You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पहिला प्रजासत्ताक दिन : 'आम्ही स्वतंत्र झालो, तुम्ही स्वतंत्र झालात आणि आपले इमानी कुत्रेही मुक्त झाले'
- Author, आर व्ही स्मिथ
- Role, बीबीसी हिंदीसाठी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारताच्या पहिल्यावहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत. 68 वर्षांपूर्वी दिल्लीतल्या पुराना किल्ल्यासमोरच्या जुन्या ब्रिटिश स्टेडियममध्ये प्रजासत्ताक सोहळा पार पडला होता.
प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते तिरंगा फडकला आणि तोफांच्या आवाजानं पुराना किल्ल्याचा कोपरान् कोपरा निनादून गेला.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या बरोबरीनं सी. राजगोपालाचारीही होते. गर्व्हनर जनरल म्हणून त्यांनी शेवटचे ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडून सूत्रं स्वीकारली होती.
प्रजासत्ताकचा अर्थ म्हणजे भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याची अधिकृत अखेर. जागतिक स्तरावर स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून भारताची आता औपचारिकपणे नोंद होऊ शकणार होती.
किंग जॉर्ज पाचवे यांनी स्वतंत्र भारताचं अभिनंदन करताना शुभेच्छा पाठवल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारत 'राष्ट्रकुल'चाच भाग राहणार होता.
पहिल्या प्रजासत्ताकानंतर काही दिवसांतच किंग जॉर्ज पाचवे यांचं निधन झालं. दुखवटा म्हणून एका दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली.
स्वातंत्र्यासाठी अविरत झटणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे 'चलो दिल्ली' घोषणेसह पुन्हा अवतरतील अशा अफवांना उधाण आलं होतं. भारताची पारतंत्र्यातून सुटका झाली या गोष्टीनं पंचत्वात विलीन झालेले बहादूर शाह जफर सुखावले असतील, असं वक्तव्य मुघल साम्राज्यातील शेवटच्या वारसदार बेगम तैमूर जहान यांनी केलं.
पण दोन वर्षांपूर्वी हत्या झालेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीची उणीव प्रकर्षाने जाणवली.
आता ज्या दिमाखात आणि भव्य स्तरावर प्रजासत्ताकदिनी परेड होते तेवढी भव्यता 1950 मध्ये नव्हती. पण तो सोहळाही संस्मरणीय होता. हवाईदल, नौदल आणि भूदलाचे काही सैनिक या प्रजासत्ताकदिनात सहभागी झाले होते. पण राज्यांच्या चित्ररथाची पद्धत त्यावेळी नव्हती. ही परेड जुन्या ब्रिटिश स्टेडियमपुरती मर्यादित होती. वर्षभरानंतर परेड विस्तारली.
जेट आणि थंडरबोल्ट्स विमानं परेडमध्ये आकाशात झेपावली नव्हती. डाकोटास आणि स्पिटफायर्स सारखी विमानं त्यावेळी पाहायला मिळाली होती. फिल्ड मार्शल करिअप्पा सर्व सेनादलांचे प्रमुख होते. ब्रिटिश-भारतीय एकत्रित लष्करात कार्यरत असतानाही त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली होती.
मूळच्या दक्षिण भारतातल्या कूर्गचे असलेल्या करिअप्पा यांनी लष्करी परिभाषेतल्या हिंदीत संवाद साधला. 'आम्ही स्वतंत्र झालो, तुम्ही स्वतंत्र झालात आणि आपले इमानी कुत्रेही मुक्त झाले', असं करिअप्पा म्हणाले होते. करिअप्पांच्या उद्गारांनी धमाल उडवून दिली होती. इंग्रजी भाषा न कळणाऱ्या जवानांसमोर बोलताना करिअप्पा यांनी हे उद्गार काढले होते हे समजून घेणं आवश्यक आहे.
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी तरुण असलेल्या प्राध्यापक खालिक अंजीम यांनी आठवणींना उजाळा दिला. राणी व्हिक्टोरिया यांचं 1901 मध्ये निधन झालं. त्यावेळी हाजी झाहोरुद्दीन शाळेत होते. आता जामा मशीद परिसरातील एका हॉटेलचे मालक असलेल्या हाजी यांनी पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी हाजी कलान यांच्या दुकानातून आणलेल्या मिठाईची आठवण सांगितली.
