You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योगा आजी ते स्नेक मॅन! या वर्षीच्या काही वेगळ्या पद्म पुरस्कार विजेत्यांना भेटा
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामिगिरी करणाऱ्या लोकांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.
या यादीतील निवडक लोकांची ही यादी. या विजेत्यांचं वैशिष्ट्यं म्हणजे ते सामान्यातील असामान्य अशा वर्गवारीत येतात.
कोणत्याही प्रसिद्धीपासून आणि ग्लॅमरपासून दूर असलेले हे लोक गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या क्षेत्रात अविरतपणे काम करत आहेत. त्यांच्याबद्दल आपण फारसं ऐकलंही नसेल. त्यांची ही ओळख.
नानाम्लल आजी
काही दिवसांपूर्वी तुम्ही एका नव्वदीतील आजींचा योगसाधना करतानाचा व्हीडिओ पाहिला असेल. त्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आली आहे. या तामिळनाडूच्या नानाम्मल आजी कित्येक वर्षांपासून जनतेला योग शिकवत आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्या योग करत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो जणांना योगसाधनेची दीक्षा दिली आहे. त्यांचे काही विद्यार्थी आता योगशिक्षक झाले आहेत.
वेद प्रकाश नंदा
वेद प्रकाश नंदा हे अनिवासी भारतीय आहेत. ते कायदेपंडित आहेत. त्यांनी कायद्यावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. सध्या ते डेनव्हर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आंतरराष्ट्रीय कायदे संशोधनासाठी त्यांनी वेद नंदा सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅंड कम्परेटिव्ह लॉ ही संस्था स्थापन केली आहे.
रोमूलस व्हिटेकर
या वन्य जीव संवर्धकाची 'स्नेक मॅन ऑफ इंडिया' अशी ओळख आहे. तामिळनाडू आणि अंदमान निकोबार या भागात ते जैव-विविधतेचं संवर्धन करण्याचं काम गेली 6 दशकं करत आहेत.
त्यांचा जन्म अमेरिकेतला आहे, पण त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यांनी मद्रास स्नेक पार्कची स्थापना केली आहे. तसंच मगरींच्या संवर्धनासाठी त्यांनी क्रोकोडाइल बॅंक ट्रस्टची स्थापना केली आहे.
दामोदर गणेश बापट
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते कुष्ठरोग्यांची सेवा करत आहेत. छत्तीसगड राज्यातील चंपा इथे जांगिर जिल्ह्यात त्यांचा आश्रम आहे.
आपल्या 19 स्वयंसेवकांच्या साहाय्याने त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांची सेवा केली आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातला. नागपूरमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि छत्तीसगडमध्ये जाऊन ते रुग्णांची सेवा करू लागले.
इब्राहिम सुतार
सुतार यांना सर्व जण 'कन्नड कबीर' या नावानं ओळखतात. गेल्या 44 वर्षांपासून ते भजनाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम या दोन समुदायांना एकत्र आणण्याचं कार्य करत आहेत. लोकगीतांच्या माध्यमातून सामाजिक समतेचं कार्य ते करत आहेत.
सुभाषिणी मिस्त्री
सुभाषिणी यांचे पती वैद्यकीय सेवेअभावी गेले. या गोष्टीचा त्यांना जबर धक्का बसला. अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये असं त्यांना वाटू लागलं. हाती येईल ते काम त्या करू लागल्या. त्या मोलकरीण म्हणून राबल्या. अतिशय कष्टाने त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं.
नंतर, त्यांनी एक छोटंसं रुग्णालय काढलं. काही वर्षानंतर त्यांनी कोलकात्यामध्ये एक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल सुरू केलं आहे. या ठिकाणी गरिबांना मोफत सेवा प्रदान केली जाते असं ह्युमॅनिटी हॉस्पिटलच्या साइटवर म्टलं आहे.
लक्ष्मीकुट्टी
या 75 वर्षांच्या आजी म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहेत. त्यांना सर्व जण 'वनमुथ्थासी' म्हणजे जंगलाची आजी म्हणतात. औषधांच्या क्षेत्रातलं कोणतंही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. पण जंगलात असणाऱ्या सर्व औषधी वनस्पतींबद्दलची सर्व माहिती त्यांना तोंडपाठ आहे. सर्पदंश आणि विंचूदंशांवर त्या औषध तयार करतात. हे सर्व ज्ञान आपल्याला आपल्या आईकडून मिळालं आहे असं त्या सांगतात.
सुलागट्टी नरसम्मा
कर्नाटकातील दुर्गम भागात जिथे वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे त्या ठिकाणी सुलागट्टी जातात आणि महिलांना प्रसुतिसाठी मदत करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्यांना लोकं 'जननी अम्मा' असं म्हणतात.
अरविंद गुप्ता
खेळातून विज्ञान ही संज्ञा आपण नेहमी ऐकतो पण या लहान मुलांना खेळातून विज्ञान शिकवण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित करणारा विरळाचं.
अरविंद गुप्तांनी आयआयटीतून शिक्षण पूर्ण केलं. लहान मुलांना विज्ञान समजावं म्हणून त्यांनी खेळणी तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रयोग देशभरात प्रसिद्ध झाला. गेल्या तीस वर्षांपासून ते मुलांना खेळातून विज्ञान शिकवत आहेत. त्यांनी स्वयंसेवकांची एक फौजच उभी केली आहे.
राजगोपाल वसुदेवन
प्लॅस्टिकच्या समस्येनं जग त्रस्त झालं आहे. हा प्लॅस्टिकचा कचरा कुठं टाकणार आणि त्याचं काय करणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा मदुराईच्या राजगोपाल वसुदेवन यांनी ध्यास घेतला. वसुदेवन यांना प्लॅस्टिक मॅन म्हणून ओळखलं जातं. प्लॅस्टिकपासून रस्ता तयार करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहे. सध्या ते मदुराईच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे डीन आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)