You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल्काट्रॅझ तुरुंग : पलायन नाट्याचा थरार उलगडतो तेव्हा...
हे आहे अमेरिकेतलं एक महाभयंकर तुरुंग. कैद्यांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या या ठिकाणाचं नाव आहे - अल्काट्रॅझ.
सॅन फ्रान्सिस्को किनाऱ्यासमोरच्या खडकाळ बेटावर हे तुरुंग एखाद्या बुरुजाप्रमाणे उभं आहे.
1930 ते 1960 या कालावधीत अमेरिकेतल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींची रवानगी अल्काट्रॅझमध्ये होत असे.
क्रुर आरोपींनाही दरदरून घाम फुटेल, त्यांच्या मनात गुन्ह्याविषयी जरब निर्माण होईल असा हा तुरुंग.
या तुरुंगात रवानगी म्हणजे थेट निरोपाचा रस्ता असं समीकरण पक्कं होतं.
या तुरुंगाच्या संरक्षक भिंती अभेद्य अशा. तुरुंगाच्या बाहेर अथांग पाणी. इथून सुटका नाहीच अशी स्थिती.
अमेरिकेच्या इतिहासातल्या अनेक कुख्यात गुन्हेगारांची या तुरुंगानं दाणादाण उडवून दिली आहे.
एकेकाळी गुन्हेगारांसाठी नरकयातना ठरलेलं हे तुरुंग आता जगभरातल्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे.
चिंचोळ्या अंधाऱ्या बरॅक्समधलं वातावरण कसं असेल हे जाणून घेण्यासाठी आता जगभरातले पर्यटक अल्काट्रॅझमध्ये गर्दी करतात.
पण या अंधारकोठडीतून सुटकेचा मार्ग गुन्हेगारांनी शोधून काढला होता का? अमेरिकेच्या इतिहासात या तुरुंगासंदर्भातल्या अनेक दंतकथा नोंदल्या गेल्या आहेत. गुन्हेगाराच्या मनाचा ताबा घेणाऱ्या या तुरुंगातून सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रयत्न इतिहासात एकदा झाला होता.
या तुरुंगातून सुटका करून घेणाऱ्या त्रिकुटापैकी एकानं लिहिलेलं गूढ पत्र समोर आलं आहे. 1962 मध्ये या त्रिकुटानं अल्काट्रॅझच्या अवघड गडावरून पलायन केलं होतं.
जॉन अँगलिन असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं या पलायनासंदर्भात सॅनफ्रान्सिस्को पोलिसांना 2013 मध्ये लिहिलं होतं. पण हे पत्र पाच वर्षांनंतर आता जगासमोर आलं आहे.
"माझं नाव जॉन अँगलिन. 1962 मध्ये अल्काट्रॅझ तुरुंगातून पळून जाण्यात मी यशस्वी ठरलो. त्या रात्री आम्ही पलायन केलं. पण सुटका करून घेण्याचा आनंद क्षणभंगुर ठरला," असं पत्रात म्हटलं आहे.
त्या रात्रीपासून ते तिघेजण जगातल्या सगळ्यांत मोस्ट वाँटेड यादीत अग्रणी आहेत. छायाचित्रानुसार ते तिघं साधारण असे दिसतात.
पत्रात काय?
जॉन आणि क्लेरन्स अँगलिन या बंधुंसह फ्रँक मॉरिस यांनीही अल्काट्रॅझमधून पलायन केल्यानंतर एका वृद्धाश्रमात उरलेलं जीवन व्यतीत केलं. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी या त्रिकुटानं पलायन केलं होतं.
क्लेरन्स अँगलिन यांनी 2008 मध्ये तर मॉरिस यांनी 2005 मध्ये जगाचा निरोप घेतला असं जॉन यांनी लिहिलं आहे.
लेखकानं यासंदर्भात प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. "एका वर्षभरासाठी मी तुरुंगात जाईन आणि तिथं मला वैद्यकीय उपचार मिळतील असं तुम्ही टीव्हीवर जाहीर केलं तर मी माझा ठावठिकाणा तुम्हाला सांगेन," असा दावा पत्रलेखकानं केला आहे.
