व्हिक्टोरियन मुंबईच नव्हे, या जागाही आता युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत

मुंबईच्या काही ऐतिहासिक व्हिक्टोरियन गॉथिक कालीन स्थळांचा (Victorian Gothic and Art Deco Ensemble) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसा समितीने मनामामध्ये झालेल्या बैठकीत मुंबईव्यतिरिक्त तीन अन्य ऐतिहासिक वारसा स्थळांना या यादीत स्थान दिलं आहे.

मुंबईच्या फोर्ट, चर्चगेट आणि मरिन ड्राईव्ह परिसरातील अनेक ऐतिहासिक इमारती आता या मानाच्या यादीत आहेत. या यादीत स्थान मिळाल्याने आता या वास्तूंना आंतरराष्ट्रीय करारांअंतर्गत कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.

19व्या शतकात व्यापाराचं केंद्रस्थानी आलेल्या मुंबईत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात झाली, ज्यामध्ये व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या.

व्हिक्टोरियन इमारती या बाल्कनी आणि व्हरांडा यांसह केलेल्या शास्त्रीय बांधकामाचा उत्तम नमुना आहेत, तर आर्ट डेको इमारतींमध्ये चित्रपटगृह, रहिवासी फ्लॅट्स आणि हॉस्पिटल आहेत.

"इमारतींचे हे दोन प्रकार 19व्या आणि 20व्या शतकात मुंबईत जे काही आधुनिकीकरण झालं, त्याची आठवण करून देतात," असं युनिस्कोचं म्हणणं आहे.

जगभरातून अशा आणखी सहा जागांची या यादीसाठी निवड करण्यात आली आहे - सौदीमधले ओएसिस, ओमानमधलं एक प्राचीन काळातलं बंदर आणि दक्षिण कोरियातल्या पर्वतांवरील मठ.

ओमानचं प्राचीन बंदर

ओमानच्या पूर्वेस कल्हात हे शहर 11व्या आणि 15व्या शतकात एक व्यापाराने गजबजलेलं बंदर होतं.

"हे बंदर म्हणजे पू्र्व अरब आणि बाकी जगामधला वास्तूकलेचा एक ऐतिहासिक दुवा आहे," असं युनिस्कोचं म्हणणं आहे.

छुपी ख्रिश्चन स्थळं : नागासाकी, जपान

10 गावं, एक किल्ला आणि एक चर्च यांचा समूह आहे क्यूशू बेटावर. हे 18व्या आणि 19व्या शतकादरम्यान बांधण्यात आले होते, जेव्हा जपानमध्ये ख्रिश्चन धर्मावर बंदी होती.

युनिस्कोच्या मते, "क्यूशू आयलंड हे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या जपानमधील सर्वांत आधीच्या हालचालींचं प्रतीक आहे आणि छुप्या ख्रिश्चनांनी आपल्या सांस्कृतिक परंपरेचं कसं जतन केलं आहे, हे दर्शवतं."

वाळवंटातील सांस्कृतिक बेट : अल-हासा, सौदी अरेबिया

पूर्व अरेबियन द्वीपकल्पांत असलेलं अल-हासा हा जगातील सर्वांत मोठा असा वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश आहे. निओलिथिक काळापासून आजपर्यंत इथे अनेक लाोकांची घरं आहेत.

या परिसरात 25 लाख ताडाची झाडं, बागा, कालवे, विहिरी, ऐतिहासिक इमारती आणि पुरातन काळातील वास्तू आहेत.

"अल-हासा म्हणजे मानवाचं निसर्गाशी असलेल्या संवादाचं एक विलक्षण उदाहरण आहे," असं युनेस्कोनं म्हटलं आहे.

पर्वतरांगातील मठ : दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियातल्या सान्सा पर्वतारांगांवरील मठ 7व्या शतकापासून श्रद्धेचं केंद्र राहिलं आहे. इथे सात मंदिरं असून त्यांसमोर भव्य प्रांगण, व्याख्यानासाठींचं सभागृह आणि सुशोभित असं बुद्धांचं सभागृहही आहे.

"नियमितपणे होणाऱ्या धार्मिक विधींमुळे लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलेलं हे पवित्र ठिकाण आहे," असं युनिस्कोनं म्हटलं आहे.

ससानिड : ईराणमधील फार्स प्रांत

फार्स प्रांतामध्ये 8 ऐतिहासिक ठिकाणी राजमहाल, शहरी व्यवस्था आणि तटबंदीचं बांधकामं आहेत. तिसऱ्या ते पाचव्या शतकातील सॅसानियन साम्राज्याच्या काळातील या वास्तू आहेत.

युनिस्कोच्या मते, "नैसर्गिक भूरचनेचा उत्कृष्ट वापर कसा करायचा, हे या प्रांताकडून शिकायला हवं. एवढंच नव्हे तर रोमन कला आणि अॅकेमेनिड आणि पार्थियन सांस्कृतींचा संगम इथे होतो."

केनियातील ड्राय वॉल

थिमिच ओहिंगा ही जगातली सर्वांत मोठी, व्यवस्थितपणे जपणूक केलेली कोरड्या दगडांची भिंत आहे. ती केनियाच्या लेक व्हिक्टोरिया प्रांतात आहे.

मिगोरी गावाजवळ असलेली ही भिंत 16व्या शतकात बांधण्यात आली असावी, असं अदाज आहे. तसंच या भिंती आत पशुधन आणि लोकसमूहांसाठी एक कवच म्हणून काम करत असतील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे."

"लेक व्हिक्टोरिया खोऱ्यातल्या पहिल्या ग्रामीण समुदायाच्या परंपरेचं अपवादात्मक उदाहरण म्हणजे हा प्रांत आहे, असं युनिस्कोनं म्हटलं आहे."

सर्व फोटो युनेस्कोच्या सौजन्याने.