंत इजिप्शियन नियमितपणे सेवा क्षेत्रातील लोकांना टिप देताना दिसतात. अशा प्रकारच्या टिप देणं हे स्वागतार्ह समजलं जातं कारण देशात 10 टक्के लोक बेरोजगार आहेत आणि असंघटित क्षेत्राचा GDPमध्ये 40 टक्के वाटा आहे.

इराण

इराणमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. त्याला तारुफ असं म्हणतात. जर तुम्ही कॅब ड्रायव्हरला वरचे पैसे दिले तर ते तो नाकारतो. मग तुम्ही आग्रह केल्यावरच तो स्वीकारतो. त्यामुळे जर एखादा कॅब ड्रायव्हर पैसे नाकारत असेल तर असं समजावे की त्याला ते हवे आहेत, पण तिथल्या संस्कृतीचा हा भाग असल्यामुळे तो तसं वागत आहे. जर टिप असेल तर ती नाकारली जात नाही. सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना टिप नियमितपणे दिली जाते.

रशिया

सोव्हिएत युनियन होतं त्या काळात टिप देण्यास नकार होता. टिप देणं म्हणजे कामगार वर्गाला अपमानित करणं असं मानलं जातं. पण टिपसाठी इथं एक खास शब्द आहे. त्याला chayeviye म्हणतात. याचा अर्थ आहे चहासाठी. टिप देण्याची पद्धत 2000 नंतर सुरू झाली. असं असलं तरी टिप देण्याची पद्धत ही जुन्या लोकांना अपमानास्पद वाटते.

अर्जेंटिना

चांगल्या जेवणानंतर अर्जेंटिनात टिप दिली तर आपण अडचणीत येणार नाही. पण 2004च्या कामगार कायद्यानुसार हॉटेल व्यवसायात असणाऱ्यांना टिप देणं हा गुन्हा समजला जातो. तरी सुद्धा इथं टिप सर्रास दिली जाते. वेटरच्या एकूण उत्पन्नाच्या 40 टक्के उत्पन्न हे टिपमधून येतं.

असा आहे टिपच्या प्रथेची इतिहास आणि त्याचे निरनिराळे नियम.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)