You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतीन यांना अपमानित झाल्याची भावना - डोनाल्ड ट्रंप
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अपमान झाल्याची भावना आपल्याकडे व्यक्त केल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या आशिया-पॅसिफिक परिषदेत डोनाल्ड ट्रंप आणि व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ट्रंप यांनी ही माहिती दिली.
"अमेरिकेच्या निवडणुकीत मी अजिबात हस्तक्षेप केला नसल्याचं ते म्हणाले," असं ट्रंप यांनी सांगितलं. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आहे.
"रशियाच्या हस्तक्षेपाचा मुद्दा म्हणजे डेमोक्रटिक पक्षाची निव्वळ आरोपबाजी आहे," अशी टिप्पणीही ट्रंप यांनी केली आहे. पण, या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप करत ट्रंप यांना मदत केल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी काढला आहे.
पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर, चांगली चर्चा झाल्याचं सांगणारं ट्वीटही ट्रंप यांनी केलं.
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयानं या हस्तक्षेपा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रॉबर्ट मुल्लर यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
या चौकशीत आतापर्यंत ट्रंप यांच्या काही माजी सहकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे. सीआयए आणि इतर गुप्तचर संस्थांनी रशियाच्या हस्तक्षेपाविषयी दिलेले अहवाल ट्रंप यांनी या पूर्वीच फेटाळले आहेत.
"रशियाच्या सहभागाविषयी तयार करण्यात आलेली तथाकथित कागदपत्रं हा अमेरिकेच्या स्थानिक राजकारणातील वाद आहे,", असं व्लादिमीर पुतीन यांनी व्हिएतनाममध्ये पत्रकारांना सांगितलं.
ट्रंप काय म्हणाले?
हस्तक्षेपाच्या आरोपामुळे पुतीन यांचा अपमान झाला आहे आणि हे अमेरिकेसाठी चांगलं नसल्याचं ट्रंप म्हणाले. "मी पुतीन यांना पुन्हा विचारल्यावरही त्यांनी नकार कायमच ठेवला," असंही ट्रंप यांनी स्पष्ट केलं आहे.
तुम्हाला पुतीन यांचं म्हणणं पटलं का, या प्रश्नावर, ट्रंप म्हणाले की, "त्यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. मी तसं काहीही केलेलं नाही, असं जर राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणत असतील, तर आपण त्यांच्याशी वाद कसा काय घालणार, त्यामुळे तो विषय सोडून सीरिया आणि युक्रेनबद्दल बोलण्यास सुरुवात करायला नको का?"
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)