18व्या शतकाच्या सुरुवातीला मिठाई विक्रीची सुरुवात करणाऱ्या 'घांटेवाला हलवाई' या राजधानीतल्या गजबजलेल्या चांदणी चौकातील दुकानाकडून सर्वांना मोफत मिठाईचं वाटप करण्यात आलं होतं. दोनच वर्षांपूर्वी या दुकानाची गजबज कायमची थंडावली.
पहिल्या प्रजासत्ताक दिनी चांदणी चौक फुलांचे हार आणि रोषणाईने नटला होता. लाल मंदिरापासून फत्तेपुरी मशिदीपर्यंत नागरिक उत्साहात वावरत होते. फुलमंडीत फुलविक्रेत्यांनी सगळ्यांवर गुलाबपुष्पाची पखरण केली. सगळेजण एकमेकांचं अभिनंदन करत होते. तिरंगा लपेटून, फुलं-हार लेवून घोषणा देत माणसं जल्लोष साजरा करत होते.
पारतंत्र्याच्या जोखडातून आपली कायमची मुक्तता झाली याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. गुरुद्वारा शिशगंज इथं लंगरचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगला साहिब आणि रकीबगंज इथल्या गुरुद्वारात शेकडो नागरिक पुरी-भाजी आणि हलवा घेण्यासाठी रांगेत उभे होते. राजधानीचा मानबिंदू असणाऱ्या कनॉट प्लेसमध्ये विहंगम रोषणाई करण्यात आली होती.
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष करणाऱ्यांमध्ये डॉक्टर रामलाल यांचा समावेश होता. लाल किल्ल्यात कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश सैनिकांवर डॉ. रामलाल उपचार करत असत. प्रचंड वजनाचे बूट परिधान करून काम करणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या पायाला जखमा होत असत. डॉ. रामलाल शनिवार-रविवारी हे काम करत असत. भारत प्रजासत्ताक झाल्यामुळे रामलाल यांना प्रचंड आनंद झाला होता.
अनेक वर्षांनंतरही रामलाल त्या आठवणींमध्ये दंग होऊन जात असत. एकदा उपचारानंतर एका सैनिकानं त्यांना शंभर रुपये दिले. पैसे देऊन तो सैनिक जाऊ लागला. फी घेऊन उरलेले पैसे परत देण्यासाठी डॉ. रामलाल त्या सैनिकाच्या मागे जाऊ लागले. डॉक्टरांना आणखी पैसे हवेत असा त्या सैनिकाचा गैरसमज झाला आणि त्याने रामलाल यांच्या दिशेनं बंदूक उगारली. अशा आठवणींचा खजिना डॉ. रामलाल यांच्याकडे आहे. त्यावेळचे शंभर रुपये म्हणजे आताच्या हजार रुपयांप्रमाणे आहेत.
चांदणी चौकात नाचणारी तरूण मुलं म्हणजे लाठ्या हातात धरणारे बनका होते. त्यांच्या तिरक्या टोप्या आणि लांब मिशांमुळे त्यांना दिल्लीचे 'डुलासिमो मॅकरोनी' म्हणत.
फत्तेपूर सिक्रीतल्या मुस्लिम खाद्य़विक्रेत्यांनी एकापेक्षा एक खाद्यपदार्थांची रेलचेल मांडली. करीम, जवाहर आणि मटिया महल या हॉटेलांनी परिसरातल्या गरीब जनतेला जेवणाचं मोफत वाटप केलं. कबाब आणि दूधविक्रेत्यांनी ग्राहकांना सवलत दिली. पहिल्या प्रजासत्ताकदिनी संध्याकाळी सर्व सरकारी तसंच खाजगी इमारतींवर रोषणाई करण्यात आली. 'द व्हॉइसराय हाऊस'चं राष्ट्रपती भवनात रुपांतर झालं होतं आणि ही वास्तू एखाद्या नववधूप्रमाणे सजली होती.