"मी 83 वर्षांचा आहे. मला कर्करोग आहे. माझी अवस्था बिकट आहे,"
पत्रात लिहिल्याप्रमाणे जॉन अँगलिन यांनी पलायन केल्यानंतर उर्वरित आयुष्य सिऍटलमध्ये व्यतीत केलं. उत्तर डाकोटामध्ये ते आठ वर्षं होते.
पत्र पाठवलं तेव्हा लेखकाचं वास्तव्य कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडच्या भागात होतं.
पत्राची सत्यासत्यता काय?
सॅनफ्रान्सिस्को पोलिसांनी पत्र मिळाल्यानंतरही 5 वर्ष त्याविषयी वाच्यता केली नाही असं सीबीएसनं स्पष्ट केलं आहे.
एका निनावी माणसानं हे पत्र सॅन फ्रान्सिस्कोमधलं टेलीव्हिजन चॅनेल KPIXला दिल्याचं उघड झालं आहे.
1978पासून या खटल्याची जबाबदारी 'द यूएस मार्शल्स सर्व्हिस' यांच्याकडे आहे. त्यांनी हे पत्र हस्ताक्षराच्या परीक्षणासाठी FBI प्रयोगशाळेकडे दिलं.
जॉन अँगलिंग, क्लेरन्स अँगलिंग आणि फ्रँक मॉरिस या तिघांच्या हस्ताक्षराचं परीक्षण या निनावी पत्राशी करण्यात आलं.
मात्र परीक्षणाचा निष्कर्ष कोणत्याही निर्णयाप्रत येण्यासाठी पुरेसा नाही असं 'यूएस मार्शल्स सर्व्हिस'नं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.
नातेवाईकांचं काय म्हणणं?
जॉन आणि क्लेरन्स अँगलिन यांच्या पुतण्यांनी सीबीएसला यासंदर्भात अतिरिक्त माहिती दिली.
जॉन आणि क्लेरन्स यांची सही असलेला गुलाबांचा गुच्छ पलायनानंतर अनेक वर्ष त्यांच्या आजीला मिळत असे अशी माहिती या पुतण्यानं दिली.
ते पत्र जॉन यांचं होतं की नाही याविषयी मी खात्रीनं काहीच सांगू शकत नाही, असं पुतण्या डेव्हिड विंडनर यांनी सांगितलं.
कर्करोग झाला आहे आणि प्रकृती बिघडली आहे अशी त्यांची अवस्था असेल तर त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क करायला हवा होता.
ते जिवंत आहेत याची कल्पना त्यांनी द्यायला हवी होती. ठावठिकाणी सांगायला हवा होता असं विंडनर यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी पलायन केलं कसं?
बँक लुटल्याप्रकरणी या तिघांना गजाआड करण्यात आलं होतं. क्रुर स्वरुपाच्या गुन्ह्यांप्रकरणी दोषी आढळलेल्या कैदींना अल्काट्रॅझमध्ये पाठवण्यात येत असे.
या त्रिकुटानं धारदार चमच्यांसारख्या उपकरणाच्या आधारे बाहेर जाण्यासाठी जमिनीखाली बोगदा तयार केला. त्यांनी रेनकोटचा वापर करून फुगवता येणारा तराफा तयार केला. रात्रीच्या वेळी या तराफ्याच्या आधारे ते पाण्यात बाहेर पडले आणि त्यानंतर पुन्हा कधीही कोणालाही दिसले नाहीत.
जॉन अँगलिन ज्या खोलीतून बोगदा खणून बाहेर पडले ती खोली पाहण्यासाठी दररोज गर्दी होते.
या त्रिकुटाच्या पलायनाचा प्रशासनावर गंभीर परिणाम झाला. खडकाळ बेटावर एकाकी वसलेलं हे तुरुंग त्रिकुटाच्या पलायनानंतर अवघ्या वर्षभरात बंद करण्यात आलं.
अल्काट्रॅझ तुरुंगाबाहेर पडून उपसागराच्या थंडगार पाण्यातून पोहून किनारा गाठणं कोणालाही अशक्य असल्याचं प्रशासनातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. मात्र आता अमेरिकेचे क्रीडापटू हा टप्पा पोहून पार करतात.
अमेरिकेच्या इतिहासातला पलायनाचा हा थरारक घटनाक्रम 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लिंट इस्टवूड यांच्या एस्केप फ्रॉम अल्काट्रॅझ या चित्रपटात अनुभवायला मिळाला होता.
हे वाचलंत का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)