सीरिया : इडलिब प्रांतात शस्त्रागारात स्फोट, 39 ठार

सीरियातील इडलिब भागात एका इमारतीत झालेल्या स्फोटात 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 12 बालकांचा समावेश आहे.

वायव्य सीरियाच्या इडलिब प्रदेशातील सरमादा शहरातल्या या इमारतीत शस्त्रांचा मोठा साठा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा शस्त्रसाठा एक शस्त्राच्या व्यापाऱ्याचा होता.

बीबीसी प्रतिनिधी आणि काही संस्थांच्या मते अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

बंडखोरांच्या ताब्यात असलेला इडलिब हा शेवटचा मोठा प्रदेश आहे. त्यामुळे तो सीरियन लष्कराचं पुढचं लक्ष्य असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यात सीरियाने बंडखोर आणि जिहादी गटांविरुद्ध रशिया आणि इराणच्या मदतीने वेगाने कारवाई केली आहे.

UKतील Syrian Observatory for Human Rights (SOHR) नुसार अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही काही बातम्यांमध्ये वर्तवण्यात येतेय.

तुर्कस्तानच्या सीमेवरील एका AFP प्रतिनिधीनुसार, रविवारी या पडलेल्या इमारतीचा राडारोडा बुलडोझरने दूर करून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं.

"नागरिकांनी भरलेल्या इमारतींचं रूपांतर मलब्यात झालं आहे," असं इडलिब सिव्हिल डिफेन्स टीमचे सदस्य हतेम अबू मार्वन यांनी या वृत्तसंस्थेला सांगितलं.

सीरियाच्या इतर भागांतून हुसकावल्यावर जिहाद्यांनी या भागात आसरा घेतला होता. पडलेल्या या इमारतीतले बहुतांश लोक या जिहादींचे कुटुंबीय असल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटाचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)