मिळून साऱ्याजणी : प्रदूषणाच्या अभ्यासासाठी त्या समुद्र सफरीवर

    • Author, मॅट मॅकग्राथ
    • Role, पर्यावरण प्रतिनिधी

स्वतः एक अनुभवी खलाशी असलेल्या एमिली पेन आता एका विशेष मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. समुद्रात ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा साचून राहिला आहे. यापैकी जगात सर्वांत जास्त प्रमाणात साचलेल्या प्लास्टिकच्या पट्ट्याची तपासणी करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. याशिवाय या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रवासात त्यांच्याबरोबर जहाजावर असलेल्या टीममध्ये सगळ्या महिला आहेत.

त्यांची टीम 'ग्रेट पॅसिफीक गार्बेज पॅच'वर वैज्ञानिक प्रयोग करणार आहे. प्लास्टिकच्या हा पट्टा आकाराने फ्रान्सच्या तीन पट मोठा आहे.

आपल्या स्वतःच्या वैद्यकीय चाचण्या पाहिल्यानंतर प्लास्टिकच्या संभाव्य विषारी परिणामांविषयी आणि त्यातही खास करून महिलांवर होणाऱ्या परिणामांविषयी आपली खात्रीच पटल्याचे पेन सांगतात.

या मोहिमेतून मिळाणारी संपूर्ण माहिती विद्यापीठांनाही देण्यात येणार आहे.

ही गोष्ट एवढी महत्वाची का आहे?

या वर्षीच्या मार्च महिन्यात, शास्त्रज्ञांनी नॉर्थ पॅसिफीक जायरच्या आकाराबाबत आपला ताजा अंदाज प्रकाशित केला. आता हा नॉर्थ पॅसिफीक जायर म्हणजे नेमकी काय भानगड आहे बुवा? खरं तर हा जास्त प्रसिद्ध आहे तो ग्रेट पॅसिफीक गार्बेज पॅच म्हणून. हे दुसरेतिसरे काही नसून साचलेल्या प्लास्टिकचा हलता पट्टा आहे.

कचरा म्हणून टाकलेल्या या प्लास्टिकचे प्रमाण पूर्वीच्या अंदाजापेक्षा सोळा पट जास्त आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

समुद्रांमधील हे प्रमाण मोजण्याबरोबरच शास्त्रज्ञ आता आणखी पुढे जाऊन हे प्लास्टिक प्राणी आणि माणसांसाठी किती विषारी असू शकते याचासुद्धा अभ्यास करत आहेत.

या मोहिमेद्वारे समुद्रांमध्ये, हवेत आणि तळाशी जमलेल्या गाळात असलेल्या प्लास्टिकसंदर्भातील माहिती गोळा केली जाईल. ही माहिती यूके, अमेरिका, कॅनडा आणि स्वित्झर्लंडमधील विद्यापीठांनाही देण्यात येईल.

एमिली पेन सांगतात, समुद्रातील पाणी आणि सूर्यप्रकाशाद्वारे प्लास्टिकच्या झालेल्या विघटनाचे संभाव्य विषारी परिणाम चिंतेचा विषय आहे.

या सूक्ष्म अंशांमध्ये असलेली रसायने ही ओएस्ट्रॅडीओल या सेक्स हार्मोनसारखी असतात आणि प्राणी आणि मानवाच्या जननक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

"महासागरात आम्हाला मिळत गेलेल्या रसायनांबद्दल जसजशी मला अधिकाधिक माहिती मिळू लागली, तसतसे मला हेसुद्धा समजू लागले की यापैकी अनेक एंडोक्राईन डिसरप्टर्स आहेत, ते हार्मोन्सची नक्कल करतात आणि आपल्या शरीरात प्रवेश करण्यास सुरुवात करतात," हवाई येथून मोहीमेला सुरुवात करण्यापूर्वी त्या बीबीसीशी बोलत होत्या.

"जेव्हा मी माझी शारीरिक तपासणी केली तेव्हा महासागरात आणि प्लास्टीकमध्ये आम्हाला मिळत असलेली रसायने मला माझ्या शरीरात असल्याचं कळालं," त्या म्हणाल्या.

गरोदर काळात या हार्मोन डिसरप्टरचे तुमच्यात असणे, ही एक गंभीर समस्या असते; बाळंतपणात आणि स्तनपानाच्यावेळी आपल्याकडून ती आपल्या मुलांमध्ये जाऊ शकतात.

"ज्या विषारी परिस्थितीचा आपण सामना करत होतो, ते पहाता ही समस्या खूपच महिला केंद्रीत समस्या असल्याचे दिसून येते," त्या म्हणतात.

