You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतिन आणि नाटो यांच्यात लष्करी हालचालीवरून खडाजंगी
नाटो अर्थात 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन' आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात खडाजंगी सुरू आहे. नाटोचं सैन्य रशियाच्या सीमेनजीक आल्याचा दावा पुतिन यांनी केला होता.
नाटोने सीमेनजीक 4,000 जणांच्या सैन्याची तुकडी तैनात केली आहे. कोणत्याही स्वरुपाचं आक्रमण झाल्यास ही तुकडी प्रत्युतर देईल, असं नाटोच्या प्रवक्त्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. ही कारवाई योग्यच असल्याचं नाटोनं स्पष्ट केलं होतं. आंतरराष्ट्रीय समुदायाशी असलेली बांधिलकी जपण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचही नाटोनं म्हटलं आहे.
दरम्यान, नाटोच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून रशियानं सज्ज राहायला हवं, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.
"रशियाने युक्रेन, जॉर्जिया, मोल्डोव्हा या देशांमध्ये सैन्याच्या तुकड्या उभ्या केल्या आहेत. मात्र या देशातील सरकारांची त्यांना मान्यता नाही. नाटोच्या सैन्यतुकडीचं असं नाही. त्यामुळे नाटो आणि रशिया यांची तुलना होऊ शकत नाही," असंही नाटोच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं.
लष्करी आक्रमणासंदर्भात रशियाशी चर्चा करण्यास नाटोने नकार दिल्याचा आरोप पुतिन यांनी केला आहे. मात्र नाटोने हा आरोप फेटाळला आहे. नाटो -रशिया परिषदेत हवाई आक्रमणासंदर्भात सुरक्षेबाबत चर्चा केल्याचं नाटोचं म्हणणं आहे.
रशियाच्या विमानाने काळ्या समुद्रावरील नाटोच्या हवाई क्षेत्रात हद्दीत प्रवेश केल्याच्या संशयानंतर इंग्लंडने रोमानियात असलेली दोन विमाने तत्काळ कारवाईसाठी धाडली होती, असं इंग्लंडनं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर पुतिन आणि नाटो यांच्यातला शाब्दिक संघर्ष उफाळला आहे.
रशियाने 2014मध्ये क्रीमियावर ताबा मिळवल्यापासून नाटो आणि पुतिन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत.
रशियाचे माजी गुप्तहेर आणि त्यांच्या मुलीवर युनायटेड किंगडममध्ये झालेल्या विषप्रयोगानंतर रशिया आणि युनायटेड किंगडमच्या संबंधातही तणाव निर्माण झाला आहे.
इंग्लंड आणि अमेरिका दोघेही नाटोचे सदस्य आहेत. या विषहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा आरोप इंग्लंड आणि अमेरिकेने केला होता. मात्र रशियाने या आरोपांचं खंडन केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)