'संसद भवन', 'नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक', 'सेंट्रल सेक्रेटरिएट', 'इंडिया गेट', 'ऑल इंडिया रेडिओ' ही राजधानी दिल्लीतली प्रमुख ठिकाणं रोषणाईनं झळाळून निघाली होती. बुलंद लाल किल्ला दिमाखात उभा होता. 'स्टँडर्ड, डेव्हिकॉस' आणि 'गेलॉर्ड' या प्रसिद्ध हॉटेलांमध्ये जल्लोष सुरू होता. लोक नाचत-गात होते. अँग्लो इंडियन क्लबमधल्या नृत्याची आठवण सांगणं आवश्यक आहे.
लॉ तीन बहिणी आणि सेंट जॉर्ज इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्यांची मुलगी खास आग्र्याहून दिल्लीला प्रजासत्ताक दिनाचा माहोल अनुभवण्यासाठी आल्या होत्या. या तीन लावण्यवती जल्लोषाचं मुख्य आकर्षण होतं. त्यांच्यामुळेच दिल्लीतल्या मुलींच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली असावी. खरंतर दिल्लीतल्या मुली सौंदर्याच्या बाबतीत कुठेही कमी नव्हत्या.
"Roses are red my dear, Violets are blue/Sugar is sweet my love and so are you" या गाण्यानं धमाल उडवून दिली होती. "She'll be coming down the mountain when she comes" हे गाणंही त्यावेळी चांगलंच गाजलं होतं.
स्कर्ट आणि हाय हिल्स अशा पेहरावात वावरणाऱ्या तरुणींनी दिल्लीतल्या मुलांवर मोहिनी घातली होती. पण सध्याच्या तरुणांचा आवडता पोशाख जीन्स मात्र त्यावेळी नव्हता.
मुलीवरून दोन मुलांमध्ये मारहाणही झाली होती. अशाच एका बाचाबाचीच्या प्रकरणात जिमी परेराने एक दातही गमावला. समोरच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला उद्देशून आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी जिमी अडचणीत सापडला होता. मात्र त्याने माफी मागितली आणि समेट घडून आला.
अँग्लो इंडियन असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष सर हेन्री गिडनी आणि उपाध्यक्ष फ्रँक अँथनी यांनी उपस्थितांना संबोधित करताना शुभेच्छा दिल्या होत्या. नव्या प्रजासत्ताकाप्रती आपण निष्ठा अर्पण करायला हवी असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. अँथनी यांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने शाळा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रपती भवनातल्या शाही मेजवानीची चर्चा अनेक दिवस रंगली होती. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, सरदार बलदेव सिंग तसंच कपूरथळाच्या राजकुमारी अमृत कौर यांचा समावेश होता. पश्चिम पंजाब आणि सिंध प्रांतातून भारतात स्थलांतरित झालेल्या तसंच इथून पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांसाठी त्यांनी मोलाचं कार्य केलं होतं.
काश्मीर गेटचे पंडित रामचंदर यांनी तत्कालीन आठवणींना उजाळा दिला. राणी व्हिक्टोरिया यांची सुवर्णजयंती आणि 1911 मध्ये भरलेला दरबार या ऐतिहासिक क्षणांच्या तुलनेत प्रजासत्ताकदिनी दिल्ली जास्त नटली होती.
1873 मध्ये जन्मलेल्या सर हेन्री गिडने यांनी त्यावेळी काढलेले उद्गार सूचक होते. गिडने यांनी ब्रिटिश मोहिमेचं प्रतिनिधित्व केलं होतं. भारत स्वयंसिद्ध होईल, एक अशी भूमी जिथे मानवजात संस्कृतीच्या परमोच्च बिंदूवर पोहचली होती. आताही येणाऱ्या काळात गतवैभव प्राप्त करायला आता सज्ज होत आहे.
मॅक्स म्युलर यांच्या विचारांशी हेन्री यांचे उद्गार साधर्म्य साधणारे होते. या सगळ्या जल्लोषपर्वात पहिला प्रजासत्ताक कसा सरला कळलंच नाही. संपूर्ण दिल्ली शहर प्रकाशानं उजळून निघालं होतं. मुशायरा आणि कवी संमेलनं यांनी वातावरणाला काव्यमय केलं होतं. तो क्षण जागवलेल्या अनेकांना तो दिवस लख्खपणे स्मरतो.
अल्लामा इक्बाल यांच्या 'हिंदी है हम, है वतन, हिंदुस्तान हमारा'! या काव्यपंक्ती त्या दिवसाला साजेशा आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)