महासागरातील स्पंज

एमिली पेन या गेली अनेक वर्षे पर्यावरणविषयक समस्यांवर काम करत असून, टोंगा या लहानग्या पॅसिफिक बेटाच्या स्वच्छतेसाठी समाजाद्वारे राबवल्या गेलेल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातही त्यांचा सहभाग आहे.

बायोडीझेलवर चालणाऱ्या जहाजातून त्यांनी जगभरात प्रवास केला आहे आणि एक्सपेडीशन (eXXpedition) या संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत - जी खास सर्व महिला प्रवासी असलेल्या जलप्रवासांची मालिका चालविते. समाजात बदल घडवणाऱ्या असामान्य स्वयंसेवकांचा गौरव करण्यासाठी दिल्या जात असलेल्या पाँईटस् ऑफ लाईट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

सी ड्रॅगन या २२ मीटर (७२ फुट) लांबीच्या संशोधन जहाजावरून आपल्या टीमसह एमिली दोन टप्प्यात प्रवास करणार असून, या प्रवासात त्या तीन हजार सागरी मैलाचे अंतर पार करणार आहेत. अमेरिकेतील हवाई ते कॅनडातील व्हॅनकूव्हर हा प्रवासाचा पहिला टप्पा असेल तर त्यानंतर व्हॅनकूव्हर ते अमेरिकेतील सिएटल शहर असा प्रवास त्या करतील.

विविध देशांतून आलेल्या दहा महिलांची टीम या प्रवासातील प्रत्येक विभागात सहभागी होईल. ही टीम जहाजाच्या मागे प्लास्टिकसाठी जाळे पसरवेल. त्याचबरोबर ते हवेचे आणि पाण्याचे नमुनेही घेतील आणि या प्रवासातील वन्यजीवविषयक निरीक्षणांची नोंदी करतील.

"आम्ही प्लास्टिकच्या पृष्ठभागावरच्या रसायनांचा अभ्यास करणार आहोत. ज्या भागात कासवांचा रहिवास आहे तिथं हा अभ्यास केला जाईल," एमिली पेन सांगतात.

"आम्ही तळाशी गेलेल्या प्लास्टिकचीही तपासणी करू आणि त्याचबरोबर हवा आणि त्या हवेत असलेल्या मायक्रोफायबर्सची तपासणी करू. आम्ही विज्ञानाला एक पायरी पुढे घेऊन जात आहोत," असं त्या म्हणाल्या. मायक्रोफायबर्स श्वासातून शरीरात जात असतात.

संभाव्य विषारी पदार्थ सोडण्याबरोबरच, प्लास्टिकमध्ये शोषण करण्याची क्षमता आश्चर्यकारक असते. त्यामुळे महासागरात तरंगणाऱ्या हानिकारक रसायनांसाठी प्लास्टिक स्पंजसारखेच काम करते. समुद्रातील प्राणी या मायक्रोप्लास्टिकला अन्न समजून खातात. परिणामी त्यांच्या शरीरात दुषित पदार्थ शोषले जातात.

हे अंतिमतः विघटित होत नसल्यामुळे ही रसायने प्राण्यांच्या शरीरात केंद्रित होतात आणि अन्न साखळीत पुढे जात असताना त्यांच्यातही वाढ होत जाते.

याशिवाय काय करणार?

प्लास्टिकच्या समस्येवर जनजागृती करणे आणि त्यावर उपयायोजना करण्यासाठी दबाव आणणे, हेसुद्धा सी ड्रॅगनच्या चमूचे लक्ष्य आहे. ब्लू प्लॅनेट-२ सारख्या टीव्ही मालिकांमधून प्लास्टिकविषयी धोक्याची घंटा वाजवली जात असली, तरी आणखी काही करणेही आवश्यक आहे.

"आपल्यापुढे काहीतरी प्रश्न आहे, इतपतच आपली साधारण समज असते, पण खरी समस्या काय आहे ते कधीकधी आपल्याला समजत नाही," एमिली पेन सांगतात.

"जेव्हा तुम्ही पाण्यात जाळे टाकता आणि जवळपास अदृष्य असे १००० मायक्रोप्लॅस्टिकचे तुकडे बाहेर काढता, आणि मग तुम्हाला जाणवते की आपल्या समुद्राच्या पृष्ठभागावर पाच लाख कोटी तुकडे आहेत आणि आपण तिथे जाऊन ते स्वच्छ करु शकत नाही, कारण ते आकाराने अल्गी आणि झुप्लॅक्टन एवढेच आहे."

प्रदूषणाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बीबीसीने प्लास्टिक वॉच हा उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे प्लास्टिकच्या पर्यावरणावर होत असलेल्या परिणामाचा आढावा घेतला जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)